प्राणीही समोर आलेल्या पदार्थावर आवडीने ताव मारतात. या ‘पेट’ पूजेसाठी तयार खाद्यापासून (पेट फूड) अगदी घरगुती डबे, केक्स, पेस्ट्रीज असे पदार्थ अशी रेलचेलही आहे. मग असं सगळं खाऊन प्राण्यांचे दात किडतात का? असा बालसुलभ वाटणारा प्रश्न पडू शकतो. पण प्राण्यांचे दातही किडू शकतात. माणसांच्या तुलनेत प्राण्यांचे दात किडण्याचे प्रमाण कमी असले, तरीही त्यांच्या तोंडाचे आरोग्य जपणेही त्यांच्या एकूण आरोग्यासाठी गरजेचे असते.

प्राणी त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनेक आरोग्य समस्याही दडून राहतात. माणसांना जसे अनेक आजार, जीवनशैलीचे आजार, साथीचे आजार होतात तसेच ते प्राण्यांनाही होतात. त्यातीलच एक भाग म्हणजे प्राण्यांच्या तोंडाचे आजार. पदार्थ दातावर चिकटला की दात किडतो, हाच नियम माणसासारखा प्राण्यांबाबतही लागू होतो. दात किडणे, हिरडय़ांना जखमा होणे, हिरडय़ा लाल होणे असे त्रास प्राण्यांनाही होत असतात. दात किडले तर त्यांनाही वेदना होतात आणि त्यांच्या खाण्यावर त्याचा परिणामही होतो. मात्र काळजी घेऊन आणि वेळप्रसंगी उपाय करून हे त्रास टाळता येऊ शकतात.

बाजारपेठ सज्ज

माणसासारखे प्राणी रोज सकाळी, रात्री दात घासत नाहीत. मात्र प्राण्यांचे विशेषत: कुत्र्यांचे दात त्यांचे पालक घासू शकतात. ग्रुमिंग करणारे व्यावसायिकही काही वेळा ही सुविधाही पालकांना पुरवत असतात. कुत्र्यांसाठीचे अनेक वेगवेगळे टूथब्रश बाजारात उपलब्ध आहेत. कुत्र्यांच्या तोंडाची रचना लक्षात घेऊन त्यांची निर्मिती करण्यात येते. कुत्रा शांत किंवा पालकाचे ऐकणारा असेल, तर आपल्या बोटात घालून कुत्र्यांचे तोंड स्वच्छ करता येईल असे ब्रशही उपलब्ध आहेत. प्राण्यांचे तोंड स्वच्छ होईल आणि पोटात गेली तरीही चालेल अशा टूथपेस्टचीही निर्मिती करण्यात आली आहे. निसर्गत: दात स्वच्छ ठेवण्यासाठी इतर अनेक मार्गाचा वापर प्राणी करत असतात. दातावरील चिकटपणा दूर होईल अशा गोष्टी चावणे, काही वनस्पती चावणे यातून ते दातांची स्वच्छता राखतात. घरातील पाळीव प्राण्यांना प्रत्येक वेळी नैसर्गिक मार्गाने दातांची स्वच्छता राखणे शक्य होत नाही. मात्र प्राण्यांचीही गरज पूर्ण करणारी अनेक खेळणी, दात स्वच्छ राहतील अशा ‘स्टिक्स’ही मिळतात. ऑनलाइन बाजारात साधारण दीडशे रुपयांपासून पुढे ही उत्पादने उपलब्ध आहेत.

‘पशू दंतवैद्यक’

भारतात अद्याप ‘पशू दंतवैद्य’ ही संकल्पना फारशी प्रचलित नाही. परदेशांत रूट कॅनॉलपासून अनेक उपचार प्राण्यांवरही केले जातात. मात्र काही प्रमाणात आता भारतातही ‘पेट डेन्टिस्ट्री’ या विषयाने शिरकाव केला आहे. दिल्ली, बंगळुरू, मद्रास, मुंबई अशा काही ठिकाणी असलेल्या रुग्णालयांमध्ये प्राण्यांसाठीचे दंतवैद्यक आहेत. मात्र एकूणात त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. प्राण्यांच्या तोंडाच्या आरोग्यासाठीचे मेळावेही दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. गरज पडल्यास उपचार करण्याबरोबरच  प्राण्यांच्या खाण्यात काही अंशी बदल करून त्यांना होणारा त्रास टाळता येऊ शकतो, असे पशू वैद्य सांगतात. मात्र कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी किंवा आहारात काही बदल करण्यापूर्वी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच करणे योग्य ठरेल.