अभिजात हिंदुत्व- त्यात गुणवाचक व शौर्यवाचक संकल्पना हा फरक, मध्यम शेतकरी जातींचे हिंदुत्व- ओबीसी व (बौद्धेतर) दलित हिंदुत्वसंकल्पनांशी त्याची स्पर्धा, अशी चौरंगी लढत आज दिसून येते आहे..

भाजप व शिवसेनेने सत्ताधारी व सत्ताविरोधी अशा दोन्ही पातळींवरील अवकाश गेली दोन वर्षे व्यापला होता. त्यांच्यातील डाव-प्रतिडाव म्हणजे राजकारण संबोधिले गेले. दोन-अडीच महिन्यांत क्रांती मोर्चा, दसरा मेळावा, प्रति मोच्रे, ओबीसी मोर्चा या घडामोडी घडल्या. त्या घटना चावडीवरच्या राजकारणापेक्षा वेगळ्या आहेत. पडद्यामागील हालचालींपेक्षा सामाजिक धोरणाच्या दृष्टिकोनातून सत्तास्पध्रेतील प्रश्नांची उकल केली जात आहे. या धोरणाची चौकट हिंदुत्वाची आहे. विरोधी पक्ष पातळीवर उदासीनता, निष्क्रियता व वैमनस्य या कारणांमुळे गारठा होता. सत्ताबाहय़ पक्षांचे वैचारिक स्वरूप खिळखिळे झाले. नेते व कार्यकत्रे पक्षांची साथसंगत सोडून देत होते. सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी होत होती. या पाश्र्वभूमीवर राजकारणाने हिंदू चौकट उघडपणे स्वीकारली. हा राज्याच्या राजकारणातील प्रारूपातील बदल ठरत आहे. कारण राज्यात एक-दोन हिंदुत्वाच्या जागी चार हिंदुत्वाची (चौरंगी) प्रारूपे दिसत आहेत. ओबीसी, मध्यम शेतकरी जाती (मशेजा) व नवबौद्धेतर हिंदुत्वाचे सामाजिक धोरण आकाराला आले. पक्षीय चौकटीत भाजपप्रणीत (मवाळ) व शिवसेनाप्रणीत (आक्रमक) हिंदुत्व असे वर्गीकरण केले जाई, ते पक्ष व शैली यांच्या संदर्भातील होते. याशिवाय इतर पक्षांच्या हिंदू संबंधाची चर्चा सुरू झाली आहे. जातीचे समूह, उद्देश, पक्षसंघटना आणि हिंदुत्व असे या निष्कर्षांच्या आधारे हिंदुत्वाचे चार वेगवेगळे रंग दिसतात. हे हिंदुत्वाचे चौरंगी चित्र सत्ताकांक्षी अभिजनांचे सत्तास्पध्रेतील सामाजिक-आर्थिक धोरण आहे. म्हणून या लेखात चौरंगी हिंदुत्वाची मांडणी केली आहे.

अभिजात हिंदुत्व

अभिजात हिंदुत्वाचे पुरस्कत्रे भाजप, शिवसेना, नागरी समाज हे घटक आहेत. आरंभापासून उच्च व व्यापारी जाती अभिजात हिंदुत्वाच्या समर्थक आहेत. सत्तास्पध्रेत उतरल्यावर अभिजात हिंदुत्व हळूहळू व्यापक होत गेले. या प्रक्रियेत अभिजात हिंदुत्व व क्षत्रिय हिंदुत्व यांचा समझोता होता. त्यामुळे अभिजात हिंदुत्वात त्रिकोणी स्पर्धा सुरू झाली (उच्च, व्यापारी जाती, मराठा व ओबीसी). या स्पध्रेमुळे अभिजात हिंदुत्वातून कधी मशेजा तर कधी ओबीसी सत्तेबाहेर गेले. पुन्हा त्यांनी अभिजात हिंदुत्वाशी पुनर्जुळणी केली. परंतु समकालीन दशकात अभिजात हिंदुत्वाचा कल भाजपकडे झुकलेला राहिला. त्यामुळे शिवसेना हा भागीदार अस्वस्थ झाला. अधिकारपदे मिळाली परंतु सत्तेवर नियंत्रण नाही, अभिजात हिंदुत्व चौकटीवर विश्वास पण निराशा अशी द्विधा मन:स्थिती मशेजा व ओबीसींत होती. मात्र अभिजात हिंदुत्वाच्या चौकटीशी विद्रोह करण्याची क्षमता नव्हती. तरीही अभिजात हिंदुत्वाच्या माजघरातून चौकटीच्या उंबरठय़ावर मशेजा व ओबीसी आले होते. हे अभिजात हिंदुत्वाला दुहेरी आव्हान ठरले आहे.

