तमिळनाडूच्या राजकीय क्षितिजावरून जयललिता यांचे आकस्मिक अस्तंगत होणे हे येथील आजवरच्या द्रविड राजकारणाच्या आमूलाग्र स्थित्यंतराची नांदी ठरू शकते. जयललितांची ‘लार्जर दॅन लाइफ’, गूढ प्रतिमा आणि त्यांचे एकारलेले, अधिकारशाहीवादी राजकारण यामुळे पर्यायी नेतृत्वच अण्णाद्रमुकमध्ये उभे राहू शकले नाही. परिणामी आता नेतृत्वहीन झालेल्या या पक्षाची मोठीच कसोटी आहे. या साऱ्या घडामोडींचे विश्लेषण करणारा लेख..

एखाद्या वलयांकित नेत्याच्या पश्चात त्याचा वारसा सांगत स्वतचं नेतृत्व प्रस्थापित करणं ही काही सोपी गोष्ट नाही. जयललिता यांनी एमजीआर यांच्या पश्चात ते करून दाखवलं. पक्षातून, एमजीआर यांच्या निकट वर्तुळातून आणि खुद्द त्यांच्या पत्नीकडून विरोध होत असूनही पक्ष काबीज करण्यात त्या यशस्वी झाल्या. इतकंच नाही तर एमजीआर यांचा वलयांकित वारसा स्वतकडे वळविण्यातदेखील त्यांना यश आलं. १९८७ मध्ये सुरू झालेला त्यांचा संघर्ष वरकरणी पुढच्या दोन-तीन वर्षांत संपला आणि त्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा बनल्या खऱ्या; पण तिथून पुढची पाव शतकापेक्षा दीर्घ काळाची त्यांची वाटचाल हीदेखील सतत संघर्षांची राहिली.

The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

परावíतत वलय स्वतविषयीच्या मिथकात रूपांतरित करणं ही गोष्ट खरं तर सोपी नाही. एमजीआर यांचा वारसा सांगत जयललितांनी स्वतची एक कठोर, अथांग आणि स्वकेंद्रित प्रतिमा निर्माण केली. आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती आणि राजकीय नेतृत्वाभोवती गूढपणाची झालर निर्माण करून जयललिता या नुसत्या हजारो तमिळ अनुयायांच्या ‘अम्मा’ बनल्या असं नाही, तर ‘पुरच्छी थलवी’ म्हणजे ‘क्रांतिकारक नेत्या’ म्हणूनदेखील त्यांनी तमिळ जनमानसावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळेच राजकीय प्रवासाच्या आरंभी जरी त्यांचा भर एमजीआर यांच्याभोवतीच्या वलयाच्या परावíतत लौकिकावर राहिला, तरी पुढे त्या स्वतंत्र प्रतिमेच्या आणि लोकप्रियतेच्या धनी बनल्या.

राष्ट्रीय राजकारणातील स्थान

तब्बल तीन दशकं तमिळनाडूच्या आणि देशाच्या राजकारणात त्या एक महत्त्वाच्या नेत्या म्हणून वावरल्या. द्रमुकची भूमिका पूर्वापार काँग्रेसविरोधाची होती. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात काँग्रेसची मदत घेत आणि त्या बदल्यात केंद्रात काँग्रेसच्या बरोबर राहत त्यांनी राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात आपलं बस्तान बसवलं. १९९८ मध्ये त्या भाजपाबरोबर गेल्या. २००४  मध्येदेखील त्यांनी भाजपाला साथ दिली. राष्ट्रीय राजकारणातील या अस्वस्थ द्विध्रुवीयतेमध्ये आपण तिसरी शक्ती  बनण्याचं आकर्षण त्यांना या टप्प्यावर सतत राहिलं. परिणामी काँग्रेस आणि भाजपा दोहोंपासून फटकून राहून त्यांनी बराच काळ वाटचाल केली. तमिळनाडूत या दोन्ही पक्षांच्याशिवाय निवडून येता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आणि राज्याच्या राजकारणाचं निखळ प्रादेशिक स्वरूप अधोरेखित केलं. पण २०१४ मध्ये भाजपाच्या बरोबर न जाण्याचा त्यांचा निर्णय मात्र राष्ट्रीय राजकारणातील त्यांचं महत्त्व अचानक कमी करणारा ठरला. कारण भाजपाच्या बरोबर तर जायचं नाही, आणि तरीही भाजपाच्या थेट विरोधाचं राजकारणदेखील करायचं नाही, ही कसरत राज्यापुरती यशस्वी झाली तरी राष्ट्रीय रंगमंचावर त्यांना काहीशी महाग पडली. त्यातच आधी भ्रष्टाचाराच्या खटल्यांचं शुक्लकाष्ठ आणि मग आजारपण यांमुळे त्यांच्या राजकीय वाटचालीच्या शेवटच्या दोनेक वर्षांमध्ये त्या राष्ट्रीय रंगमंचावरून काहीशा मागे पडलेल्या दिसल्या.

