पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून योग्य चालना मिळत नसल्यामुळे संघ सकारात्मक पद्धतीने वाटचाल करू शकत नाही, अशी कारणमीमांसा करीत वकार युनूस यांनी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. नुकत्याच भारतात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला फक्त एकमेव विजय मिळवता आल्याने त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. या पाश्र्वभूमीवर रविवारी शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला फक्त बांगलादेशविरुद्ध विजय मिळवता आला. मात्र भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडून त्यांनी हार पत्करली. याबाबत वकार म्हणाला, ‘‘जड अंत:करणाने मी प्रशिक्षकपदाचा त्याग करीत आहे. २०१५च्या विश्वचषकानंतर मी पीसीबीकडे काही शिफारशी केल्या होत्या. मात्र मंडळ त्याचा गांभीर्याने विचारच करीत नाही.’’
मला खलनायक म्हणून पद सोडायला मुळीच आवडणार नाही, असे युनूस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. परंतु त्यांच्या कराराअंतर्गत फक्त तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. राजीनाम्याच्या निर्णयाविषयी ते म्हणाले, ‘‘संघाच्या वाटचालीसंदर्भात माझ्या सूचनांचा विचार न झाल्यामुळे माझी घोर निराशा झाली आहे.’’
भारतातून परतल्यानंतर युनूस आणि पीसीबी यांच्यात शाब्दिक लढाई लढली जात होती. युनूस यांनी स्पध्रेसंदर्भात मांडलेला गुप्त अहवाल फुटल्याबाबत युनूस यांनी तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली. मात्र पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन, असे त्यांनी सांगितले.
युनूस यांनी २०१४मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्याआधी २०१०-११मध्ये त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळले होते. पण खासगी कारणास्तव सप्टेंबर २०११मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.

राष्ट्रीय निवड समितीही बरखास्त
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सुमार कामगिरी प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली. आशिया चषक व विश्वचषकातील खराब कामगिरीच्या मीमांसेकरिता सत्यशोधक समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हारून रशीद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती तात्काळ बरखास्त करण्यात आल्याचे पीसीबीने स्पष्ट केले. नव्या राष्ट्रीय निवड समितीची घोषणा लवकरच करण्यात येईल, असेही पीसीबीतर्फे सांगण्यात आले. विश्वचषकात अपयशामुळे कर्णधार शाहिद आफ्रिदी व प्रशिक्षक वकार युनूस यांना आपले पद सोडावे लागले होते.