विचारांची रुजवण भाषेमुळे होते. मराठी मौखिक परंपरेत गेली सुमारे सव्वासातशे वर्षे ती होत राहिली आहेच; पण लेखी, छापील आणि वाचनासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक मराठी गद्याची परंपराही किमान १४८ वर्षांची आहे. या वाटचालीतील निवडक वेच्यांद्वारे  भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे आणि आपण आज या वळणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, यासारखे प्रश्न सुजाण वाचकांना पडावेत याकरता हे सदर. यात ‘मराठी वळण’ पुढे नेणाऱ्या लेखकांच्या निबंधांतील वेचकअंश टिपणीसह असेल.

पहिले मानकरी आहेत- मराठी पत्रकारितेचे उद्गाते- ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर!

वॉल्टर बेंजामिन हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील जर्मन ज्यू विचारवंत. मात्र, त्याला एकोणिसाव्या शतकाचे आकर्षण फार. १९३० च्या दशकात लिहिलेल्या ‘पॅरिस- द कॅपिटल ऑफ नाइन्टीन्थ सेंच्युरी’ या त्याच्या गाजलेल्या निबंधात त्याने एकोणिसाव्या शतकाचा गौरव केला आहे. या शतकाकडे त्याने आधुनिकतेचा पूर्वेतिहास म्हणून पाहिले. पॅरिस हे त्याच्या मते या युरोपीय मन्वंतराचे केंद्र. हिटलरच्या नाझी घोडदौडीच्या त्या ऐन काळात तो एकोणिसाव्या शतकाचा सर्जक विचार करीत होता. भारतातही, विशेषत: महाराष्ट्रासाठी एकोणिसावे शतक असेच महत्त्वाचे. किंबहुना, या एकाच शतकात अनेक शतके सामावलेली होती, इतके ते मोठे होते. आणि पुणे हे त्याचे केंद्र असेही म्हणता येईल. याचे कारण आपल्याकडे घडलेले प्रबोधनपर्व. त्याचा प्रारंभ झाला तो १८१८ साली. पेशवाई बुडून इथे ब्रिटिशांची राजवट आली तेव्हापासून. या काळात इथल्या नवसर्जनाला सुरुवात झाली. येथे ‘नवसर्जन’ असा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे या काळात नव्या युगजाणिवा आकार घेत होत्या. आणि त्या व्यक्त करण्यासाठी मराठीत नवे गद्यलेखनाचे पर्व निर्माण होऊ घातले होते. नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी (१८१५), पुणे पाठशाळा (१८२१), हैंद शाळा शाळापुस्तक मंडळी (१८२२), सरकारी छापखाना (१८२४), पुढे १८२५ मध्ये जॉर्ज जाव्‍‌र्हिस याने सुरू केलेली भाषांतराची योजना यांसारख्या प्रयत्नांनी इथे शिक्षणप्रसार झाला. या काळात ग्रंथनिर्मितीला चालना मिळाली. छापखाने, वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वक्तृत्व सभा, चर्चा मंडळे आदींचे आकर्षण इथल्या समाजात निर्माण झाले. लोकशिक्षण, नव्या विद्याशाखांचा अभ्यास यांच्याविषयी आस्था उत्पन्न होऊ लागली. व्यक्ती ही महत्त्वाची असते याची जाणीव याच काळात इथल्या समाजाला झाली. त्यामुळे व्यक्तीच्या हक्कांची, तिच्या विकासाची भाषा होऊ लागली. ही भाषा नवे रूप घेऊन आली. तिने नवे गद्यस्वरूप धारण केले. ती बोलणारा व लिहिणारा नवा मध्यमवर्ग उदयास आला. त्याची सुरुवात ‘दर्पण’ या साप्ताहिकाने झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘दर्पण’ची सुरुवात झाली ६ जानेवारी १८३२ रोजी. त्याला या आठवडय़ात १४८ वर्षे पूर्ण होतील. बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे कर्ते. ‘दर्पण’च्या पहिल्या अंकातील ‘नियतकालिक लेखांपासून स्वार्थ’ या लेखात त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका अशी..

‘‘जो उद्योग आम्ही योजिला आहे त्याचा प्रारंभ करतेवेळेस नियत कालिक लेखांपासून जे स्वार्थ होतात त्यांविषयींचा कांहीं गोष्टी या स्थळीं लिहिणें हें अयोग्य नव्हे. या नियत कालिक लेखांची पद्धति आणि उपयोग, हें वर्तमानपत्र वाचणाऱ्या एतद्देशीय लोकांतून बहूतांचे समजण्यांत बहूधा आले नसतील; आणि मुंबईबाहेरचे मुलुखांत तर ही गोष्ट विचारांत आलीच नसेल. हिंदुस्थानचे विद्यांत या लेखांस दृष्टांत द्याया जोगें सांप्रत कांहीं नाहीं, आणि- सांप्रतचे राजांचा अमल व्हायाचे पूर्वी या देशांत या जातीचे लेख होते, असें कोठे प्राचीन बखरांतही आढळत नाहीं. जा देशांतून आपले सांप्रतचे शककर्ते एथे आले त्या देशांत ते एथे आल्याचे पूर्वी फार दिवसांपासून या आश्चर्यकारक छापयंत्राचीं कृत्यें चालू होतीं. त्यांपासून मनुष्यांचे मनांतील अज्ञानरूप अंधकार जाऊन त्यांवर ज्ञानरूप प्रकाश पडला. या संज्ञानदशेस येण्याचे साधनामध्यें इतर सर्व देशांपेक्षें युरोपदेश वरचढ आहे. नियत कालिक लेखांपासून जें स्वार्थ होतात, ते आम्हांस सांप्रतचे राजांचे द्वारे माहित झाले. जा जा देशांमध्यें अशे खेडांचा प्रचार झाला आहे, तेथे तेथे लोकांचे आंतर व्यवहारांमध्यें तसेंच व्यवहारामध्यें शाश्वत हित झालें आहे. यांपासून बहूतवेळ विद्यांची वृद्धी झाली आहे. लोकांमध्ये नीति रुपास आली आहे. केव्हां केव्हां प्रजांनी राजाचे आज्ञेंत वर्तावें आणि राजानींही त्यांवर जुलुम करूं नये अशा गोष्टी यांपासून घडल्या आहेत. आलीकडे कितेक देशांत धर्मरीति आणि राज्यरीति यांत जें चांगले आणि उपयोगी फेर फार झाले आहेत त्यांसही थोडे बहूत हे लेख उपयोगी पडत आहेत..’’

अशा शब्दांत नव्या गद्यलेखांचे- अर्थात निबंधाचे महत्त्व सांगून ते पुढे लिहितात..

‘‘विद्येपासून आणि सरळ बुद्धीपासून जीं फळें होतात त्यांचे यथार्थ ज्ञान युरोपियन लोकांशी बहूत दिवस सलगीचें संघटन पडल्यामुळें बंगालचे लोकांस झालें आहे. तेथे विद्या वाढण्यास आणि सरळ बुद्धि होण्यास कारणें मुख्यत्वें करून दोन; एक सर्व विद्यालय म्हणजे सर्व विद्यांची शाळा, आणि दुसरें तेथें जीं बहूत तद्देशीय वर्तमानपत्रें छापून प्रसिद्ध होतात तीं. बरें असेच उपाय एथे केले तर अशीं फळें न होतील कीं काय?.. आतां विद्या व्यवहाराचें द्वार असें एक वर्तमान पत्र पाहिजे, कीं जांत मुख्यत्वें करून एतद्देशीय लोकांचा स्वार्थ होईल, जापासून त्यांची इच्छा आणि मनोगतें कळतील, जवळचे प्रदेशांत आणि परकीय मुलुखांत जीं वर्तमानें होतात तीं समजतील, आणि जे विचार विद्यांपासून उत्पन्न होतात आणि जे लोकांची नीति, बुद्धी, आणि राज्यरीति यांचे सुरूपतेस कारण होत, तें विचार करण्यास उद्योगी, आणि जिज्ञासु मनांस जापासून मदत होईल.’’

