क्रिकेटची मॅच सुरु झाल्यापासून तुम्ही ज्या जागी बसलेलात तिथेच मॅच संपेपर्यंत बसून होता का? चांगल्या कामाला जाताना जाणीवपूर्वक उजवा पाय आधी टाकता का? असे एक ना अनेक गोष्टी आपण कळत नकळत करत असतो. यात किती शास्त्र असतं आणि किती अंधश्रद्धा हा विचारही आपल्या मनात येत नाही. नित्याच्या सवयींमध्ये तुम्ही नक्की कशाचं अनुसरण करता हे पुढील उदाहरणांवरुन कळेलच.
रात्री नखं कापू नयेः
आपल्याकडे रात्रीची नखं कापायची नाहीत असं नेहमीच म्हटलं जातं. का असं विचारल्यावर क्लेश मागे लागतो हे नेहमीचं ठरलेलं उत्तर मिळतं. पण ज्यावेळी नखं कापू नये असं सांगितलेलं तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हा घराघरात वीज नव्हती, त्यामुळे रात्री नखं कापली तर इजा होण्याची भितीही होतीच. पण, माणूस आजही शास्त्रापेक्षा क्लेश मागे लागेल या गोष्टीलाच अधिक घाबरतो.
रात्री झाडू मारु नयेः
रात्र झाली की घरातून बाहेर पडायला जशी बंदी असते तशीच बंदी घरात काही कामं करायलाही असते. दिवे लागणच्यावेळी झाडू मारू नये असं म्हणतात तसंच रात्रीच्या वेळीही झाडू मारला तर लक्ष्मी पाठ फिरवते अशी पूर्वीची कल्पना होती. पण त्यामागचं शास्त्र मात्र कोणालाच माहिती नव्हतं. विजेची सोय नसल्यामुळे अंधारात घरातली किमती गोष्टही कचऱ्याबरोबर बाहेर फेकली जाऊ शकते. म्हणून त्या काळात रात्री झाडू मारु देत नव्हते.
घरात केस विंचरु नकाः
घरात केस पडले तर घरात वाद होतात असे आपले आजी- आजोबा आपल्याला सांगायचे. पण, असं का? याचं उत्तर मात्र नीटसं त्यांनाही माहिती नसल्यामुळे आपल्याला गप्प केलं जायचं. घरी केस पडले असतील तर ते दिसायलाही वाईट दिसतं. त्यामुळे त्यावरुन भांडणं तर होणारच ना… यावर उपाय म्हणजे केस विंचरुन झाल्यावर खाली पडलेले केस स्वतः उचलणे.. यामुळे घरभर अस्वच्छताही दिसणार नाही आणि त्यामुळे भांडणंही होणार नाहीत
कात्री आणि चावीशी खेळू नकाः
आता कात्रीने का खेळायचं नाही यात काही फार विचार करण्याची गरज नाही. लहान मुलांच्या हातात कात्री दिली तर त्यांना इजा होऊ शकते. शिवाय चावीही तोंडात घातली तर इजा होऊ शकते. पण मुलांना सांगणार कसं यासाठी कदाचित नशीब बिघडतं ही भीती घातली असेल.
मांजर आणि रस्ताः
मांजर, रस्ता आणि माणूस हे एक वेगळंच नातं आहे. मांजराने रस्ता कापला तर काही तरी अशुभ होणार हे ठरवूनच माणूस त्या मांजराच्या आधी धावत पुढे जातो किंवा काही पाऊलं मागे तरी जातो. पण तुम्ही ज्या प्रवासाला जात आहात त्या मांजरीचाही कोणता तरी प्रवास असेलच ना? हा विचार कधी कोणी केला आहे का?
तोंड गोड कराः
कोणत्याही चांगल्या कामाला जाताना, परीक्षेला जाताना दही साखर खाऊन निघण्याची परंपरा तर अनेक वर्षांचीच. पण यामुळे चांगले गुण मिळायला मदत होत नाही तर चिंताग्रस्त असल्यामुळे पोटात जो कोलाहल माजतो त्यावरचा उपाय म्हणजे दही साखर होय. पोट साफ ठेवायला दही साखर मदत करतं.
काळा टिळा हवाचं बाईः
लहान मुलांना बाहेरच्याची नजर लागू नये म्हणून डोळ्यात भरभरून काजळ घातलं जातं. पण या काजळामुळे बाळांची नजर खराब होऊ शकते याचा कधी विचार केला का?
काचेचं तुटणं:
घरात एखादी काच तुटली तर काही तरी वाईट घडणार असं अनेकांना वाटत असतं. पण तुटलेल्या काचा घरी ठेवल्या तर नक्कीच कोणा ना कोणाला तरी इजा होऊन दुखापत होऊ शकते. त्यामुळे वाईट तर होणार ना…