बीबीसी-बझफीड वृत्तसंस्थांचा गौप्यस्फोट
खेळभावना हा कुठल्याही खेळाचा गाभा असतो. मात्र या खेळभावनेला बट्टा लावणाऱ्या गैरप्रवृत्ती सातत्याने समोर येत आहेत. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरण, फुटबॉल महाघोटाळा आणि उत्तेजक प्रकरणाने कलंकित अ‍ॅथलेटिक्स यांनी झालेली नाचक्की ताजी असताना टेनिसविश्वात फिक्सिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इंग्लंडची वृत्तवाहिनी बीबीसी आणि बझफीड या अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार टेनिसविश्वाला फिक्सिंगने ग्रासले असून, यामध्ये ग्रँड स्लॅम विजेत्यांचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
जागल्याने या संदर्भातील गोपनीय फायलींचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. गेल्या दशकभरात जागतिक क्रमवारीतील अव्वल सोळा खेळाडूंचा मॅचफिक्सिंग प्रकरणामध्ये समावेश असून, त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. विशेष म्हणजे कथित आरोप असलेले आठ टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
दरम्यान असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स संघटनेचे प्रमुख ख्रिस केरमोड म्हणाले की,‘‘मॅचफिक्सिंगचे कोणतेही प्रकरण दडपण्यात आलेले नाही. बीबीसी आणि बझफीड यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटना गेल्या दहा वर्षांपूर्वीच्या आहेत. कोणतीही नवी माहिती समोर आल्यास, आम्ही त्याप्रकरणी सखोल तपास करू. फिक्सिंगसारख्या गैरप्रकारांना टेनिसमध्ये काहीही स्थान नाही. टेनिसविश्वाला काळिमा लावणारा सर्व गैरप्रकार समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असे केरमोड यांनी स्पष्ट केले. २००७ मध्ये एटीपीने फिक्सिंग प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या समितीची ही कागदपत्रे आहेत.
रशियाच्या निकोलय डेवडय़ुन्को आणि अर्जेटिनाच्या मार्टिन व्हॅसालो अग्युलरे यांच्यादरम्यानचा सामना संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र सबळ पुराव्याअभावी हा तपास अर्धवट राहिला. समितीच्या अहवालानुसार रशिया, इटलीमधील फिक्सिंग रॅकेट चालवणारी मंडळी कोटय़वधी रुपये कमावत आहेत. मात्र फिक्सिंग प्रकरणात सहभाग नसलेल्या सोळा खेळाडूंना शिक्षा न झाल्याने ‘टेनिस इंटिग्रिटी युनिट’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.