चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ या प्रकाराचा नियमित सराव केल्यास मानसिक आजार आणि नैराश्य कमी करणे शक्य असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार न घेणाऱ्या अमेरिकेतील चिनी नागरिकांसाठी संशोधकांनी १२ आठवडय़ांचा ‘ताय ची’ या प्रकाराची माहिती देणारा आणि सरावाचा कार्यक्रम घेतला. याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात मानसिक आजार आणि नैराश्यावर ताय ची प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. वैद्यकीय उपचारांप्रमाणेच हा उपक्रम परिणामकारक असल्याचे मॅसॅच्युएट्स रुग्णालयाचे अल्बर्ट येऊंग यांनी म्हटले आहे.

मानसिक उपचारांपेक्षाही ताय चीमुळे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होत असल्याचे येऊंग यांनी म्हटले आहे. हे संशोधन ‘क्लिनिकल सायकॅटरी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी ‘ताय ची’चा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात सहभागी झालेल्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा यात समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेले सर्वच जणांना गंभीर मानसिक आजार होता. तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार सुरू नव्हते. तसेच काही जणांवर याआधी करण्यात आलेल्या मानसिक उपचारांचाही या कार्यक्रमात विचार करण्यात आला नव्हता. सहभागी झालेल्यांचे तीन गट करण्यात आले. त्यात मानसिक ताणतणावावर चर्चा करण्यात आली तसेच ‘ताय ची’चे मार्गदर्शन करण्यात आले. १२ आठवडय़ांच्या कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्यांचे मानसिक आरोग्य सुधारल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले.