गृहखात्याच्या आकडेवारीनुसार २०१३ ते २०१५ या काळात भारतातील हरवलेल्या मुलांचं प्रमाण ८४ टक्क्यांनी वाढलं आहे. २०१३ मध्ये ही संख्या ३४,२४४ इतकी होती. २०१५ मध्ये ती ६२,९८८ इतकी झाली आहे. या हरवलेल्या मुलांपकी प्रत्येक तीन मुलांमागे एक मूल सापडत नाही, असं आकडेवारी सांगते. काय कारणं आहेत यामागची? या हरवण्यामागचं नेमकं वास्तव काय, हे सांगणारे दोन लेख.. हरवलेल्या मुलांची आठवण जागी करण्यासाठी आणि जी मुले परतली आहेत, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी २५ मे हा आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो त्यानिमित्ताने..

आमच्या ज्ञानदेवी ‘चाइल्डलाइन’कडे एक वडील काही दिवसांपूर्वी आले व व्याकूळ होऊन आपली व्यथा मांडू लागले. सुमारे ७-८ वर्षांपूर्वी त्यांचा तेव्हा १०-१२ वर्षांचा असलेला मुलगा शाळेतून परतलाच नाही. तो कुठे गेला असेल याच्या सर्व शक्यता पडताळून झाल्या होत्या. सर्व तऱ्हेच्या तक्रारी करून झाल्या होत्या. कोणी सांगे अमुकतमुक गावी पाहिला. कोणी सांगे हिमालयात यात्रेच्या ठिकाणी दिसला. या प्रत्येक बातमीचा मागोवा न कंटाळता चिकाटीने हे वडील घेत होते. पैशापरी पैसा जात होताच, शिवाय संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य उद्ध्वस्त झाले होते. तरीही आशा सुटत नव्हती. मृत्यू पावला असेल, अपघात झाला असेल या शक्यता गृहीत धरून त्यांनी बातमी मिळेल तेथील शवागरे, इस्पितळे पालथी घातली होती. काय मन:स्थिती असेल या बापाची! खरोखरच तो मुलगा या जगात नसेल तर तसे कळलेले बरे. पण असे अधांतरी जगणे अवघड. त्या वडिलांची, त्या आईची व्यथा, वेदना खरोखरच बघवत नव्हती व आपण त्यात सांत्वना देण्यापलीकडे आणि मर्यादित स्वरूपात शोध मोहिमेत भाग घेण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती हतबल करणारी होती.

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

वरील घटना प्रातिनिधिक आहे, खरी आहे.

मुलं मुळात हरवतातच कशी? याचे उत्तर विलक्षण आहे. आपल्या बालपणात आपण डोकावलं तर केव्हा ना केव्हातरी आपल्याला पळून जावेसे वाटलेले असते. घरच्या कोणाचा तरी राग आला म्हणून. परीक्षेत कमी गुण मिळाले- घरी सांगितल्यावर काय होईल वगैरे प्रकारची अनेक कारणे त्यामागे असतात. गेली ३०-३५ वर्ष अनेक स्तरावरच्या मुलांबरोबर मी काम करते आहे. त्यांचे प्रश्न समजावून घेताना त्यांना हमखास ‘कोणा-कोणाला कधीतरी पळून जावेसे वाटले आहे.’ असा प्रश्न विचारल्यावर कोणत्याही गटात ९० टक्के तरी हात वर होतात. अगदी क्षुल्लकपासून अतिशय गंभीर अशी कारणे यामागे असतात. रागावर उपाय म्हणून पळून जाणे हा एक मार्ग असतो तर आत्महत्या म्हणजे जगातूनच पळून जाणे हा दुसरा. पालकांशी/कुटुंबाशी असलेले संबंध व संस्कार बहुतेकांना पळून जाण्यापासून परावृत्त करतात. पण या चाळणीतून निसटलेले हरवतात. कदाचित पुन्हा कधी न सापडण्यासाठी..

एकदा घर सोडले की बाहेर घात लावून बसलेले अनेक असतात. मुली सहज वेश्या व्यवसायात ओढल्या जाऊ शकतात. फुकट कामगार, भीक मागणे, पोर्नोग्राफी किंवा विकृत लैंगिक संबंधासाठी मुले पुरविणाऱ्या टोळ्या बाहेर सक्रिय असतात. घरच्यांवरच्या रागातून घराबाहेर पडलेली मुले अशा माणसांच्या प्रेमाच्या भूलथापांना सहज फशी पडतात.

