स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी, कॅमेरा, स्क्रीनचा आकार, मेमरी यांसारख्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. दिवसातील सर्वाधिक कामे ज्यावर अवलंबून असतात अशा या स्मार्टफोनचा वापर सुकर व्हावा यासाठी कंपन्याही मोठ्या प्रमाणात स्पर्धेत उतरल्या आहेत. दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. मात्र हा फोन ग्राहकांच्या खिशाला परवडणारा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही कंपन्यांनी याचा विचार करत कमी किंमतीत जास्तीत जास्त सुविधा देणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांची आपल्याला पसंती मिळेल असा दावाही काही कंपन्यांनी केला आहे. कंपन्यांचा हा दावा काही प्रमाणात खराही ठरत आहे. १० हजारहून कमी किंमतीचे कोणते स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत पाहूया…

१. आसूस झेनफोन लाईव्ह
किंमत – ९,९९९ रुपये

कॅमेरावेडे असणाऱ्यांसाठी बनविलेला हा खास हँडसेट आहे. यामध्ये कॅमेरा तर आहेच त्याशिवाय फोटो एडिटर, कोलाज अॅप्लिकेशन यांसारखे फिचर्सही आहेत. या फोनवरील काच ही काहीशी कर्व्ह असणारी आहे. प्लॅस्टीक बॉडी असली तरीही हा फोन टिकाऊ वाटतो. या फोनचा डिस्प्ले चांगला असून त्यावर टेक्स्ट आणि चित्र छान दिसतात. अंधारात स्मार्टफोन वापरताना त्याच्या प्रकाशामुळे डोळ्याला त्रास होण्याची शक्यता असते. मात्र असा त्रास होऊ नये यासाठी फोनमध्ये ब्लू लाइट फिल्टरही देण्यात आला आहे. याशिवाय विशेष म्हणजे २ वर्षांसाठी १०० जीबी गूगल ड्राईव्ह स्टोरेज मोफत देण्यात आला आहे. कॉल रेकॉर्डर, स्लाईड शो क्रिएटर, फोटो एडिटर, ऑडिओ विझार्ड देण्यात आला आहे.

२. नूबिया एन १ लाईट
किंमत – ६,९९९ रुपये

या फोनची स्क्रीन ५.५ इंचाची आहे. त्यामुळे मेल चेक करणे, मेसेजिंग आणि इतर ब्राऊसिंग सोपे होते. याच्या एचडी स्क्रीनची गुणवत्ता चांगली असल्याने उन्हामध्येही या स्क्रीनवर पहायला त्रास होत नाही. या फोनमध्ये एक टर्बो फिचर आहे ज्यामुळे वाय फायव्दारे किंवा इंटरनेट कनेक्शनव्दारे काही डाऊनलोड करायचे असल्यास वेगाने होते. फिंगरप्रिंट सेन्सॉरमुळे फोन लॉक आणि अनलॉक करणे सोपे होते. ई-मेल, ब्राऊजिंग, गेम खेळणे ही कामे सोपी होत असतील तरीही हेवी असणारी अॅप्लिकेशन्स आणि हाय ग्राफीक्स असणाऱ्या फोनमुळे प्रोसेसर लवकर थकतो. या फोनची बॅटरी ३ हजार मिलीअँपियर्सची असून १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

३. इनफोकस टर्बो ५
किंमत – ६,९९९ रुपये

बॅटरी हे या फोनमधील विशेष आहे. ही बॅटरी तब्बल दोन दिवसांसाठी चालते. ज्यांना जास्त बॅटरीची आवश्यकता असते त्यांच्यासाठी हा फोन उत्तम पर्याय ठरु शकतो. विशेष म्हणजे या फोनव्दारे दुसरा फोनही चार्ज करता येतो. याची बॅटरी ५ हजार मिलीअँपियर्सची आहे. फोन चांगला असून गेम खेळणे तसेच एचडी व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तम आहे.

४. मेईजू एम ५
किंमत – ९,५९९ रुपये

ज्या लोकांना फोनमध्ये जास्त अॅप्लिकेशन्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा चांगला फोन आहे. तुम्ही काही काम करत असाल आणि तुम्हाला होम स्क्रीनवर जायचे असेल तर केवळ एक बटण दाबल्यावर तुम्ही होम स्क्रीनवर जाऊ शकता. हे बटण फिंगरप्रिंट सेन्सॉर म्हणूनही काम करते. हा फोन रेडमी नोट ४ ए हून चांगला असल्याचा कंपनीचा दावा आहे.

५. मोटो ई४ प्लस
किंमत – ९,९९९ रुपये

या रेंजमधील हा अतिशय चांगला फोन आहे. बॅटरी दोन दिवस टिकते. याशिवाय चार्जिंगही वेगाने होते. याची बॅटरी ५ हजार मिलीअॅम्पियर्सची आहे. लेटेस्ट अँड्रॉईड असलेला हा फोन अतिशय यूजर फ्रेंडली आहे. मेटल बॉडी असल्याने ज्यांच्या हातातून फोन खाली पडतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यात फोनमध्ये फोटो अतिशय नॅचरल आणि शार्प येतात. त्यामुळे ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे त्यांच्यासाठीही हा उत्तम पर्याय ठरु शकतो.