अंगावर परिधान करता येईल असे नवीन यंत्र वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे, त्याचा उपयोग मेंदू शांत करणे किंवा उद्दीपित करणे अशा दोन्ही प्रकारे करता येतो. पहिले डिजिटल औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाचे नावा थायनॅक असे आहे. ते कपाळावर लावता येते.
त्याचे दुसरे एक पॅड डोक्याच्या खूप मागच्या बाजूला जोडलेले असते हे यंत्र शांतता निर्माण करण्याच्या अवस्थेत किंवा उत्साह -ऊर्जा निर्माण करण्याच्या अवस्थेत अशा दोन प्रकारे चालते. हे यंत्र स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा ब्लूटूथला जोडलेले असते. अ‍ॅपच्या मदतीने ते नियंत्रित करता येते. ते किती काळ वापरायचे हे अ‍ॅपच्या मदतीने ठरवता येते. मेंदूला किती काळ उद्दीपित ठेवायचे किंवा शांत ठेवायचे हे आपल्या आवश्यकतेनुसार ठरवता येते. त्याचा वापर कमीजास्त तीव्रतेनेही करता येतो. कारण त्यात लहरींचा वापर केलेला असतो. गिझमॅग नियतकालिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. तुमचा मेंदू शांत होण्यास यात किमान पाच मिनिटे तरी द्यावी लागतात.
मेंदूला ऊर्जा देण्याचे तीन प्रकार यात उपलब्ध आहेत त्यात ५ ते १० मिनिटांचा कालावधी लागतो. विद्युतलहरींचा वापर यात न्यूरॉनला संदेश देण्यासाठी केला जातो, पण या विद्युतलहरींची तीव्रता फार जास्त नसते. डायल अप व डायल डाऊन पद्धतीने ते ताण कमी करू शकतात, हे उपकरण सुरक्षित असून त्याची किंमत २९९ डॉलर आहे.
पटकन राग अनावर होणाऱ्या लोकांना डोके शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, परिणामी वाढलेला रक्तदाबही नियंत्रणात ठेवता येईल किंवा सतत मरगळ असलेल्या लोकांना या उपकरणाचा वापर त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी करता येईल त्यामुळे ते उत्साही बनतील, असा दावा संबंधितांनी केला आहे.

थायनॅक
*मेंदू शांत ठेवण्यासाठी वापर
*उत्साह वाढवण्यासाठी वापर
*विद्युतलहरींच्या मदतीने न्यूरॉन्सना संदेश
*किंमत २९९ डॉलर