मराठी सुगम संगीताची परंपरा समृद्ध आहे. संपन्न आहे. या परंपरेचे मानकरी म्हणजे प्रतिभावान संगीतकार, गायक-गायिका आणि कवी. या सर्वाचंच यातलं योगदान अभूतपूर्व आहे. त्यामुळेच त्यांनी निर्माण केलेली हजारो भावगीते हा मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. जे. एल. रानडे, जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर या मांदियाळीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रतिभावंत गीतकार-संगीतकार यशवंत देव! त्यांचं ‘समग्र देव‘दर्शन’ घडवणारं चरित्र अशोक चिटणीस यांनी लिहिलं आहे. आणि ते अतिशय वाचनीय व अभ्यासकांसाठी संग्राह्यदेखील आहे.

गेल्या पन्नास वर्षांत ३१ पुस्तके लिहिण्याचा आणि त्यातही चरित्रे लिहिण्याचा अनुभव असलेल्या चिटणीसांनी यशवंत देवांचे चरित्र लिहिताना कोणतीही कसर ठेवलेली नाही. देवांच्या वयोमानामुळे विस्मरणाचा धोका असूनही चिटणीसांनी देवांना बोलतं करून मराठी सुगम संगीताविषयीचे त्यांचे अनुभव नेमकेपणाने कथन केले आहेत. एका प्रतिभावान संगीतकाराची जडणघडण, त्यांच्यावरचे सांगीतिक संस्कार, त्यांची संपूर्ण वाटचाल या सगळ्याबद्दलची आपली उत्सुकता व कुतूहल हे पुस्तक पूर्ण करते.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
kolhapur marathi news, mahavikas aghadi marathi news
“परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून करूया”, शाहू छत्रपती यांची साद

‘मोबाइल स्कूल ते जे. कृष्णमूर्ती स्कूल’ या पहिल्याच प्रकरणात देवांचं पेणमधलं बालपण, घरातलं संगीतास अनुकूल वातावरण, दहाव्या-अकराव्या वर्षांपर्यंत नाटय़संगीत आणि शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार, गाण्याबजावण्याचे वडील त्र्यंबकराव यांनी दिलेले पाठ या सगळ्याचा विस्तृत उल्लेख येतो. लोकल प्रवासातही ‘देवेमंत्रां’ची संथा वडिलांनी दिली, असं त्यावेळचं एकंदरीत ‘मोबाइल स्कूल’ होतं-अशा आठवणी देव सांगतात. त्यावरून यशवंत देवांना लाभलेले त्र्यंबकरावांसारखे वडील हे त्याच काळात काय, आजही दुर्मीळ आहेत.

देवांनी सुरुवातीच्या काळात विवाहानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. ती सांभाळून ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. नंतर १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही.च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले.

देवांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. असे का घडले, याची त्यांनी केलेली  कारणमीमांसा यात वाचायला मिळते. त्याचा त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनातून तटस्थपणे विचार केला होता. त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे का मिळाली नाहीत याचे मुद्देसुद विवेचन त्यांनी केले आहे. अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करतात.. ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं.

या पुस्तकात देवांची आकाशवाणीवरची नोकरी, त्यातली त्यांची कामगिरी, विशेषत: ‘भावसरगम’मधून जन्माला आलेली त्यांची अनेक गाणी, कवी मंगेश पाडगांवकर यांचे साहचर्य, त्यांनी एकत्रित केलेली गाणी, ए. आर. दाते यांचं अरुण दाते असं केलेलं ‘बारसं’, सुरुवातीच्या काळात लता मंगेशकरांची ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’ आणि ‘कशी काळनागिणी’ ही गाणी ध्वनिमुद्रित करण्याची लाभलेली संधी (त्या वाद्यमेळाचं संचालन लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं.), या गाण्यांच्या उत्तम ध्वनिमुद्रणाबद्दल खुद्द लतादीदींनी दिलेली दाद, नंतरच्या काळात दीदींच्या गणपती आरतीच्या शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणण्यासाठी पं. हृदयनाथांनी देवांना खास बोलावणं, ती आठवण.. हे सारं अतिशय हृद्य असंच आहे.