द्रविड चळवळीची विस्मृती

द्रविड चळवळीमधून द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष निर्माण झाले. त्यामुळे द्रविड चळवळीचा कोणता वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला, किंवा वृद्धिंगत केला, हा प्रश्न या दोन्ही पक्षांच्या बाबतीत प्रस्तुत ठरतो. ब्राह्मण वर्चस्वाला विरोध, उत्तर भारतीय सांस्कृतिक प्रतीकं आणि उत्तर भारत-केंद्री राष्ट्रवाद यांचा प्रतिवाद आणि बहुजन कल्याणाच्या कल्पनेभोवती साकारलेला प्रादेशिकवाद या मुद्दय़ांच्या भोवती द्रविड चळवळ आकाराला आली. अर्थात पक्षीय राजकारणात हे मुद्दे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे आणि कमी-अधिक तीव्रतेने पुढे आले. तिथला जातीचा प्रश्न हा आधी ब्राह्मणविरोध आणि नंतर आरक्षणाचं राजकारण यांच्यामध्ये रूपांतरित झाला. राष्ट्रवादाचा बहुविधतावादी विचार आणि व्यवहार घडविण्यापेक्षा तिथे स्वतंत्र भाषिक अस्मिता हा मध्यवर्ती मुद्दा राहिला आणि प्रदेशवाद उभा राहताना बहुजन हिताचा मुद्दा अलगद मागे पडला. जयललितांच्या नेतृत्वाखाली  जे राजकारण उभं राहिलं त्यात द्रविड चळवळीची ही विस्मृती ठळकपणे जाणवते.

एका परीने द्रविड चळवळीच्या अनेक टोकदार भूमिका सौम्य होत जाण्याची जी प्रक्रिया १९४८ पासून सुरू झाली, त्याचाच एक टप्पा म्हणून जयललिता यांच्या राजकारणाकडे बघता येईल. प्रथम अण्णादुराई यांनी द्रविड चळवळीमधील प्रादेशिक राष्ट्रवाद सौम्य करून पक्षीय राजकारण सुरू केलं. मात्र, त्याची भरपाई म्हणून त्यांनी ठाम काँग्रेसविरोध जारी ठेवला आणि भाषेचा प्रश्न मध्यवर्ती बनवून राजकीय स्वातंत्र्याऐवजी सांस्कृतिक भिन्नता जोपासण्यावर भर दिला. एमजीआर यांनी थेटपणे जरी यापेक्षा वेगळी भूमिका घेतली नाही तरी त्यांनी स्वतच्या नव्या पक्षाला ‘अखिल भारतीय’ असं नामाभिधान जोडून उत्तर भारतीय राष्ट्रवादाशी तह केला. जयललिता यांनी पुढच्या काळात राज्यात हिंदू दैवतं आणि प्रतीकं यांच्या आधारे हिंदू संघटन होत असताना त्याच्याकडे काणाडोळा करून हिंदू मुन्नानीसारख्या संघटनेला अवसर मिळवून दिला. द्रविड राजकारणाची आणि प्रादेशिक अस्मितेची भूमिका जसजशी विस्कळीत होत गेली तशी राज्यात वैचारिक-सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली. आणि पर्यायी अशा नव्या सांस्कृतिक भूमिका घेण्यास द्रमुक तयार नव्हता आणि जयललिता ते करायला समर्थ नव्हत्या. त्यातच काँग्रेस-उत्तर कालीन नव्या राजकीय व्यवस्थेचे बिगूल राष्ट्रीय पातळीवर वाजत होते आणि त्यांचा आवाज दोन्ही तमिळ पक्षांना खुणावत होता. त्यामुळे स्वायत्त प्रादेशिक-सांस्कृतिक भूमिका घेऊन द्रविड राजकारण पुढे चालविण्यापेक्षा स्वतच्या नेतृत्वाची व्याप्ती वाढविण्याच्या बदल्यात तमिळ राजकारणात भाजपाला काही प्रमाणात शिरकाव करू देणं जयललितांनी पसंत केलं.

