सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

विजेती जोडी
भारताच्या सानिया मिर्झानं स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीनं डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकाविलंय. महिला दुहेरीत टेनिस जगात सानिया-हिंगीस जोडीनं आपला दबदबा कायम राखलाय. त्यामुळं सानिया आणि मार्टिना हे टॉपिक ट्रेण्डमध्ये होते. सानिया आणि मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा विक्रमही नोंदविलाय. त्यांनी या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हानं सानिया आणि मार्टिनाला डब्ल्यूटीए अंतिम फेरीत विजेतेपदाचा करंडक प्रदान केला.

धकधक गर्ल इन बाहुबली..
बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वलमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा सोशल नेटवर्किंग साइटवर रंगली होती. त्यामुळं माधुरी, बाहुबली- द कन्क्लूजन हे हॅशटॅग ट्रेडिंगचा विषय ठरले. ‘बाहुबली’तील जवळपास सगळेच कलाकार सिक्वेलमध्ये पाहायला मिळणार असून त्यात माधुरी दीक्षितही भूमिका करणार असल्याची चर्चा होतेय. माधुरी अनुष्का शेट्टीच्या म्हणजेच कुंतला राजवंशच्या राणीची भूमिका साकारेल, असा अंदाज बांधला जातोय.

बर्थ डे बॅश
जगतसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनला नेटकरांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. ‘जज्बा’मधल्या तिच्या दमदार पुनरागमनानंतर तिच्या चाहत्यांचा उत्साह वाढलाय. असंख्य प्रेक्षकांच्या लाडक्या शाहरुख खानच्या वाढदिवासाच्या दिवशी ‘मन्नत’वर होणाऱ्या गर्दीप्रमाणंच सोशल मीडियावरूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षांव त्याच्या ‘फॅन्स’नी केला. ऐश्वर्या नि शाहरुखला शुभेच्छांसह त्यांच्या चित्रपटांतली गाणी, संवाद नि तिचे फोटोही नेटकरांनी अपलोड केले.

न्यू रिलिज
कोवनना अटक

चेन्नईत दारूविरोधात जनजागृती करणारे तमिळ लोकगायक कॉम्रेड एस. शिवदास ऊर्फ कोवन यांचं लोकगीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना चांगलंच झोंबलंय. या लोकगीतामध्ये जयललिता यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा ठपका ठेवत तमिळनाडू पोलिसांनी कोवन यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. कोवन हे ‘मक्कल कलाई लक्किया काझागम’ या विद्रोही चळवळीशी संबंधित आहेत. कोवन यांचं हे लोकगीत सोशल मीडियामध्ये गाजतंय. या अटकेसंदर्भात ट्विटरवर कोवन, चेन्नई या हॅशटॅगची उलटसुलट चर्चा सुरू होती.

अ फ्लाईंग जाट
‘हिरो’ म्हणून एन्ट्री झालेल्या टायगर श्रॉफचा ‘अ फ्लाईंग जाट’ या चित्रपटाचं पोस्टर रिलिज करण्यात आलंय. रेमो डिसुझाच्या या चित्रपटाची हिरोईन जॅकलिन फर्नाडिस आहे. तर नाथन जोन्स व्हिलन असून ‘होप हॅज अ न्यू नेम’ असं शीर्षक या पोस्टरमध्ये झळकतंय.

फॅन
किंगखान शाहरुख खानच्या ‘फॅन’बद्दल ‘एसआरके’ फॅन्सना भारी उत्सुकता वाटतेय. या चित्रपटाचं पोस्टर रिलिज करण्यात आलंय. एका खोलीत शाहरुखची अनेक छायाचित्रे भिंतीवर चिकटविल्याचे या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. ट्रॅक सूट घातलेला आणि ट्रॉफी हातात धरून भिंतीवरच्या फोटोंना न्याहाळणारा शाहरुख खानदेखील दिसतोय. शाहरुख यात गौरव या ‘फॅन’ची नि सुपरस्टारचीही भूमिका पहिल्यांदाच साकारतोय.

