इंटरनेटमुळे आपली कलात्मक सर्जनशीलता सादर करण्याचं एक स्वतंत्र व्यासपीठ तरुणाईसाठी उपलब्ध झालं आहे. विषय निवडीपासून ते त्याच्या सादरीकरणापर्यंत कलाकाराला या माध्यमातून स्वातंत्र्य मिळतं. ‘मराठी कप साँग’ या व्हिडीओमुळे सेलेब्रिटी झालेली ‘गर्ल इन द सिटी’ची मराठमोळी यूटय़ूब स्टार मिथिला पालकर सांगतेय या स्वच्छंदी तरुण माध्यमाविषयी..

इंटरनेट ही अशी गोष्ट आहे, जी गेली काही र्वष आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करून देतेय. हे इंटरनेटच आपली डिक्शनरी, एनसायक्लोपीडिया, ज्युक बॉक्स, मूव्ही थिएटर. सगळं झालंय. मी या इंटरनेटवरचा सोशल मीडिया अर्थात नवीन माध्यमांचं प्रतिनिधित्व करते, हे छान वाटतं. माझा हा वेबप्रवास सुरू झाला ‘फिल्टर कॉपी’ चॅनलच्या ‘न्यूज दर्शन’ या उपहासात्मक पण विनोदी शोच्या माध्यमातून. मी आधीपासूनच मुंबईच्या थिएटर सर्कलमध्ये कार्यरत होते. पण मी अभिनेत्री नव्हते. थेस्पोची ऑर्गनायझर म्हणून काम करत होते. ‘न्यूज दर्शन’च्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या सोशल मीडियामधून आपण देशभरातल्याच नाही तर त्या पलीकडच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. त्यानंतर मी त्याच चॅनलवर ‘कॉमेडी स्केचेस’साठी काम केलं. पण माझ्या ‘मराठी कप साँग’ला खऱ्या अर्थाने प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी अल्पावधीत स्टार झाले. अक्षरश जगभरातून मला लोकांचे संदेश येत होते की, मी काय गातेय, त्यातले  शब्द समजत नसले तरी त्याची धून त्यांच्या डोक्यात पक्की बसली होती. त्यांना ते आपलंसं वाटत होतं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, कलेला कोणत्याही चौकटीत.. भाषेच्या, प्रदेशाच्या किंवा संस्कृतीच्यादेखील आपण बांधून ठेवू शकत नाही.

कला नेहमीच स्वतंत्र असते, मुक्त असते आणि तिच्यातून मुक्ततेकडे जाता येतं. त्यामुळे मला असं वाटतं कलेच्या या व्याखेला न्याय देण्यासाठी इंटरनेट – सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. त्यातून व्यक्त व्हायला, कला सादर करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अटी, बंधनं नसतात. ना वेळेची, ना भाषेची, ना त्यातील विषय अथवा मजकुराविषयी, कशाच्याच मर्यादा घातल्या जात नाहीत. कोणत्याही नवोदित कलाकारासाठी आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. एका क्लिकच्या साहाय्याने तुम्हाला अक्षरश करोडो लोकांपर्यंत पोचायची वाट सापडते.

मी या नवमाध्यमाचा चेहरा झालेय. मला या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली, मला लोक ओळखू लागले, केवळ म्हणून मी या माध्यमाचं समर्थन करतेय असं नाही. पण आपली कला लोकांसमोर आणायची आहे अशा लहानथोर सगळ्यांसाठी हे माध्यम एक संधी देतं. आपली कला कशी पोचवायची, कुठे सादर करायची, असे प्रश्न पडलेल्या कुणासाठीही हे माध्यम खुलं आहे. त्या माध्यमाचं स्वातंत्र्य ही याची ताकद आहे आणि ती आजच्या तरुणाईला खुणावतेय. आजची तरुणाई धाडसी आणि प्रयोगशील आहे. इंटरनेटसारखं  सहज वापरता येण्याजोगं माध्यम त्यांच्या हाताशी आलं आहे. जग खूप जवळ आलं आहे आणि त्याच्या मदतीनं तुम्ही लोकांपर्यंत आणि लोक तुमच्यापर्यंत पोहचू शकतात.

मिथिला पालकर