नरसिंग यादव हा एक गरीब घरातला सज्जन मुलगा आहे. तो उत्तेजक द्रव्य सेवन करील, असे मला वाटत नाही. कारण तो दहा वर्षांचा असल्यापासून मी त्याला ओळखतो. नरसिंगने कुणाचेही वाईट केलेले नाही, उलटपक्षी त्याच्याबाबतच वाईट होत चालले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध रचलेला हा कट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्याविरोधात बरीच मंडळी एकवटली होती. त्यांच्यापैकी एकाने हे केले आहे. नरसिंगविरुद्धचे दुष्कृत्य देशद्रोहीपणाचे लक्षण आहे. आपल्या देशाच्या खेळाडूने परदेशात जाऊन खेळू नये, हा विचारच देशाच्या हिताचा नक्कीच नाही, असे नरसिंगचे प्रशिक्षक जगमल सिंग सांगत होते.

आता यापुढे नरसिंगबाबत काय होईल, असे विचारल्यावर जगमल सिंग म्हणाले की, ‘नरसिंगची पुन्हा एकदा चाचणी घेतली जावी. आता या प्रकरणाकडे जगभराचे लक्ष लागले आहे. पंतप्रधानांसहित क्रीडामंत्री, कुस्ती महासंघ यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. बुधवारी नरसिंग राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीपुढे सादर होऊन आपली बाजू मांडणार आहे. यानंतर नरसिंगबाबत काही सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा मला आहे.

‘नरसिंगने नेहमीच नैसर्गिक आहारावर भर दिला आहे. त्याने कधीही आहारामध्ये अनैतिक गोष्टींचा आतापर्यंत वापर केलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये नरसिंगच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी तो असे कृत्य कशाला करील? सोनीपथ येथील त्याच्या आहारामध्ये कुणी तरी हे उत्तेजक द्रव्य मिसळल्याची मला शक्यता वाटत आहे,’ असे जगमल सिंग म्हणाले.