प्यार का पंचनामा
कोणतंही नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं, ही गोष्ट ‘प्यार का पंचनामा२’ या चित्रपटातल्या डायलॉग्जमध्ये गृहीत धरलेली दिसत नाही. याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी  Best Reply To Pyaar Ka Punchnama | Female Version   हा व्हिडीओ तयार केला गेला. हिमांशू शेखरनं क्रिएट केलेल्या या व्हिडीओत तृप्ती, वर्षां नि मनप्रीतनी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून नातेसंबंधांकडं बघत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एन्जॉय सुट्टी
अनेकांच्या दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू झाल्यात. त्यातली मज्जामस्ती काही औरच.. त्यातही सुट्टीत लहानपणी गावाला गेल्यावर खेळलेल्या खेळांची आठवण हा फोटो पाहून येतेय..
तुमच्या कितीही लाखाच्या गाडय़ा असोत, पण या गाडची मजा काही औरच.’

एक रांगोळी हो जाए..
‘रंगोंवाली रंगोली तो बहुत देखी होंगी. अब देखीए शक्कर, चाय, पत्ती एवं बिस्कुटसे बनी रंगोली.’ आणि सुंदरशा मोराची सुरेख मोरपिसाऱ्यासह रांगोळी कलाकार काढतानाचा व्हिडीओही व्हायरल होतोय.

आताच ऐकलेली एक मेड इन पुणे ओरिजिनल कोटी straight from Kothrud:
मी: कसं काय चाललंय?
मित्र: पुण्यात कारस्थानं नसल्यामुळे वैतागलोय.
मी: सभ्य माणूस आहेस तू. कारस्थानं होत नसतील तर आनंद वाटायला हवा.
मित्र: कहर आहे. तुम्हा मुंबईकरांना शुद्ध मराठी समजतच नाही. इंग्रजीतूनच भरवावं लागतं. अरे there are no parking places for cars.

फॉरवर्डेड
घरच्यांनी कांदे अन् तूरडाळ खरेदी करायला पाठवलं होतं.
सुट्टे पैसे उरले होते तर Samsung galaxy घेऊन आलो.
चांद फिर निकला..
कोजागरी पौर्णिमा नि करवा चौथच्या निमित्तानं पुन्हा एकदा ‘चांद पे चर्चा’ रंगली नि बऱ्याच फोटोंसह काही बोचरे मेसेजेस शेअर झाले. उदाहरणार्थ  – आज कोजागरी पौर्णिमा, आज रात्री दूध पिऊन आपल्या लिव्हरला सरप्राइज द्या.किंवा ‘नेटकरांचं सेल्फीवेड लक्षात घेऊन #करवाचौथ पर इस बार चांद के बाद पतिदेव को देखना हैं और सेल्फी लेकर सोशल मीडियावर डालनी हैं’ असे मेसेज फिरत होत. किंवा नवरेमंडळींच्या शरीरयष्टीवर भाष्य करणारे फोटोही फिरत होते.

चवींचा ‘जिव्हा’ळा
चवींचा ‘जिव्हा’ळा या शीर्षकाचं लालित्यपूर्ण स्फुट फॉरवर्ड होतोय. सणकून भूक लागल्यावर पोटाला भरभक्कम आधार होणाऱ्या तूप मीठ भाताचं रसभरित वर्णन त्यात केलंय. शिवाय आडवेळी लागलेल्या भुकेसाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिल्येत. ते वाचून पुन्हा भूक लागण्याची हमखास गॅरेंटी.

अ‍ॅडमिन नि दिवाळी..
‘ग्रुप सदस्यांच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक सदस्याला एक तेलाची बाटली, मोती साबण, सुगंधी उटणं आणि प्रत्येक मेसेजच्या २० टक्के बोनस रूपात अ‍ॅडमिनकडून देण्यात येत आहे, तरी सदस्यांनी याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती’ किंवा ‘सभी लोग १-२ दिन में ग्रुप खाली करो, ग्रुप में कलर करवाएंगे.. दिवाली आनेवाली हैं.’ असे मेसेजही फॉरवर्ड होताहेत.

मार्कबाबाचा सल्ला
मार्क झुकेरबर्गच्या भारतभेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली असतानाच कोटय़धीश लोकं त्यात मागं कसे राहतील. मार्कच्या फोटोसह त्याच्या एक्सपर्ट सल्ल्याचा मेसेज व्हायरल झाला होता.