‘‘माध्यमांमध्ये चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या कामाने मला अनुभवांचा, आठवणींचा मोठा खजिना तर मिळवून दिलाच; शिवाय अनेक कर्तृत्ववान लोकांशी माझी मैत्री झाली. या मैत्रीने माझे आयुष्य समृद्ध केले. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिण्याच्या निमित्ताने मला खूप काही शिकण्याची संधी प्राप्त झाली. या लोकांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेच्या माध्यमातून करणार आहे. एका मैत्रीपूर्ण जगात राहण्याचे स्वप्न आपण सगळेच बघत आहोत याची जाणीव करून देणारी काही अनोखी स्थळे, संस्कृती, भाषा, सामाजिक संस्था याबद्दलही मी लिहिणार आहे. मी आयोजित केलेल्या आणि मला स्वत:ला अभिमानास्पद वाटणाऱ्या काही कार्यक्रमांबद्दलही मी लिहिणार आहे. हे कार्यक्रम आयोजित करण्याच्या, भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी जगप्रवास करण्याच्या संधी मला चौकस वृत्ती आणि अनुभवाच्या जोरावर कशा प्राप्त झाल्या हेही वाचकांना सांगायला मला आवडेल. दर पंधरवडय़ाने प्रसिद्ध होणारी ही लेखमाला म्हणजे ‘माझं जग’ माझ्या दृष्टीतून बघण्याचे माध्यम आहे.’’

विमला पाटील यांचे शिक्षण मुंबई आणि युनायटेड किंगडममध्ये झाले. इंग्रजी साहित्य, प्राचीन इतिहास आणि संस्कृती यात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतून एलएलबीही पूर्ण केले. लंडन विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर ‘द टेलिग्राफ’मध्ये त्यांनी प्रशिक्षार्थी म्हणून काम केले. त्यानंतर बिझनेस जर्नल ‘द ऑफिस मॅगझिन’मध्ये काम केले. भारतात परतल्यानंतर देशभरात आणि परदेशातही वाचक असलेल्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘फेमिना’ या स्त्रीविषयक नियतकालिकाच्या त्या वीस वर्षे संपादक होत्या. स्त्रियांचा समाजातला दर्जा उंचावण्याच्या आणि त्यांना अनेकविध संधी खुल्या करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी नियतकालिकाच्या माध्यमातून प्रयत्न केले. कला, फॅशन, पर्यटन आणि खाणे-पिणे आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?

मी  युनायटेड किंगडममध्ये पत्रकारितेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि अपार मेहनत घेऊन या क्षेत्रात पाय रोवले, तेव्हा या व्यवसायात फार कमी स्त्रिया होत्या. देशभरात आणि परदेशातही वाचक असलेल्या नियतकालिकामध्ये सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी मी घेतलेल्या कष्टांचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. ‘फेमिना’ नियतकालिकाच्या संपादकाच्या खुर्चीत बसण्याची संधी मला सलग वीस वर्षे लाभली त्यामुळे स्त्रिया आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम मला त्या माध्यमातून करता आलं. शिक्षणाच्या आणि उद्दिष्टपूर्तीच्या सगळ्या संधी प्रथम पुरुषाला मिळणार, कारण शेवटी कमावणार तोच, या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन आमच्या नियतकालिकाने वाचकांना केले. त्या काळातली प्रस्थापित नियतकालिके स्त्रियांना केवळ पुरुषांवर अवलंबून असलेल्या गृहिणींच्या रूपात बघत होती.

अर्थात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये बदल घडायला सुरुवात झाली होती. लष्कराला आघाडीवर लढता यावे म्हणून स्त्रियांना नागरी पुरवठय़ासारखी पिछाडीवरची कामे या काळात करावीच लागली. ही संधी भले लहानशी असेल, पण ब्रिटिश अमलाखालच्या भारतामध्ये राहणाऱ्या भारतीय स्त्रियांसाठी ही ‘स्वत:चा पैसा स्वत: कमावण्या’ची संधी होती. ब्रिटिश देश सोडून गेले ते किती तरी कल्पना आणि शक्यता मागे ठेवून. कोणत्याही रक्तपाताशिवाय युद्ध जिंकता येते आणि हे युद्ध जिंकून स्त्रिया जगात त्यांची स्वत:ची जागा मिळवू शकतात, ही कल्पना म्हणा किंवा शक्यता म्हणा, यातली सर्वात महत्त्वाची.

काहीसा गमतीशीर योगायोग म्हणजे मी पत्रकार झाले आणि नंतर वीस वर्षे ‘फेमिना’चे संपादकपद सांभाळले. स्त्रियांच्या जगात किती तरी अनोखे बदल आपण घडवून आणू शकतो या संधीची जाणीव मला म्हणूनच झाली.  नवनव्या कल्पनांच्या शोधात मी जगभर फिरले. जरमाइन ग्रीअर, केट मिलेट आणि सिमॉन द बुवांची पुस्तके वाचली. त्या आधारावर आपल्या कायद्यांमध्ये बदल घडवण्याची मागणी लावून धरली. या माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने जागतिक स्तरावरच्या अनेक सेलेब्रिटीजशी माझा संपर्क आला. महत्त्वाचे म्हणजे, माझ्या प्रयत्नांमुळे स्त्रियांच्या हक्कांसंदर्भातल्या कायद्यांमध्ये अनेक सुधारणा झाल्या. स्त्रियांचे आयुष्य बदलण्यात माझा हातभार लागला याचे खूप समाधान आहे. दुसऱ्या बाजूला माझे संगीतप्रेम आणि कलाप्रेम माझ्या आयुष्यात संगीत, वास्तुरचना, कला आदी क्षेत्रांतल्या असंख्य सेलेब्रिटीज घेऊन आले.

