नरसिंग यादवच्या निमित्ताने कुस्तीला लागलेले कथित उत्तेजकांचे ग्रहण दुर्दैवी आहे, असे मत अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारने व्यक्त केले. ‘नरसिंग आणि त्याचा सहकारी संदीप यादव ज्या परिस्थितीतून आता जात आहेत ते निराशाजनक आहे. कुस्ती हा माझ्या जीवनाचा ध्यास आहे. सहकारी कुस्तीपटूंना माझा नेहमीच पाठिंबा असेल,’ असे सुशीलने स्पष्ट केले.

सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे अपेक्षित होते. नरसिंग यादवने गेल्या वर्षी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात कांस्यपदकासह रिओवारी पक्की केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकप्राप्त सुशीलची भारतीय संघात निवड न झाल्याने त्याने महासंघाकडे दाद मागितली. खेळाडू निवडण्यासाठी नव्याने निवड चाचणी स्पर्धा घेण्याची मागणी केली. या प्रकरणी सुशीलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने नरसिंगने मिळवलेली पात्रता योग्य ठरवत निर्णय दिला. यामुळे सुशीलची रिओवारीची शक्यता मावळली. सुशीलचे वय लक्षात घेता हे त्याचे शेवटचे ऑलिम्पिक असू शकते. रिओवारी करता येणार नसल्याने सुशीलची कुस्ती कारकीर्दीचे भवितव्यच धोक्यात आले.

या सगळ्या इतिहासाचा उल्लेख न करता सुशील म्हणाला, ‘क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेत भारतासाठी मला तिसरे पदक पटकवायचे होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ऑलिम्पिकच्या सरावापासून मी दूरच आहे. याऐवजी सहकारी कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याचे काम करतो आहे. ते देशासाठी पदक जिंकून येतील असा विश्वास आहे.’

 

नरसिंगबाबतचा निर्णय धक्कादायक

पीटीआय, वृत्तसंस्था

‘नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याची बातमी धक्कादायक आहे. तो दहा वर्षांचा असल्यापासून ओळखतो आहे. तो असे काही करणे शक्य नाही’ , असे मत नरसिंगचे प्रशिक्षक जगमल सिंग यांनी व्यक्त केले.

‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्यानंतरही नैसर्गिक आहारात त्याने बदल केलेला नाही. त्याने अनेकदा उत्तेजक चाचण्या दिल्या आहेत आणि कधीही दोषी आढळलेला नाही. हा त्याच्याविरुद्धचा कट आहे. त्याला याप्रकरणी गोवण्यात आले आहे. तो सच्चा माणूस आहे. कटात गोवणाऱ्या व्यक्ती कोण याविषयी मी काही बोलू शकत नाही. अनेकजण त्याच्याविरुद्ध आहेत. कोणी हे कारस्थान रचले किंवा कोणाच्या आदेशावरून रचण्यात आले याचा आम्ही शोध घेत आहोत. विशिष्ट कोणाचे नाव घेऊ शकणार नाही. त्यासाठी पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे’, असे त्यांनी पुढे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘नाडा’ने नरसिंगची नव्याने चाचणी घ्यावी. त्यात तो दोषी आढळला तर हरकत नाही.