मशेजा हिंदुत्व

क्रांती मोर्चातून मशेजामध्ये लोकशाहीकरण व हिंदूकरण अशा दोन जाणिवांचा विकास होत आहे. (१) स्त्रियांची भागीदारी व आर्थिक प्रश्नांच्या मुद्दय़ांवर लोकशाहीकरणाची प्रक्रिया घडत आहे. महिला-मुली व तळागाळातील मशेजा याकडे वेदनेपासून मुक्ती अशा दृष्टिकोनातून पाहताहेत. यामुळे रात्रीदेखील मुली मशाल मोर्चा काढताहेत. हे लोकशाहीकरणाला बळ देणारे (२) मशेजामध्ये हिंदूकरण प्रक्रियेत, अभिजात व मशेजा हिंदुत्वाचे नाते हितसंबंधाच्या पातळीवर अंतर्विरोधाचे आहे. हा अंतर्विरोध कधी द्वैती तर कधी अद्वैती असतो. या द्वैतवादीच्या पाश्र्वभूमीवर राजे राज्यसभेवर गेले. द्वैती व अद्वैती हिंदुत्वाचे नाते छत्रपती व पेशवे इ. प्रतीकांनी सत्ता, अधिकार, प्रतिष्ठा या संदर्भात अभिव्यक्त झाले. अशा घडामोडींनी ऐंशीनंतरच्या महाराष्ट्राचा अवकाश व्यापला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दोन मिथके, छत्रपती संभाजी महाराजांची दोन मिथके अशा स्वरूपात या द्वैत व अद्वैताची सामाजिक-सांस्कृतिक लढाई दैनंदिन जीवनात आली. या दोन अवस्थांत मशेजा हिंदुत्वाची ओढाताण झाली. मशेजाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय हितसंबंध जपणारे हिंदुत्व ही वैचारिक विचारधारा आहे. त्यास हिंदुत्व असे संबोधिले जात नाही. केवळ हिंदू असे संबोधिले जाते. परंतु याचाच अर्थ हिंदुत्व असा होतो. विशेष जाट, पाटीदार, मराठा अशा जातींमध्ये या हिंदुत्वाची पाळेमुळे आहेत. हे मशेजाचे हिंदुत्व उच्च व व्यापारी जातींशी स्पर्धा करते; ती केवळ राजकीय नसून आर्थिक-सामाजिक स्वरूपाची दिसते. या स्पध्रेत क्षत्रियत्व हा मध्यवर्ती मुद्दा असतो. तर उच्च जातींत ‘ब्राह्मणत्व’ हा कळीचा मुद्दा दिसतो. ब्राह्मण ही संकल्पना गुणवाचक तर ‘क्षत्रियत्व’ संकल्पना शौर्यवाचक म्हणून अभिव्यक्त होते. नव्वदीच्या दशकापासून शौर्यवाचक हिंदुत्वाचा गर्भितार्थ शिवसेनेने व्यक्त केला. त्यामुळे शिवसेनेकडे मशेजा वळली होती. भाजपच्या राजकीय विस्तारातील एक अडथळा शौर्यवाचक हिंदुत्व ठरला. परंतु २०१४ मध्ये हे शौर्यवाचक हिंदुत्व भाजपकडे सरकले. भाजपशी मशेजाच्या हिंदुत्वाने आश्रित म्हणून समझोता केला. ऐंशी-नव्वदीनंतर क्षत्रिय हिंदुत्वाचे विभाजन विविध जातसंघटनांत झाले. अभिजात हिंदुत्वाच्या मालिकेतून मशेजाच्या हिंदुत्वाला बाहेर काढून त्याला क्षत्रियत्वनिष्ठ स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले. गेल्या दोन-तीन महिन्यांत, गोलमेज परिषद ते क्रांती मोर्चामध्ये हा एक प्रयत्न दिसतो. या प्रयत्नातून मशेजा हिंदुत्व हे अभिजात हिंदुत्वापासून वेगळे होऊ लागले. या हिंदुत्वाची वाढ ओबीसी व दलित हिंदुत्व यांच्याशी द्वैतवादी नाते स्पष्ट करीत झाली आहे. याचा समकालीन संदर्भ म्हणजे गावांच्या सत्ता संरचनेतील तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अशा पदांवर ओबीसी, दलित, महिला यांना भागीदारी मिळाली. त्यामुळे प्रतिष्ठा-वंचिततेच्या जाणिवेतून मशेजामध्ये हिंदुत्वाचा जन्म झाला. त्यामुळे मोर्चात भगव्याचा गर्भितार्थ मशेजाचे हिंदुत्व असा होतो. हीच ती हिंदू अंतर्गत क्रांती ठरली आहे. दोन्ही हिंदुत्वांतील अटीतटीच्या लढाईत सरतेशेवटी अभिजन व मध्यमवर्गीयांनी मशेजा हिंदुत्वाची धुरा खांद्यावर घेतली. या मोर्चातून मशेजा हिंदुत्वाच्या पराभूत मनोवृतीचा ऱ्हास झाला. आता ते सक्रिय राजकारणात उडी घेण्याच्या पवित्र्यात आहेत. गेल्या दोन वर्षांत पदे मिळाली तरी सत्ता मिळणार नाही, ही जाणीव अभिजात हिंदुत्वाबद्दल झाली. त्यामुळे अभिजात व ओबीसी हिंदुत्व अशा जोडगोळीच्या हितसंबंधांच्या विरोधी मशेजा हिंदुत्व गेले आहे.