काही वर्षांपूर्वी एका परवान्याविना चालणाऱ्या अनाथालयाला एका तक्रारीवरून भेट दिली. एका छोटय़ाशा खोलीत कोणत्याही सोयी सुविधांशिवाय ३०-३५ मुले राहात होती. ‘‘बिचारी अनाथ, बेवारस आहेत. त्यांना मी सांभाळते’’, असे आश्रम चालिकेचे म्हणणे होते. तिच्या कामाचे वर्तमानपत्रांनीही भरपूर कौतुक केल्यामुळे तिला मोठय़ा प्रमाणावर व नियमित देणग्या मिळत होत्या. मुलांची नावे शाळेत असली तरी ती शाळेत न जाता देणग्या गोळा करायला जात असत. ती मुले कुठे मिळाली असे विचारल्यावर रेल्वेस्थानकावर सापडली, तान्ही असल्यापासून सांभाळते, अशा स्वरूपाची उत्तरे मिळत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मुले सापडली तर त्यांची हरवल्याची तक्रार कशी नाही? याची चौकशी कधी झाली नाही का? अधिकाऱ्यांपर्यंत याची तक्रार केल्यावर अनधिकृत म्हणून कारवाई सुरू झाली. पण त्यांची हरवलेल्या मुलांच्या यादीबरोबर पडताळणी सूचना करूनही झाल्याचे ऐकीवात नाही.

शहराच्या मोहाने कुठल्यातरी चित्रपटातील अथवा क्रिकेटमधील हिरोला भेटायच्या ओढीनेही मुले घर सोडतात आणि परतीचा मार्ग न सापडल्याने शहरात कुठेतरी बेवारस भटकत राहतात. ‘चाइल्डलाइन’कडे एक मुलगा फुटबॉल हिरो बनायचंय म्हणून बिहारमधून एकदा आला होता. धट्टीकट्टी शरीरयष्टी व लाडाकोडात वाढलेला होता. त्याला कोणीतरी मुंबईत फुटबॉल क्लब आहेत म्हणून पाठवले. तिथे काही जमले नाही म्हणून तो पुण्यात आला. रेल्वे स्टेशनवर एकटाच दिसला म्हणून रेल्वे पोलिसांनी ‘चाइल्डलाइन’ला बोलावले. त्याचे समुपदेशन करून त्याला घरी परत पोचविले. परंतु काही वर्षांनंतर तो पुन्हा पुण्यात आला व ‘चाइल्डलाइन’ला त्याने फोन केला. त्याला पाहून खूप वाईट वाटले. एकेकाळचा आरोगसंपन्न मुलगा आता फक्त सापळा राहिला होता. पण फुटबॉल हिरोच होणार हे वेड अजून डोक्यातून गेले नव्हते. अशी मुले कितीदाही घरी पोचवली तरी परत परत पळून जातात. त्यांच्या शहरात ‘हरवतात.’

इथे मुद्दा असा की ही मुलं स्वत:लाच हरवून घेतात. अशी अनेक मुले पुणे ‘चाइल्डलाइन’च्या १६ वर्षांच्या प्रवासात सापडली, घरी पोचवली पण ती तिथे टिकली नाहीत. एक मुलगा तर भारतातल्या ५ ते १० ‘चाइल्डलाइन’ला माहिती झाला होता. प्रत्येकाने महत्प्रयासाने त्याला घरी सोडवले होते. परत घर सोडायचा व कोणत्याही गावात जावून हक्काने ‘चाइल्डलाइन’कडे जेवणाखाण्याची मागणी करायचा. निरीक्षणगृहात ठेवला तर तेथूनही पळून जायचा. असा तो सदासर्वकाळ हरवलेलाच.