प्रतिमेत गुरफटलेलं राजकारण

एकीकडे द्रविड चळवळीचा वारसा सौम्य करण्यात जरी जयललितांचा हातभार लागला असला तरी त्यांनी दोन वेगळ्या संदर्भामध्ये तमिळ राजकारणाचं वेगळेपण टिकवून ठेवलं. एक म्हणजे चित्रपटसृष्टी आणि प्रतिमांचं विश्व यांची राज्याच्या राजकारणावरची पकड त्यांच्या काळात टिकून राहिली. वर उल्लेख केलेल्या त्यांच्या ‘परावíतत वलया’त  एमजीआर यांच्या अभिनय कारकीर्दीचा जसा वाटा आहे, तसाच त्यांच्या स्वतच्या चित्रपट कारकीर्दीचादेखील वाटा आहे. राजकीय कार्याच्या आणि कौशल्याच्या आधी चित्रपटातील प्रतिमा आणि पडद्यावरच्या प्रतिमांची लोकप्रियता यांच्यामार्फत जनमानसात स्थानापन्न होण्याचं हे वैशिष्टय़ तमिळनाडूत सातत्यानं कामी येताना दिसतं. आणि त्यामुळे प्रतिमासृष्टीच्या पॅरॅशूटमधून राजकीय भूमीवर अलगद येऊन उतरणाऱ्या नेत्यांची संख्या तिथे मोठी आहे. जयललिता यांच्या राजकारणाचा मार्गदेखील असाच चित्रसृष्टीतून सुरू झाला आणि त्यांची गूढ लोकप्रियता टिकवण्यात या प्रतिमानिर्मितीच्या राजकारणाचा मोठा वाटा राहिला. पडद्यावरच्या नायक-नायिकेइतक्याच त्या प्रतिमेमार्फत लोकांच्या जवळ राहिल्या; आणि तरीही दूर राहिल्या. आणि त्यांचं हे अंतर त्यांच्या लोकप्रियतेच्या आड आलं नाही, कारण त्यांची लोकप्रियता हीच मुळी दूरस्थ आणि अनामिक अशा काल्पनिक प्रतिमेवर आधारलेली ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. एका परीने त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांना द्रविड चळवळीचं राजकारण न करतादेखील त्या चळवळीचा वारसा सांगणं शक्य झालं. एमजीआर हे जरी दीर्घकाळ द्रमुकमध्ये असले तरी त्यांच्या राजकारणात द्रविड चळवळीच्या वारशापेक्षा त्यांच्या प्रतिमेचा वारसा मोठा होता. ती परंपरा जयललितांनी पुढे चालू ठेवली.