ओबीसी हिंदुत्व (ओहिं)

अभिजात, मशेजा व ओबीसी या तीन हिंदुत्वामध्ये अंतर्विरोध आहेत. अंतर्विरोध असूनही ओबीसी हिंदुत्वाचा उदय अभिजात व मशेजा हिंदुत्वामधून झाला आहे. परंतु सध्या स्वतंत्रपणे ओबीसी हिंदुत्वाची वाढ होत आहे. डापवेच या अर्थी, अभिजात व मशेजा हिंदुत्वाबरोबर ओबीसी हिंदुत्वाचा समझोता होतो. मुंडे-भागवत-महाजन, मुंडे-भुजबळ अशी समझोत्याची आणि संघर्षांची उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत. तर मुंडे-जानकर समझोता सुस्पष्टपणे दिसतो. या घडामोडी म्हणजे केवळ नेत्या-नेत्यांमधील धूर्त डावपेच नव्हेत. या हालचालींच्या तळाशी आर्थिक-सामाजिक वास्तव आहे. मुंडेची भगवानगडवरील श्रद्धा (भगवानबाबा), तसेच हिंदू उत्सवाचे महत्त्व हे ओबीसी हिंदुत्वाची आखणी ठरते. नेतृत्व आणि परंपरा (दैवी) यांचा मेळ घातला जात आहे (मानसकन्या, माता). अशा मांडणीचा अर्थ ईश्वराचे प्रतिनिधित्व असा होतो. तेव्हाच जानकर-पवार द्वैतातून मशेजा व ओहिंच्या द्वंद्वाचे प्रतिमान उभे राहते. अर्थातच या प्रकारच्या हिंदुत्वाची चौकट नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर आखली. तिचा हा राज्यातील विस्तार म्हणता येईल. परंतु ओहिं व मशेजा हिंदुत्व यांच्या द्वैताची आखणी गुजरात, महाराष्ट्र अशा राज्यांत आधी झाली. त्यांचे उद्गाते गोपीनाथ मुंडेदेखील होते. ओहिं हे जसे मशेजा हिंदुत्वाचे प्रतिस्पर्धी; तसेच ते अभिजात हिंदुत्वाचेही प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे ओहिं व अभिजन हिंदुत्व याअंतर्गत राजकीय स्पर्धा आहे. ओहिं हे शौर्यवाचक स्वरूपाचे आहे. त्यामुळे ते मशेजा हिंदुत्वाचा सरळ सामना करते. म्हणून क्रांती मोर्चाना सुस्पष्ट विरोध होतो. यामुळे ओबीसी व मशेजा हिंदुत्वात जोर व जोश आहे. केवळ वरपांगी मागण्याचा पांगुळगाडा नाही. त्यात आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीची दूरदृष्टी आहे (राजकीय, नोकरी व शिक्षणातील राखीव जागा). त्यासाठी बिनदिक्कतपणे हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार केला जात आहे.

