आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असून गाईचे किंवा म्हशीचे दूध लवकर सुरू करणे फायद्याचे नसते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शहरी भागात अनेक बालकांना आईचे दूध मिळण्यात कोही अडचणी असतात. असे असले तरी पहिले सहा महिने तरी नवजात बालकांना स्तनपान देणे गरजेचे असते. सध्या ५५ टक्के बालकांना पहिले सहा महिने स्तनपान मिळत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीत म्हटले आहे. नेदरलँड्समधील उट्रेख्ट येथील मानवी दूधपोषणतज्ज्ञ डॉ. ब्रेर्नर्ड स्टाल यांनी म्हटले आहे की, आईचे दूध खूप पोषक असते. त्यामुळे बाळाचा सर्वागीण विकास होत असतो. अतिसार, अ‍ॅलर्जी, अस्थमा यांसारख्या अनेक आजारांपासून आईचे दूध बाळाचे संरक्षण करीत असते. ज्या माता स्तनपान देतात त्यांना अंडाशय, स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण फार कमी असते व त्याचा उपयोग त्यांचे वजन भरून येण्यातही होतो. गाई-म्हशीचे दूध आईच्या दुधाला पर्याय नसते. गाई-म्हशीच्या दुधात कॅसीन नावाचे प्रथिन असते ते बालकांना पचण्यास जड असते. त्यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो. गाईच्या दुधाचे पाश्चरीकरण केले की, त्यातील लोह, जस्त व आयोडिन निघून जाते जे बालकांना आवश्यक असते. केवळ आईचे दूध देणे पुरेसे नाही. असाही एक गैरसमज असल्याचे सांगून एम्सचे बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे की, आईचे दूध पुरेसे असते. त्यात सगळी पोषके असतात. गाई-म्हशीच्या दुधाचे पचन करण्याची ताकद बालकांच्या आतडय़ात नसते. गाईच्या दुधाची अ‍ॅलर्जी बालकांना असते, असे डॉ. नंदन जोशी यांनी म्हटले आहे. भारतात २०१७ च्या आकडेवारीनुसार जन्मानंतर स्तनपानाचे प्रमाण ७५ टक्के आहे ते २०२५ पर्यंत ९० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.