न्यूझीलंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टॉम लॅथमने फाफ डू प्लेसीसचा अप्रतिम झेल घेतला आहे. त्यामुळे अतिशय रटाळ झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

हॅमिल्टनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना टॉम लॅथमने अप्रतिम झेल टिपला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसने पॅडल स्विपचा फटका मारला आणि शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या लॅथमने अशक्य वाटणारा झेल घेतला. लॅथमने टिपलेला हा झेल पाहून न्यूझीलंडचे खेळाडू अवाक् झाले. डू प्लेसिसला तर थोडा वेळ नेमके काय झाले आहे, हेच समजत नव्हते.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना ६४ व्या षटकात लॅथमने अप्रतिम झेल टिपला. मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर अर्धशतकवीर डू प्लेसीस पॅडल स्वीपचा फटका खेळताना बाद झाला. अर्धशतक पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या डू प्लेसीसने पॅडल स्वीपचा फटका मारला होता. मात्र डू प्लेसीसच्या हालचालींवरुन लॅथमने चेंडू मागच्या बाजूला जाणार, याचा अंदाज बांधला आणि चेंडू डू प्लेसीसच्या बॅटला लागण्याआधीच लॅथम उजव्या बाजूला गेला आणि चेंडूला बॅटचा स्पर्श होताच आणखी उजवीकडे झेपावला. लॅथमचा हा जबरदस्त झेल पाहून स्टेडियममधील प्रेक्षकदेखील अवाक् झाले.