ही मुले मुळात घरात का टिकत नाहीत? रेल्वेस्थानकावर राहणाऱ्या, घर सोडलेल्या मुलांबरोबर तसेच पळून आलेल्या अशा मुलांना ज्यांना घरी जायचेच नाही, अशांबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत. त्यांचे विश्व समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही मुलांसारखीच त्यांनाही मायेची भूक असते. कोणीतरी आपल्याला विचारावे, याची आस असते. ‘ज्ञानदेवी’शी दोस्ती झाली की स्टेशनवरची मुले हमखास फोन करून, ‘‘दीदी अब बनारस गाडीसे जा रहे है, दो दिन के बाद वापस आऐंगे’’ अशा स्वरूपाची घरी सांगून जावं तशी माहिती द्यायचे. ‘‘कोयला को बुखार आया है, रामजानेने झगडा किया है’’ अशी माहितीही द्यायचे. या मुलांची नावे त्यांना स्वत:लाच माहीत नसतात. त्यामुळे हरवलेल्यांच्या तक्रारींमधून ही मुलं सापडावीत कशी?

खूप दोस्ती केल्यावर काही वेळेला त्यांच्याकडून घरचा पत्ता मिळतोही. पण ती जायला तयार नसतात. आप्त न्यायला आले तरी खूप मनधरणी केल्यावर जातात. पण पुन्हा घर सोडतात. मुळात ज्यामुळे प्रेमाचे पाश तुटले ती कारणे, ते घाव इतके खोलवर असतात की त्यांना परत जायचेच नसते. स्वातंत्र्याची, बंधनमुक्त आयुष्याची सवय लागलेली असते ती वेगळीच. पुष्कळदा ही मुले कौटुंबिक कलहाला कंटाळून बाहेर पडतात. अनेकदा त्यांच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार झालेले असतात. गरिबी, भूकमारी असेही प्रश्न कदाचित असतात.

मित्रांचा पगडा हासुद्धा घर सोडण्याचे एक कारण असते. एक आई जिचा मुलगा (आपण त्याला मन्या म्हणूया) सुमारे ३ वर्षांपूर्वी हरवला होता ती ‘चाइल्डलाइन’कडे आली होती. तिला अचानक कुठूनतरी त्या मुलाचा फोन आला. ‘चाइल्डलाइन’ने पोलिसांच्या सहकार्याने तो फोन मुंबईतील एका उपनगरातील पीसीओवर ट्रेस केला. त्या बापडय़ा आईला मुलगा जिवंत आहे एवढातरी दिलासा त्या फोनने मिळाला होता. परंतु त्यापलीकडे मुलगा सापडत नव्हता. त्याने केलेल्या उल्लेखावरून नांदेडयेथील एका ठिकाणचे नाव आले म्हणून पुणे-मुंबई-नांदेड अशा सर्वच ठिकाणी ‘चाइल्डलाइन’ व पोलिसांच्या मदतीने शोध घेतला; पण सुगावा लागला नाही. त्याच्याबरोबर पळून गेलेला एक मुलगा परत आल्याचे आईच्या बोलण्यात आले. त्या मुलाची जाऊन भेट घेतली. मोठय़ा मुश्किलीने त्याला बोलते केले. त्यावरून एका माणसाने भूलथापा देवून त्या मुलास मुंबईस नेले होते व तो मुलगा अधूनमधून घरी येवून आपल्या मित्रांना आपल्याबरोबर येण्यास उद्युक्त करतो, असे कळले. या मुलांना पाकीटमारीसाठी वापरण्यात येत होते व मन्यासारख्या मुलांना हाताशी धरून अधिकाधिक मित्रांना जाळ्यात ओढले जात होते. मन्याला अजिबात घरी जायचे नव्हते. गळ्यात व अंगावर भरपूर सोने वागवणाऱ्या फ्लेक्सवरील ‘दादासारखे’ मोठा डॉन होण्याचे त्याचे स्वप्न होते. निव्वळ बोरीबंदर ते कल्याण एवढेच आणि तेही रात्रीचे जग या मुलांना माहीत होते. पोलीस व स्थानिक ‘चाइल्डलाइन’ यांनी जंग जंग पछाडूनही शेवटपर्यंत ना त्या मुलांचा अड्डा सापडला ना ती मुले. काहींना सापडायचेच नव्हते. तर काही गायब केले गेले होते.