माझ्या आयुष्यातल्या त्या कालखंडाबद्दलच्या अनेक आठवणी मी येत्या काही महिन्यांत तुम्हाला सांगणार आहे. या लेखमालेचे शीर्षक अगदी समर्पक आहे : माझे जग. या मालिकेतल्या माझ्या लेखनाचे सार हेच आहे. स्त्रियांना शिक्षण देण्याचे, त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्व मी संपादकाच्या खुर्चीतून देशातल्या अशा कुटुंबांना पटवून देऊ  शकले. त्यानंतरच्या काही दशकांत हे नियतकालिक स्त्रियांची मैत्रीण झाले. नियतकालिकाच्या माध्यमातून मला जगभरातल्या सहसा कोणाला माहीत नसलेल्या, पण अनोख्या स्थळांना भेटी देण्याची आणि कला, फॅशन, पर्यटन आदी विषयांवर लिहिण्याची संधी मिळाली. आज माझी संपादक म्हणून अधिकृत कारकीर्द संपल्यानंतरही माझ्या कामामुळे माझे आयुष्य उजळून जातेय हे नक्की.

प्रवास- नवीन शोध आणि लेखन : मी नियतकालिकासाठी अनेक निमित्तांनी प्रवास केला. यातले एक निमित्त म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य देशांना भारत नावाच्या सुप्त अजगरामध्ये रस वाटू लागला. ब्रिटनशी आपली असलेली अदृश्य नाळ आता तुटलेली होती. अमेरिका आणि युरोपातल्या स्त्रिया भारताकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागल्या होत्या. भारतातल्या स्त्रियांनाही स्वत:कडे आधुनिक जगातल्या नागरिक म्हणून बघण्याच्या संधी खुल्या झाल्या होत्या. बऱ्याच गोष्टी स्वत: बघणे आणि लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक झाले होते. स्त्रियांचे जीवनमान बदलल्यानंतर जग बदलून गेले होते. भारतातही जगण्याच्या प्रत्येक अंगात या बदलाचे प्रतिबिंब दिसत होते.

भारताचे दर्शन जगाला : भारताची माहिती सर्वाना करून देण्याच्या अनेक नवनवीन संधी वेगाने बदलणाऱ्या आधुनिक जगाने आपल्याला देऊ केल्या. भारतात तयार होणारी असामान्य वस्त्रे जगाला दाखवण्यासाठी आम्ही ‘टेक्स्टाइल शो’ केले. भारतात डिझाइन केले जाणारे स्त्रियांचे पोशाख सोबत घेऊन मी जगभर प्रवास केला आणि त्या माध्यमातून भारतीय पोशाखांना एक बाजारपेठ मिळवून दिली. आम्ही किंवा अन्य यजमानांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सोहळ्यात भारतीय स्त्रिया सौंदर्य आणि दिमाखाच्या बळावर ठसा उमटवत होत्या. या सोहळ्यांच्या आयोजनाचा माझा अनुभव बघून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर भारत सरकारने ध्वनिप्रकाश (साऊंड अ‍ॅण्ड लाइट) सोहळे आयोजित करण्याची तसेच भारताबद्दलच्या माहितीचा प्रसार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. वेगाने फोफावलेल्या इंटरनेटच्या जाळ्यामुळे मला परदेशातही काम करण्याची संधी प्राप्त झाली. कोणाला फारशा माहीत नसलेल्या, चमत्कृतीपूर्ण स्थळांना भेटी देण्याचे योग आल्याने त्यावर मला लिहिता आले.

बुद्धिवंत, संशोधक आणि प्रवासी : आजूबाजूचे विस्तीर्ण जग अनेक बुद्धिवंतांच्या, संशोधकांच्या, अवलिया प्रवाशांच्या नजरेतून बघण्याच्या अनेक संधी मला माझ्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत लाभल्या. मला अनेक महान संशोधक, गाढे ज्ञानी, चौकस प्रवाशांना भेटून त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्यामुळे मी इतिहासातल्या अनेक आश्चर्याचा शोध घेऊ  शकले. त्यांनी प्रेरणा दिली नसती, तर भूतकाळाच्या पोटात शिरून वर्तमानाचा नव्याने शोध घेण्याचा अनुभव आणि आनंद मला कधीच घेता आला नसता.

महान वास्तुरचनाकारांनी स्थापिलेली जागतिक स्मारके मी बघितली आहेत. भारावून टाकणाऱ्या जीवनशैली मी बघितल्या आहेत. जगातल्या अप्रतिम स्मारकांना भेट देण्यासाठी मोठमोठय़ा बुद्धिवंतांचे मार्गदर्शन मला लाभले. यातले काही प्रसिद्धीच्या झोतात चमकत होते, तर काही प्रसिद्धीपासून दूर शांत आयुष्य जगणारे होते. एक पत्रकार म्हणून तर माझी कारकीर्द जादूई म्हणावी अशीच राहिली. हा माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे. म्हणूनच आता, मी पाठीमागे वळून माझ्या भूतकाळाकडे बघते आहे. या काळाच्या काही तुकडय़ांना मी तुमच्यासोबत- वाचकांसोबत, उजाळा देणार आहे.

 

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

 

विमला पाटील

chaturang@expressindia.com