‘‘मदयन्तिका मेंहदी’’ इति लोके यस्या।

पिष्टै: पत्रंन खानां रागंस्त्रिय उत्पादयान्ति।’’

‘मेहंदी लगे मेरे हात,’ असे गाणे एकेकाळी आकाशवाणीवर खूप मधाळ आवाजात एक गायिका गात असे. श्रावण मासात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात. अशा धार्मिक कार्यक्रमात, लग्नसमारंभापूर्वी महिलावर्ग हाताची बोटे, नखे व काही वेळेला दंडापर्यंत संपूर्ण हात मेंदीने रंगवतात. त्याकरिता बाजारात मिळणाऱ्या तयार मेंदी पावडरचा वापर केला जातो. मात्र या मेंदी पावडरद्वारे फसवले जाऊ शकते. बाजारात सर्रास विकली जाणारी मेंदी म्हणजे कोणत्या तरी हिरव्यागार पानांचे चूर्ण आणि लाल रंग आणणाऱ्या रसायनाचे मिश्रण असते. ‘एकटय़ा पुणे शहरात जेवढी मेंदी खपते, तेवढी खऱ्या मेंदीची लागवड जगभरही होत नाही,’ हे समस्त महिलावर्गाने लक्षात ठेवावयास हवे. पुणे शहरातील मंडई परिसरात ‘मेंदीचे कोन’ मोठय़ा प्रमाणावर विकले जातात.

मेंदीला हिना (हिंदी), मदरंगी (कन्नड), मेंदिका (संस्कृत) अशी विविध नावे आहेत. मेंदीच्या झाळीची लागवड करतात. औषधात पंचांग वापरतात. मेंदीच्या पानांचा काढा व तेल एकत्र उकळवून मेंदीचे तेल तयार करतात. पानांमध्ये लाल रंग आहे, पण तो बाजारू मेंदीसारखा लाल गडद नसतो.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत रानोमाळ असणाऱ्या मेंदीच्या पानांचा गुरांची चामडी रंगवण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होत असे. मेंदीची पाने शीतल व विविध त्वचाविकारात सत्वर गुण देतात. फुले उत्तेजक व हृदयास व मज्जातंतूस बल देतात. बी संग्राहक आहे. मेंदीच्या फुलांचा फांट हृदयाचे संरक्षण होण्यास आणि अतिचिंतेमुळे झोप येत नसल्यास आपले योगदान देतो. लहान बालकांच्या ‘खर’ पडणे या विकारात मेंदीच्या ताज्या पानांचा काढा द्यावा. डोळ्याच्या विविध सांसर्गिक रोगांत किंवा डोळे आल्यावर पानांचा लेप हाता-पायांच्या तळव्यांवर लावून दुरान्वयाने लक्षणे कमी करण्याचा उपाय एकेकाळी गावोगावी प्रचलित होता.

पांथरी वाढल्यास मेंदीच्या सालीचे चूर्ण कोरफड गराबरोबर घ्यावे. जळवातात मेंदीची पाने वाटून तळव्यावर चोळावी. तोंड आलेले असताना, तसेच घशाच्या सुजेमध्ये पानांच्या काढय़ाच्या गुळण्या कराव्यात. काही कारणाने अंग भाजले असल्यास मेंदीच्या पानांची किंवा सालीच्या काढय़ाची घडी ठेवावी. मेंदीचा वापर फक्त बाह्यत्वचेकरिताच आहे, असे नसून विविध त्वचाविकारांत पोटात घेण्यासाठीही खऱ्या मेंदीचे चूर्ण किंवा काढा अवश्य घ्यावा. रक्तमिश्रित आव, गरमी, परमा अशा विविध उष्णतेच्या विकारांत पानांचा रस खडीसाखरेबरोबर घ्यावा.

माझ्या वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णमित्रांना खात्रीची मेंदी मिळवी यासाठी तळेगाव दाभाडे येथील माझे परममित्र कै. अनंतराव चाफेकर यांच्या शेतात कुंपण म्हणून लागवड केल्याची आठवण इथे मला होत आहे. विविध धार्मिक प्रसंगांच्या निमित्ताने महिलावर्गाला आनंद देणाऱ्या मेंदीला अनेक प्रणाम!