देवांच्या आशा भोसले यांच्याबाबतच्या आठवणीही छान रंगल्या आहेत. त्यांना गाणं शिकवण्याचा अनुभव देव फार छान सांगतात. एका समारंभात आशाबाईंच्या हस्ते देवांना एक पुरस्कार दिला गेला. देवांनी आपल्या भाषणात आशाबाईंच्या आवाजाची खूप तारीफ केली. हे सुरू असताना मधेच उठून आशाबाईंनी त्यांना प्रश्न विचारला होता की, ‘मला एक सांगा, तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की दीदींचा?’ देवांनी एका क्षणात उत्तर दिलं होतं- ‘दीदींचा!’ ‘देवांविषयीचा आदर आणि प्रेम त्याक्षणी द्विगुणित झालं,’ असं आशाबाईंनी लिहिलं होतं. हा किस्सा अतिशय रंजक आहे.

देव किती भाग्यवान संगीतकार आहेत, हे सांगताना देवांना लाभलेले कवी, गायक-गायिका यांची यादी लेखक देतो. शिवाय ‘शब्दप्रधान गायकी’ या देवांच्या ग्रंथाला मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतला महत्त्वाचा भागही यात उद्धृत केला आहे. यशवंत देवांवर यापूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथातील देवांचे सांगीतिक विचार यातही वाचायला मिळतात. (डॉ. वीणा देव संपादित ‘शब्दसुरांचा सांगाती : यशवंत देव’!)

यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. ‘गुरू-शिष्याची अपूर्व भेट’ या प्रकरणात त्यांची प्रत्यक्ष भेट, त्यांचं देवांच्या शिवाजी पार्कवरील दोन खोल्यांच्या घरी येणं- हे सारं वर्णन अतिशय भावपूर्ण आहे. यात सचिन शंकर यांच्या ‘कथा ही राम-जानकीची’ (लेखन- गदिमा) या नृत्यनाटिकेच्या संगीत दिग्दर्शनाचा देवांचा अनुभवही आहे.

संगीत क्षेत्रात देवांनी जे काही अपूर्व केलेलं आहे त्या सगळ्याचा लेखाजोखा चिटणीस यांनी इथे खुद्द देवांच्याच आठवणींच्या स्वरूपात मांडला आहे. त्यामुळे ‘भावसरगम’ या रंगमंचीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यशवंत देव, आपल्या दोन्ही विवाहांबद्दल मोकळेपणे बोलणारे गृहस्थ यशवंत देव, जवळच्या मित्रमंडळींमध्ये आणि त्यांच्यासमवेत सहलींमध्ये रमणारे यशवंत देव, आचार्य रजनीशांचे शिष्यत्व स्वीकारणारे स्वामी आनंद यशवंत (देव), त्याबाबतचे आपले विचार सखोलपणे मांडणारे देव, सुगम संगीताच्या कार्यशाळांतून सुगम संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे अनेकांचे गुरू असलेले यशवंत देव,

व. पु. काळे, रवींद्र पिंगे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, डॉ. पाटील, गायिका उत्तरा केळकर, शोभा जोशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, योजना शिवानंद, कवी-गीतकार प्रवीण दवणे, गायक अरुण दाते, आशा खाडिलकर या सर्वानी ‘देव असे, देव तसे’ या प्रकरणात आपापल्या दृष्टिकोनातून देवांचे वर्णन केले आहे. शिवाय करुणाताई (देवांच्या द्वितीय पत्नी) आणि स्वत: यशवंत देव यांचे परस्परांबद्दलचे विचारही वाचनीय आहेत.

आजच्या काळातल्या संगीताविषयी, बदललेल्या तंत्राविषयी, ध्वनिमुद्रणाविषयी देवांचे विचार ‘चित्रपट गीत-संगीताच्या निमित्ताने’ या प्रकरणातून आपल्याला कळतात. या सर्व बदलांचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या नितळ, निरलस स्वभावामुळे ते कुणालाच नावं ठेवत नाहीत अथवा अकारण टीकाही करीत नाहीत. पण एरव्हीच्या आपल्या मिश्किल, नर्मविनोदी शैलीत भाष्य नक्कीच करतात.

पुस्तकाच्या अखेरीस यशवंत देवांचा जीवनपट, त्यांना लाभलेले पुरस्कार, त्यांची ग्रंथसंपदा आणि सुगम संगीत अभ्यासकांना महत्त्वाचं म्हणजे देवांनी स्वरबद्ध केलेली गाणी, त्यांचे तपशील अशी परिपूर्ण परिशिष्टंही आहेत.

‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’
– अशोक चिटणीस, नवचैतन्य प्रकाशन,
पृष्ठे- ३१२, किंमत- ३५० रुपये.

– अरुण नूलकर