‘दर्पण’चा हा पहिला अंक ‘मेसेंजर प्रेस नंबर १, काळबादेवी रोड, येथें कावसजी करसेटजी नावाच्या पारशी गृहस्थांनी रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाच्या गृहस्थाकरिता छापून प्रसिद्ध केला,’ अशी नोंद आहे. दर्पण पुढे सुमारे आठ वर्षे सुरू राहिले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत ते प्रसिद्ध होत असे. पुढे २ मार्च १८३२ रोजी लिहिलेल्या ‘विद्वान आणि मूर्ख, या दोहोंमध्यें अंतर’ या लेखात बाळशास्त्री जांभेकर लिहितात..

‘जें सरकार विद्येचे वृद्धीस आश्रय देतें आणि प्रजांत उपयोगी ज्ञानाचा प्रसार होण्यास उमेद देतें, तेथे मनास विद्येचा संस्कार करण्यास लोकांस विशेष उत्साह होतो, आणि जुलुमगारांचे अंमला पेक्षें तशे राज्यांत हे उद्योग अधिक सफळ होतात. अशे उद्योगांपासून विद्या सुरूपास येत्ये, आणि लोकांचा ज्ञान संग्रह वाढतो. एके पिढीचे लोक नवे शोध करितात, त्यांपासून दुसरे शोध पुढली पिढी करित्ये. यारीतीनें विद्या आणि कळा वाढतात आणि ज्ञानाचा लवकर प्रसार होतो. परंतु आपलीं मनें चांगले मार्गास लावणें हें जितकें लोकांचे स्वाधीन आहे तितकें राजाचें नाहीं, हें आमचे लोकांनी ध्यानांत धरावें; आणि हें दुसरें लक्ष्यांत ठेवावें कीं जांस विश्वास संपादन करायाचा आहे, त्याणीं जर आपले मनांतील द्वेषबुद्धि घालविली नाही तर त्यांचा उद्योग फुकट जाईल.. पुष्कळ असे आहेत कीं ते सर्व नव्या गोष्टींचा तिरस्कार करितात; बहूत लोक चांगले जांचे परिणाम असे फे रफारांवर ही दोष ठेवितात; कारण कीं ते आळशी असतात. आणि मुळापासून आपण व आपले पूर्वी वडील जसें करीत व मानीत आले आहेत तसें करण्याची त्यांस मोठी आवड असत्ये. तेव्हां अशा कल्पना मनांतून काढून टांकाव्या तेव्हां मन सत्य ग्रहण करण्यास योग्य होतें.’’

‘दर्पण’मध्ये पुढे विविध विषयांवर स्फुटलेखन झालेले आहे. मराठी समाजाचे घडत्या काळातील प्रतिबिंब या लेखनातून दिसते. ‘दर्पण’मधल्या काही उताऱ्यांचा संपादित संग्रह आज उपलब्ध आहे. जांभेकरांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे अल्पचरित्र आणि ‘दर्पण’मधील काही लेखांचा समावेश असलेले ‘दर्पणसंग्रह’ हे पुस्तक १९४६ मध्ये प्रकाशित झाले होते. विनायक कृष्णा जोशी व श्री. म. सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेले हे पुस्तक मुंबईच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने प्रसिद्ध केले होते. हा छोटेखानी संग्रह वाचायलाच हवा असा आहे. ‘मराठी वळणा’च्या प्रारंभाच्या खुणा त्यातून नक्कीच दिसतील!

संकलन : प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com