लोकैकवाद

तमिळ राजकारणाचं दुसरं एक वैशिष्टय़ त्यांनी पुढे चालू ठेवलं. तमिळ राजकीय चर्चाविश्व द्रविड अस्मितेच्या मुद्दय़ापासून बाजूला काढून त्याची एक नवी, निखळ लोकवादी आवृत्ती एमजीआर यांनी निर्माण केली आणि जयललिता यांनी त्याच चौकटीत राहून सतत सामान्य (आश्रित आणि परावलंबी) ‘लोक’ या कोटीक्रमावर भर देत वाटचाल केली. द्रमुकचं राजकारणदेखील लोकवादी (किंवा लोकैकवादी- populist) पद्धतीचंच राहिलं; पण त्यात द्रविड अस्मितेवर भर राहिला आणि आग्रही, आक्रमक अशा अस्मितेच्या भूमिकेमुळे तो लोकैकवाद हा काहीसा संघर्षप्रवण ठरला. एमजीआर आणि जयललिता यांनी कल्याणकारी लोकवादाचा जास्त पाठपुरावा केला. लोकहिताच्या विविध योजना हे तमिळनाडूच्या सार्वजनिक धोरणाचं नेहमीच वैशिष्टय़ राहिलं आहे. थेट कामराज यांच्या काळापासून ही परंपरा सुरू झाली आणि अण्णाद्रमुकच्या राजवटीत ती सतत बहरत राहिली. जयललिता यांनी ‘अम्मा’ हे बिरुद मिळवलं ते केवळ प्रतिमानिर्मितीच्या कौशल्यातून नाही, तर गरीबांसाठीच्या, स्त्रियांसाठीच्या, निराधार व्यक्तींसाठीच्या अनेकविध योजना आखून, त्या अमलात आणून आणि त्यांची पुरेशी जाहिरात करून ते शक्य झालं. त्यामुळे मध्यमवर्ग आणि माध्यमं यांना दिसणाऱ्या काहीशा अलिप्त, रागीट, अकार्यक्षम आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचाराचे आणि अमाप संपत्तीच्या बेहिशेबी मालकीचे आरोप असणाऱ्या जयललिता आणि सामान्यांच्या मनात ठसलेल्या कल्याणकारी योजनांच्या करत्याकरवित्या अम्मा जयललिता अशा द्विविध रूपांत त्यांचं राजकारण साकारलं.

अर्थात, गेल्या दशकभरात तमिळनाडू आíथकदृष्टय़ा मागे पडायला लागला आहे. तिथे उद्योग आणि नोकरीच्या संधी आकुंचित होत आहेत आणि त्यामुळे भरमसाट कल्याणकारी योजना चालू ठेवणं ही जोखीम आहे. पण एकीकडे स्वतच्या अतिशयोक्त प्रतिमेच्या तुरुंगात बद्ध झालेल्या जयललिता यांना त्यातून मार्ग काढणं जिकिरीचं होतं. आणि दुसरीकडे पक्ष आणि प्रशासन यांच्यातून चर्चा आणि मतभेद हद्दपार केले असल्यामुळे आपल्या लोकवादी राजकारणाचा किल्ला कसा आणि किती प्रतिकूलतेने घेरला आहे याची त्यांना फारशी कल्पनादेखील आली नसणार. त्यामुळे त्यांच्या पश्चात आता त्यांच्या पक्षाला दुहेरी आव्हानाला सामोरे जावे लागेल. एक तर उत्तुंग नेतृत्व हरपल्यामुळे पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. उत्तर भारतातील ‘पायलागू’ संस्कृतीला लाजवील अशी लोटांगण संस्कृती त्यांनी निर्माण केली आणि त्यातून आता ही पोकळी पक्षापुढे आ वासून उभी राहणार आहे. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांच्या आíथक उतरणीच्या पाश्र्वभूमीवर राज्याचा गाडा चालवताना अण्णाद्रमुकच्या सरकारची दमछाक होणार आहे. परिणामी नव्या सरकारला केंद्रावर अधिकाधिक अवलंबून राहावे लागेल. एमजीआर आणि जयललिता यांच्या लोकवादी कल्याणकारी धोरणांची जागा नव्या भावनिक उद्रेकाच्या राजकारणाने घेतली तर ते नक्कीच अनपेक्षित नसेल.