दलित हिंदुत्व (दहिं)

नवबौद्धेत्तरामध्ये दहिंचे वैचारिक आत्मभान आहे. दहिं इतर हिंदुत्वाशी जुळवून घेते. त्यामुळे दहिंचे सतत पक्षीय हिंदुत्वाच्या पातळीवर अभिसरण होत राहते. अभिजात, मशेजा व ओबीसी हिंदुत्व हे दलित हिंदुत्वाला कृतिप्रवण करते. हिंदूविरोध व हिंदूशी समझोता असे नवबौद्धामध्ये दोन प्रवाह आहेत. हिंदूविरोध विचार द्विवर्णीय समाजाची मुख्य चौकट मांडतो. अशी मांडणी मराठय़ांच्या प्रतिष्ठावाचक सत्तेवरील हल्ला ठरतो. त्यामुळे नवबौद्ध मध्यमवर्ग आणि मराठा मध्यमवर्ग यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या छावण्यांची मांडणी झाली. यांची सुरुवात खरे तर ‘हिंदू’ कादंबरीपासून झाली होती. त्याला मोर्चाच्या निमित्ताने आखाडा मिळाला. नवबौद्ध आणि अभिजात हिंदुत्व यांचे संबंध द्वैताचे आरंभीपासून राहिले आहेत. यामध्ये पुनर्जुळणी भाजप व शिवसेनेने केली आहे. सध्या भाजप या पुनर्जुळणीमध्ये आघाडीवर आहे. तर मशेजा हिंदुत्व या जुळणीच्या प्रयत्नात मागे पडले आहे. उलट मशेजा हिंदुत्वाची पुनर्जुळणी दहिंविरुद्ध सुरू आहे. यामुळे अभिजात हिंदुत्वाची मशेजाबरोबरची लढाई सध्या ओबीसी व दलित लढत आहेत. कारण गावापासून ते जिल्ह्य़ापर्यंत मशेजा व दलित अभिजनांमध्ये सत्तासंघर्ष दिसून येतो. मथितार्थ, हिंदुत्व ही अभिजनांची विचारप्रणाली आहे. हा सत्तेची विषयपत्रिका बदलणारा चेहरा आहे. आर्थिक निर्णयनिश्चितीच्या पहिल्या पातळीवर अपयश येते. तेव्हा सत्तेचा दुसरा चेहरा कृतिशील होतो. ही नेतृत्वामधील केवळ ओढाताण नाही तर सामाजिक-आर्थिक हितसंबंधाची हिंदुत्व चौकटीतील संघर्षांची कथा आहे. तिचा विस्तार तळागाळात ओबीसी व मशेजाकडून होत आहे. तसेच हिंदू दलितांनी त्यामध्ये भर घातली आहे. प्रकाश आंबेडकर वगळता नवबौद्धदेखील मशेजाच्या हिंदुत्वाचा प्रतिवाद करीत हिंदुत्वाच्या वाढीस मदत करीत आहेत.

लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

मेल  prpawar90@gmail.com