भारतीय कुस्ती महासंघाला विश्वास; सर्वतोपरी साहाय्य करण्याचा निर्धार

‘उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंग निर्दोष आहे असे आम्हाला वाटते. त्याच्यावर अन्याय झाला आहे. त्याला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्याच्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात नरसिंगने भारताचे प्रतिनिधित्त्व करावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू’, असे ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘कारकीर्दीत नरसिंगच्या नावावर कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट नाही. ऑलिम्पिक काही दिवसांवर आले असताना प्रतिबंधित उत्तेजकाचे सेवन करून तो आपली कारकीर्द पणाला का लावेल? नरसिंगसह सर्वच कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. नरसिंगची कारकीर्द स्वच्छ आहे. उत्तेजक चाचण्यांपासून त्याने कधीही पळवाट शोधलेली नाही’.

माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले आहे अशी लेखी तक्रार नरसिंगने आमच्याकडे केली आहे. उत्तेजकाशी देणेघेणे नसल्याने संपूर्ण देश माझ्या पाठीशी आहे असे नरसिंगने म्हटले आहे अशी माहिती ब्रिजभूषण यांनी दिली.

गेल्यावर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकासह नरसिंगने रिओवारी पक्की केली होती. त्या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा होता. सुशील कुमार खांद्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकला नाही. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकप्राप्त सुशीलची रिओवारीसाठी निवड झाली नाही. त्याने भारतीय कुस्ती महासंघाकडे दाद मागितली. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने नरसिंगची निवड वैध ठरवली.

‘राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेची नरसिंगच्या संदर्भात बुधवारी सुनावणी होणार आहे. यामध्ये नरसिंग निर्दोष ठरेल असा विश्वास आहे. नाडाचे पथक सर्वसमावेशक विचार करून निर्णय देईल याची खात्री आहे. लवकरच चित्र स्पष्ट होईल. तूर्तास नरसिंगची ऑलिम्पिकवारी स्थगित झाली आहे’, असे ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील काही ठळक मुद्दे

  • ’ भारतीय कुस्ती महासंघाला लिहिलेल्या तक्राररुपी पत्रात नरसिंग यादवने सोनपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) अधिकाऱ्याचे नाव नमूद केले आहे. अधिकाऱ्यासह आणखी काही व्यक्ती आणि खेळाडूंचा उल्लेख नरसिंगने केला आहे.
  • ’ नरसिंगने लिहिलेल्या पत्रात साइच्या अधिकाऱ्याचा उल्लेख केल्याने ‘साइ’ व्यवस्थापन भडकले आहे. कटकारस्थान म्हणजे काय असा सवाल ‘साइ’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. साइ केंद्रात परीक्षण केल्यानंतरच खेळाडूंना खाद्यपदार्थ पुरवण्यात येतात.
  • ’हे परीक्षण संबंधित संघटना किंवा महासंघातर्फेच केले जाते. खाद्यपदार्थामध्ये प्रतिबंधित उत्तेजकांचा समावेश करण्याचे काम साइ करते असे नरसिंगला म्हणायचे आहे का? तो वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्याने पहिल्यांदा स्वत:चे निर्दोषत्त्व सिद्ध करावे. उत्तेजक चाचणीत दोषी आढळणारा प्रत्येक खेळाडू आपल्याविरुद्ध कारस्थान रचल्याचे म्हणतो. नरसिंगचा ऑलिम्पिकचा मार्ग बंद झाला आहे. हे स्पष्ट आहे. यास्वरुपाच्या घटना आधीही घडल्या आहेत. जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेचे नियम अतिशय कठोर आहेत. या नियमांसमोर निर्दोषत्त्व सिद्ध करणे अवघड आहे असे साइच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
  • ’ उत्तेजक प्रकरणात अडकल्यानंतर नरसिंगने ‘साइ’च्या अधिकाऱ्याविरुद्ध आरोप केला आहे. याआधी अनेकवेळा तो इथे आला आहे. त्यावेळी त्याला असे कधी जाणवले नाही असे ‘साइ’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
  • ’ नरसिंगविरुद्धचे हे कटकारस्थान असल्याची भूमिका भारतीय कुस्ती महासंघाने घेतली आहे. एका महिन्यात नरसिंगच्या तीन उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या. हीच गोष्ट संशयास्पद आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरलेला आणि त्याच्या खोलीत राहणारा संदीप यादवही उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे.
  • ’ ‘साइ’चे महासंचालक इंजेट श्रीनिवासन यांनी नरसिंगला सोनीपत येथील राष्ट्रीय शिबिराला उपस्थित न राहण्याची सूचना केली होती. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अन्य ठिकाणी सराव करण्याचा सल्लाही दिला होता.
  • ’मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटूंसह सरावासाठी सहकारी मिळत असल्याने नरसिंगने सूचना धुडकावत सोनीपतच्या शिबिरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
  • ’ नरसिंग ऑलिम्पिकला जाऊ न शकल्यास त्याच्याऐवजी ७४ किलो वजनी गटातून अन्य कुस्तीपटू भारताचे प्रतिनिधित्त्व करेल, असे भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केले. भारतात गुणी कुस्तीपटूंची कमतरता नाही. ऑलिम्पिक प्रवेशिका वाया जाणार नाही असे महासंघाने सांगितले.