वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सेहवागचे हजरजबाबी ट्विट नेहमी चर्चेचा विषय ठरतात. त्याचं कौतुकंही होतं. क्रिकेटपटूंसोबतच लोकप्रिय सेलिब्रिटींच्या वाढदिवशी वीरू नेहमी आपल्या कल्पनाशक्तीला जोर देत विशेष ट्विट करत असतो. यावेळी सेहवागने सुखी वैवाहिक आयुष्यासाठीचा मंत्र देऊ केलाय.

‘हॅपी वाईफ, हॅपी लाईफ’, असं सांगत वीरूने चित्रपटागृहात असतानाचा एक फोटो ट्विट केलाय. पण यामागे एक कहाणी आहे. त्याचं झालं असं की, रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होता, मात्र वीरूच्या पत्नीला चित्रपट पाहायचा होता. वीरूला काही केल्या सामना पाहायचा होता. सामना पाहात बसलं तर पत्नी नाराज होणार, मग वीरूने दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी शक्कल लढवली. वीरू पत्नीसोबत सिनेमाला तर गेलाच पण सिनेमागृहात आपल्या स्मार्टफोनवरून त्याचं आयपीएलच्या स्कोअरवरही लक्ष होतं.

‘मैं भी खूश, बिवी भी खूश..’, अशा मथळ्यासह वीरूने ट्विट केलंय. वीरूच्या ट्विटवर त्याच्या फॉलोअर्सनेही त्याचं भरभरून कौतुक केलं. वीरूच्या कल्पनाशक्तीचं ‘एक तीर दो निशाना’, अशी वाहवा केली.