परदेशात जाणाऱ्या अनेक व्यक्तींना तेथील दिवस व रात्र वेगळ्या कालावधीचे असल्याने जेटलॅगचा त्रास होतो. त्यावर माणसाच्या डोळ्यातील रेटिनात असलेल्या पेशींचा एक समूह जेटलॅग कमी करण्यास मदत करू शकतो. रेटिनातील हा पेशीसमूह जैविक घडय़ाळावर परिणाम करीत असतो. त्यावर नियंत्रण आणता आले तर जेटलॅग टाळता येऊ शकतो. रेटिनातील काही पेशी मेंदूकडे सतत संदेश पाठवत असतात. त्यावर आपले जैविक घडय़ाळ अवलंबून असते, असे एडिंगबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. जैविक घडय़ाळ हे प्रकाश-अंधार या बदलानुसार चालते. त्यामुळे शरीराचे तापमान, मेंदूची सक्रियता, संप्रेरक निर्मिती व इतर शरीरशास्त्रीय प्रक्रिया चालत असतात. सुप्राशियसमॅटिक न्युक्लियस हा मेंदूतील भाग जैविक घडय़ाळाचे नियंत्रण करीत असतो. त्यात अनेक रेणू सहभागी असतात. व्हॅसोप्रेसिन हे मेंदूतील संप्रेरक त्यात काम करते. उंदरांमध्ये सुप्राशियसमॅटिक न्युक्लियसकडे पाठवल्या जाणाऱ्या प्रकाश संदेशांच्या माहितीत हस्तक्षेप करण्यात आला, त्यात असे दिसून आले की, जैविक घडय़ाळ नियंत्रित करण्यात व्हेसोप्रेसिनचा मोठा वाटा असतो. त्यातूनच रेटिनातील पेशींच्या संदेशांचे वहन केले जाते. रेटिना संदेश हे सुप्राशियसमॅटिक न्युक्लियसकडे प्रकाशातील बदलाचे संदेश पाठवत असतात, पण ते काम नेमके कसे होते. हे आतापर्यंत माहिती नव्हते.

यातून जैविक घडय़ाळ दुरुस्त करणारी औषधे तयार करता येतील, असे एडिंबर्ग विद्यापीठाच्या माइक लुडविग यांनी म्हटले आहे.