तुमच्या घरी जर अनपेक्षितपणे पाहुणे आले, तर झटपट तयार होणारी रोस्टेड पोटॅटो वेजेज डीश तुमची वेळ निभावून नेऊ शकते. जाणून घेऊया ह्या डीशची रेसिपी.

रोस्टेड पोटॅटो वेजेज

साहित्य
४ मध्यम आकाराचे बटाटे, २ चमचा ऑलिव्ह ऑईल, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा ओरिगानो

कृती
प्रथम बटाट्याची साल काढून घ्या. जर तुम्ही साल काढणार नसाल, तर बटाटे चांगले धुऊन घ्या. प्रथम अख्खा बटाटा दोन समान ऊभ्या भागात कापा. नंतर या दोन भागांचे आणखी दोन ऊभे भाग करून, या सर्व भागांना पुन्हा एकदा समान ऊभ्या भागात चिरा. सर्व बटाटे चिरून झाल्यावर एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल घालून, त्यात काळी मीरी पावडर, ओरिगानो, कसुरी मेथी आणि मीठ घालून हे मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी घालून, प्रत्येक फोडीला चांगल्याप्रकारे हे मिश्रण लागेल अशारितीने ढवळा.
हे करत असताना ओव्हन १८० डिग्रीवर प्रिहिट करून घ्या. ओव्हनच्या ट्रेवर थोड्याथोड्या अंतरावर बटाट्याच्या फोडी मांडून ट्रे ओव्हनमध्ये ठेवा. ओव्हनला १८० डिग्रीवर अर्ध्या तासासाठी सेट करून वेजेज रोस्ट करा. अर्ध्यातासानंतर रोस्टेड पोटॅटो वेजेज तयार असतील. हे रोस्टेड पोटॅटो वेजेज सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्या. यावर तीळ घालून हलके ढवळा. आवडत्या पेयाबरोबर हे रोस्टेड पोटॅटो वेजेज सर्व्ह करा.

(पाककृती – निशा मधुलिका)