हरवलेल्यांच्या तक्रारीबाबत खूप बोलले जाते व तो एक सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. याचा गैरउपयोग कसा केला जातो हेही पाहू. एकदा परराज्यातील संस्थेने तेथील पोलिसांमार्फत त्यांच्या गावातील एक हरवलेली मुलगी ही पुण्यातील बुधवार पेठेत डांबून ठेवल्याचे व तिला सोडविण्यासाठी मदत करण्याचे ‘चाइल्डलाइन’ला आवाहन केले. तिच्या वडिलांनी आपल्या गावी हरवलेल्याची तक्रार दिलेली होती. जिवावर उदार होवून एका वेश्यागृहात लपवून ठेवलेली ही अल्पवयीन

मुलगी ‘चाइल्डलाइन’च्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढली व पोलिसांच्या ताब्यात दिली. पुढील कारवाई हाईपर्यंत तिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आले. तेथील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की ही मुलगी काही पहिल्यांदाच या धंद्यात आलेली नाही. नंतर बाहेर आले ते सत्य वेगळाच धडा देऊन गेले. मुलीला आधी विकायचे मग जास्त मोठे गिऱ्हाईक आले तर स्वत:च हरवल्याची तक्रार द्यायची. पद्धतशीरपणे गळे काढून स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस यांना कामाला लावायचे. मुलगी राजरोसपणे ताब्यात घ्यायची व पुन्हा मोठय़ा गिऱ्हाइकास विकायची असा हा हरवा-हरवीचा धंदा.

मुली हरविण्याचे किंबहुना नाहीशा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या समाजातील मुलीचे स्थान. सातत्याने दुजाभाव एकीकडे, तर लग्न या संकल्पनेबाबत लहानपणापासून निर्माण केलेला स्वप्नांचा महाल दुसरीकडे. याचा गैरफायदा घेणारे अनेक असतात. दोन गोड शब्द, थोडेसे प्रेम, थोडेसे लाड-भेटी वगैरे देणे याला मुली प्रेम समजतात. फिल्मी मनोवृत्तीने ‘सैराट’ होतात. लग्नाच्या भूलथापांना सुटकेचा मार्ग समजतात व पळून जातात.

अति दडपणे, अपेक्षांचे अवाजवी ओझे, पौगंडावस्था हीसुद्धा घर सोडण्याची/हरवण्याची कारणे असतात. अगदी छोटी मुले खूपदा सापडतात तेव्हा आई हरवली किंवा बाबा हरवले म्हणून सांगतात. वास्तविक हात सुटून अथवा आई-वडील गप्पांत अथवा अलीकडे तर मोबाइलमध्ये गुंतले म्हणून ही मुले गहाळ झालेली असतात.

मुळात मुले हरवतात किती व स्वत:ला हरवून घेतात किती हे वेगळे वास्तव दाखवण्याचा या लेखाचा उद्देश आहे. घरच्यांना धडा शिकवण्यासाठी घर सोडणारी, बाहेरच्या जगात अनेक सापळ्यात सापडतात. परतीची वाट क्वचितच मिळते. म्हणून लहानपणापासून या सर्वाची चर्चा घरात होणे व रागाने घर सोडलेले असो वा अथवा कोणी पळवलेले असो घरचे दरवाजे उघडे आणि घरच्यांची मायेची मिठी ही नेहमीच त्यांची असणार आहे काय वाट्टेल ते झाले तरी, ही खात्री मुलांना मिळाली पाहिजे.

गर्दीत जाताना मुलांच्या गळ्यात नाव पत्त्यांचे आयकार्ड घालणे हाही एक सुरक्षेचा मार्ग असतो. भारतभर ७८९ शहरांमध्ये ‘चाइल्डलाइन’ उपलब्ध आहे. त्यामुळे १०९८ वर मोफत दूरध्वनी करून मदत मागता येते. १०० हा पोलिसांचा क्रमांकही मदत करतो. हे सर्व मुलांना माहीत पाहिजे.

पश्चिम बंगालमधील वेश्या व्यवसायासाठी विकल्या जाणाऱ्या मुली असोत, बालकामगार म्हणून वेठबिगारीवर येणारे बालमजूर असोत, यांची पडताळणी हरवलेल्या मुलांच्या यादीशी सहसा केली जात नाही. तसेच सापडलेल्या अथवा परत आलेल्या मुलांची नोंद अभावानेच होते म्हणून हरवलेल्या मुलांच्या याद्या वाढतच जातात.

