भारताचा कर्णधार अनुप कुमारचा सावधगिरीचा इशारा

विश्वचषक स्पध्रेची एकंदर कार्यक्रमपत्रिका पाहता शंभर टक्के भारत-इराण यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल, परंतु प्रो कबड्डीत यापैकी अनेक महत्त्वाच्या खेळाडूंसोबत खेळल्यामुळे त्यांची बलस्थाने आणि उणिवा यांची पुरती जाणीव आम्हाला आहे. त्यांच्याविरुद्ध योजनापूर्वक आणि सावधपणे खेळावे लागेल, असे मत भारताचा कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केले.

मागील दोन्ही विश्वचषक स्पर्धामध्ये इराणविरुद्धच भारतीय संघाचा अंतिम सामना झाला होता. याचप्रमाणे २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताने इराणविरुद्ध निसटता विजय मिळवला होता. प्रो कबड्डी लीगमधील चार हंगामांमध्ये यू मुंबाचे नेतृत्व तसेच २०१० आणि २०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेचा अनुभव गाठीशी असणारा अनुप इराणच्या आव्हानाविषयी म्हणाला, ‘‘इराणच्या संघाला आम्ही मुळीच कमी लेखत नाही. हा संघ बलवान आहे. प्रो कबड्डीत त्यांचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करताना दिसले आहेत. आम्ही इराणच्या संघातील खेळाडूंबाबत अद्याप कोणतीही रणनीती आखलेली नाही. मात्र अंतिम सामन्याआधी त्यांच्याबाबत निश्चित रणनीती तयार करण्यात येईल.’’

भारताच्या गटात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अर्जेटिना, इंग्लंड हे संघ आहेत. या संघांबाबत अनुप म्हणाला, ‘‘बांगलादेश वगळता बाकी सर्वच संघ नवखे आहेत. त्यामुळे आम्ही फक्त सराव केला आहे. जसजसे सामने होतील, तसतसा संघांचा अंदाज येत जाईल. त्यानंतरच रणनीती आखता येईल. आपली कौशल्ये आहेत, त्याकडे अधिक लक्ष दिले आणि आपल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळल्या म्हणजे कोणताही प्रतिस्पर्धी संघ समोर टिकू शकणार नाही.’’

प्रो कबड्डी लीगच्या अस्तित्वानंतर ही पहिली विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे काय फरक पाहायला मिळेल, हे मांडताना अनुप म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीच्या यशामुळेच ही विश्वचषक स्पर्धा होत आहे. हा विश्वचषक नव्या नियमानुसार होणार आहे. याच नियमांनुसार आम्ही प्रो कबड्डीचे मागील चार हंगाम खेळलो आहोत. त्यामुळे हाच अनुभव आम्हाला उपयोगी पडेल. भारतात विश्वचषक होत असल्यामुळे घरच्या वातावरणाचा संपूर्ण फायदा आम्हाला मिळेल. क्रीडारसिकांचे पाठबळ निश्चितच कामगिरी उंचावेल.’’

विश्वचषकाच्या संदर्भातील राष्ट्रीय सराव शिबिराविषयी माहिती देताना अनुप म्हणाला, ‘‘प्रशिक्षक बलवान सिंग आणि ई. भास्करन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सराव शिबिरात तंदुरुस्तीकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात आले. प्रो कबड्डी लीग संपल्यावर महिन्याभराच्या विश्रांतीनंतर हा सराव सुरू झाला. मग खेळाडूंच्या कौशल्याचा सराव झाला. याचप्रमाणे सहा, पाच, चार, तीन आदी क्षेत्ररक्षणसंख्येच्या संचाचा सराव झाला. आमच्यात दोन संघ तयार करून सामनेही आम्ही खेळतो. २४ सप्टेंबरपासून अखेरचे शिबीर सुरू झाले आहे.’’