पुढे काय?

एकखांबी पक्षांचे नेते काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा नेहमीच त्या पक्षांच्या भवितव्याची आणि त्या पक्षांनी व्यापलेल्या राजकीय-सामाजिक अवकाशाच्या विल्हेवाटीची चर्चा होते. अण्णाद्रमुक या पक्षाचं आता पुढे काय होणार, आणि तमिळनाडूच्या राजकारणात कोणत्या नव्या शक्यता निर्माण होणार, याबद्दल साहजिकच आता चर्चा सुरू होईल. जयललिता यांनी पक्षात नेते उभे राहू दिले नाहीत, पण पक्षाला सतत जिंकून दिलं आणि एक स्पष्ट प्रतिमा मिळवून दिली. त्यामुळे नेते नसूनदेखील हा पक्ष अचानक नाहीसा होईल अशातला भाग नाही. दीर्घकाळ फक्त दुय्यम स्थान मिळत गेलेल्या नेत्यांना आता कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल, किंवा अण्णाद्रमुक दुसऱ्या एखाद्या प्रतिमाप्रवीण नेत्याला डोक्यावर घेऊन त्याच्या लोकप्रियतेचा भार वाहत राहील.

पण एकीकडे द्रमुकमध्ये चालू असलेलं पक्षांतर्गत स्थित्यंतर आणि दुसरीकडे जयललिता यांचं काळाच्या पडद्याआड जाणं यामुळे तमिळनाडूच्या राजकारणाच्या पुनर्माडणीचा क्षण आला आहे. गेली दहा किंवा त्याहून जास्त र्वष तिथल्या द्विपक्षीय राजकारणात अनेक नवे पक्ष शिरकाव करू पाहत आहेत, द्रमुक आणि अण्णाद्रमुक दोघेही सतत आघाडय़ा करून वाटचाल करीत आहेत, हे लक्षात घेतलं तर जयललितांचा पक्ष संपला नाही तरी राज्यातील पक्षीय चौकट बदलेल, हे निसंशय. या बदलांमध्ये फक्त प्रादेशिक पक्ष शिरकाव करतील की काँग्रेस आणि भाजपा यांनाही तिथे संधी मिळेल, हा खरे तर सर्वात रोचक मुद्दा ठरणार आहे. काँग्रेसकडे असलेला लवचीकपणाचा आणि राजकीय चातुर्याचा अभाव लक्षात घेता भाजपासाठी तमिळनाडूतील हे स्थित्यंतर अधिक लाभदायक ठरू शकेल.

वारसा

व्यक्तिमत्त्वाचं गूढ, पराकोटीची लोकप्रियता आणि सार्वजनिक नीतिमत्तेचा संदिग्धपणा यांच्या द्वैतात अडकलेलं राजकारण, नेतृत्वविहीन पक्षाचा पसारा, अमाप संपत्तीचे वारेमाप आक्षेप, अतोनात एकाकीपणा अशा कितीतरी गोष्टींचा वारसा मागे ठेवून जयललिता यांची राजकीय वाटचाल त्यांच्या मृत्यूने थांबवली. भारतीय लोकशाहीतच जणू या सगळ्या गुंत्यांचा समावेश होतो. भारताच्या लोकशाही राजकारणात नेतृत्व आणि अधिकारशाही यांची सीमारेषा नेहमीच पुसट राहत आली आहे. लोकशाही म्हणजे लोकप्रियता की लोकशाही म्हणजे लोकांमध्ये कत्रेपणाची ऊर्जा निर्माण करणं, हा पेच सतत डोकं वर काढत राहिला आहे. जयललिता यांची नेतृत्वशैली आणि कार्यपद्धती यांच्यामधून आपल्या लोकशाहीच्या या सगळ्या संदिग्धता अधोरेखित होतात.

सुहास पळशीकर –  suhaspalshikar@gmail.com