दिल्ली ‘चाइल्डलाइन’ला सापडलेला एक ७ वर्षांचा मुलगा निव्वळ पिंपरी या शब्दावरून पुण्यात आणला. त्याच्या  घराच्या वर्णनावरून काहीही कळत नव्हते. तो सांगत असलेले ‘नागोबाचे मंदिर’ कुठल्याही रेकॉर्डवर नव्हते. शेवटचा उपाय म्हणून आमचे कार्यकर्ते पपरी रेल्वे लाइन या एका संदर्भावरून आसपास फिरत राहिले. योगायोगाने आई सापडली. हरवलेल्याची तक्रार नव्हती. रेल्वे दिसली. गंमत म्हणून गाडीत चढला. झोप लागली तो दिल्लीत उतरला. नागोबाचे मंदिर कुठल्यातरी जाहिरातीच्या शूटिंगसाठी खरंच एका पारावर होते. हा मुलगा थोडय़ा दिवसाने धाकटय़ा बहिणीला घेवून परत गाडीत बसला. ‘‘चलो वहाँ अच्छा खाना मिलता है’’ असे म्हणून तिला घेवून दिल्लीला गेला व स्वत:लाच सापडवून दिल्लीच्या संस्थेत दाखल झाला. हेही एक हरवण्याचे वास्तव.

हरवलेल्या मुलांची नोंद सहसा पोलिसांकडे केली जाते. ‘चाइल्डलाइन’सारख्या संस्थांकडेही त्याची माहिती येते. भारत सरकार व ‘चाइल्डलाइन’ इंडिया यांनी मिळून ‘खोया-पाया’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. इतरही अनेक अशा सुविधा उपलब्ध आहेत. परंतु एकुणात या सर्वात समन्वयाचा अभाव जाणवतो. तसेच बालकामगार, बालवेश्या, बालभिकारी, विविध अनाथाश्रमात असलेली मुले, विविध रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणारी मुले, रेल्वेमधून फिरणारी मुले, देशात-परदेशात दत्तक गेलेली मुले अशा मुलांची गणना केल्यास अनेक हरवलेल्या मुलांचा माग लागू शकेल व त्याबरोबरच मुलांच्या वाहतुकीवर पायबंद बसेल. विविध खाती/संस्था/पोलीस अशा मुलांची सुटका/कारवाई करत असतात. परंतु एकमेकांकडील माहितीचा समन्वय होताना दिसत नाही. टाकून दिलेल्या मुलांची मुलांची नोंदही नसते. म्हणजेच प्रत्यक्ष हरवलेली किती हाही एक प्रश्नच आहे.

हरवलेले सापडतील, पण मुळात ते हरवू नयेत व हरवले तरी सापडावे अशी आपली योजना हवी.दत्तक मुले घेण्यासाठी वैधप्रक्रिया ही लांबलचक आहे. दत्तक मुलांची मागणी मोठी आहे. बाहेरच्या देशात मुले दत्तक द्यायची तर नियम अधिक कडक आहेत. शिवाय आपल्या देशात मूल दत्तक न गेल्यास बाहेरच्या देशातील अर्जाचा विचार करावा, असाही नियम आहे. मात्र बाहेरच्या देशात मूल दत्तक देणे हे आर्थिकदृष्टय़ा अधिक फायद्याचे असते. तसेच नियमांना बगल देण्यासाठी प्रत्यक्ष कायदेशीर दत्तक प्रक्रियेला बगल देणे सोपे असते. याचाच अर्थ मुलांचा बाजार फायदेशीर होऊ  शकतो. म्हणजेच मुले पळविणे व विकणे आले. अधिकतर तान्ही बाळे यात पळविली जातात. एका वडिलांनी तात्पुरती सांभाळायला म्हणून ३ मुले एका महाराष्ट्रातील अनाथाश्रमाकडे दिली. जेव्हा ते परत आणायला गेले. तेव्हा खोटी कागदपत्रे करून ती मुले परदेशात परस्पर दत्तक दिल्याचे त्याला समजले. अशा पद्धतीने ही मुले नाहीशी होतात.

गर्दीत जाताना मुलांच्या गळ्यात नाव पत्त्यांचे आयकार्ड घालणे हा एकसुरक्षेचा मार्ग असतो. भारतभर ७८९ शहरांमध्ये ‘चाइल्डलाइन’ उपलब्ध आहे. त्यामुळे १०९८ वर मोफत दूरध्वनी करून मदत मागता येते. १०० हा पोलिसांचा क्रमांकही मदत करतो. हे सर्व मुलांना माहीत पाहिजे.

 

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com