कोवळय़ा वयात ज्या मुलींचे लैंगिक शोषण होते, त्यांना शारीरिक प्रौढत्व व तारुण्य त्यांच्या वयाच्या मुलींच्या तुलनेत १२ महिने अगोदर येत असल्याचे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे.

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यामध्ये त्यांनी लहान वयात लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या ८४ महिला आणि अत्याचार न झालेल्या ८९ महिलांची तुलना करून निष्कर्ष काढला आहे.

तारुण्यात येण्याच्या आधीपासून ते संपूर्ण परिपक्वतेच्या आधारावर तारुण्यात होणारी शारीरिक प्रगती याचा अंकीय निर्देशांकाच्या आधारावर मागोवा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने स्तन आणि केसांमध्ये होणारा विकास हे दोन स्वतंत्र विषय घेऊन संशोधन करण्यात आले.

यामध्ये एक (तारुण्य) ते पाच (पूर्ण परिपक्वता) या दरम्यान निर्देशांक ठेवण्यात आला होता. ज्या महिलांना लैंगिक शोषणाचा इतिहास होता त्यांच्यामध्ये इतर लैंगिक शोषण न झालेल्या महिलांच्या तुलनेत केसांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. तसेच त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेत स्तनांचा अधिक प्रमाणात विकास दिसून आला. हे प्रमाण जवळपास आठ महिन्यांनी लवकर होते.  एक वर्ष सामान्यपणे कमी वाटत असले तरी कमी वयात परिपक्वता येण्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो. यामध्ये वर्तणूक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच यामुळे प्रजननाशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका असतो, असे पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक जेनी नोल यांनी म्हटले आहे.

उच्च ताणाच्या परिस्थितीत म्हणजेच बालपणामध्ये लैंगिक शोषण झाल्यामुळे ताणाच्या संप्रेरकामध्ये वाढ होऊ शकते. हे धोक्याचे आहे. बालपणात होणारे लैंगिक शोषण रोखण्याची गरज असल्याचे जेनी नोल यांनी म्हटले आहे.

हे संशोधन ‘अडोलेसेंट हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.