तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारी सोनेरी दिवस उजाडला. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतासारख्या बलाढय़ संघाला पराभूत करत श्रीलंकेने जगज्जेतेपदाला गवसणी घातली आणि श्रीलंकेमध्ये एकच जल्लोष झाला. श्रीलंकावासीयांनी आपल्या लाडक्या विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचे मंगळवारी जल्लोषात स्वागत केले. एकच गर्दी करत देशवासीयांनी बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच कल्ला केला. क्रिकेटपटूंची एक छबी पाहण्यासाठी, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला होता. दुमजली बसमधून काढलेल्या क्रिकेटपटूंच्या विजयी यात्रेला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.