शेतक ऱ्यांच्या बरोबरीने शेतात राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जसा बैलपोळा, तसाच गाढवावर उपजीविका करणारे समाज गाढवांचा पोळा साजरा करतात. या अनोख्या प्रथेबद्दल-

पाऊस आला, शेतात पेरणी झाली की शेतकरी वर्षभर आपल्या सोबतीने राबणाऱ्या बलांसह शेतीकामात व्यस्त राहतो. म्हणून तो वर्षभर शेतात राबणाऱ्या बलांबद्दलची कृतज्ञता पोळ्याच्या दिवशी बलांना सजवून, गोडधोड खाऊ घालून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. ज्या बलांच्या भरवशावर तो शेती कसतो त्यांच्यासाठीचा दिवस म्हणजे बल पोळा. पण एखादा समाज ज्या पाळीव जनावरावर वर्षभर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतो त्या जनावराच्या प्रेमापोटी त्यांचा सण वर्षांनुवष्रे साजरा करीत आला असेल तर..! तुम्ही म्हणाल हे तर बरोबरच आहे, पण तुम्हाला हे माहीत आहे का, की हा प्राणी म्हणजे गाढव. काही समाजांमध्ये गाढवाचा पोळा साजरा होतो. भोई, कुंभार, वडार, बेलदार आदी समाज हे वर्षांनुवष्रे गाढवपालन करीत आले आहेत. मात्र यातील भोई समाज गाढवाबद्दलची आपली कृतज्ञता बैलपोळ्याप्रमाणेच गाढवांचा पोळा साजरा करून व्यक्त करत असतो. ज्या गाढवाची इतर सगळा समाज त्याच्या मेहनतीबद्दल हेटाळणी करत असतो, जे गाढव आपल्या बेसुऱ्या ओरडण्यासाठी परिचित आहे, जे गाढव कुरूपतेसाठी ओळखले जाते तेच गाढव ऐटीत, विविध वेलीफुलांच्या, नक्षींच्या रंगबेरंगी झुली पांघरलेले, विविध रंगांच्या रंगांनी रंगवलेले असेल तर एखादी बलाची जोडीही त्याच्यासमोर फिकी पडते आणि हेही एक-दोन नव्हे तर शेकडोंच्या संखेने गाढवांच्या बाबतीतले चित्र असते पोळ्याच्याच दिवशी भरणाऱ्या अनोख्या आणि दुर्मीळ अशा गाढवांच्या पोळ्याचे.

गाढवांची उपयुक्तता..!
गाढव हा प्राणी जेवढा कष्टाळू आहे तेवढाच तो स्वस्तदेखील आहे तसंच गाढव हा पाळीव प्राणी असल्यामुळे त्याची उपयोगिता जास्त आहे. गाढवाचा आहार हा इतर जनावरांसारखाच आहे. गाढव हा इतर जनावरांसारखा हिरवा चारा, गवत, कुटार, ज्वारी व इतर भरड धान्यं, भाजीपाल्याची निरुपयोगी सालं आदी खातं. गाढव इतर जनावरांसारखं रवंथ करत नाही. गाढवाच्या दुधाला विशेष मागणी असते. गाढवाच्या दुधाचं प्राशन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते अशी समजूत आहे. तसंच गाढवाच्या दुधाने स्नान केल्यास त्वचा गोरी, मुलायम सतेज होते, असं मानलं जातं. इटलीची राणी क्लिओपात्रा ही खास गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची अशी आख्यायिका आहे. गाढव एका वेळी ५० मिलिग्राम कमीत-कमी तर पाव लिटर जास्तीत जास्त दूध देऊ शकतं. गाढवाला असणारं विक्रीमूल्य ही गाढवाची आणखी एक उपयुक्तता आहे. गाय, बल, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यानंतर गाढवाला मिळणारं विक्रीमूल्य जास्त आहे. गाढवाची विष्ठा ही शेतीसाठी उत्तम खत आहे, तसंच कुंभारकामात मडकं, रांजण, कुंडी, मातीच्या चुली, आदी घडवण्यासाठी गाढवाची लेंडी (विष्ठा) लीद ही फार उपयोगी आहे.

हा गाढवांचा पोळा दरवर्षी बैलपोळ्याच्याच दिवशी भरतो अकोला जिल्हय़ातील अकोट या गावात. अकोटमधील भोई समाजातील गाढवपालन करणाऱ्यांत गाढवांचा पोळा हा गाढवांप्रतीच्या कृतज्ञ व समर्पण भावनेने वर्षांनुवष्रे साजरा केला जातो आहे. वर्षभर ज्या गाढवाच्या भरवशावर उदरनिर्वाह चालतो, ज्या गाढवांमुळे त्यांना वर्षभर रोजीरोटी मिळते, त्या गाढवांच्या ऋणातून थोडं का होईना मुक्त व्हावं म्हणून गाढवांचा पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर गाढव मालकासोबत ओझी वाहत असतो. मात्र या दिवशी गाढवाला कुठलंही ओझं वाहायला जुंपलं जात नाही. या दिवशी त्यांना आंघोळ घालून वेगवेगळ्या रंगांनी रंगवलं जातं, सुबक नक्षी-फुलांची नवी झूल त्याला चढवली जाते. गाढवाला ठोंबरा खायला दिला जातो. त्याला पुरणपोळीचा नवेद्य खाऊ घातला जातो. त्याचं पूजन केलं जातं. एवढेच नाही तर त्या गाढवांना नमस्कारदेखील केला जातो. नंतर या गाढवांना वाजतगाजत महादेवाच्या दर्शनाला नेलं जातं. चांगदेव महादेव चौरे हे ५५ वर्षांचे गृहस्थ भोई समाजातील या अनोख्या परंपरेबद्दल माहिती देताना सांगतात, गाढव हे आमच्या उपजीविकेचे साधन आहे. लोक एखाद्या मूर्खाला गाढवाची उपमा देतात, पण खरंतर गाढव हा निरुपद्रवी आणि मेहनती प्राणी आहे. गाढवाच्या पायाच्या तळव्याखाली शंकराच्या िपडीचा आकार असतो. त्यामुळे तो शंकराचाच अवतार असल्याची आमची भावना आहे. म्हणून आम्ही रोज सकाळी गाढवाच्या पाया पडल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही बैलपोळ्याला गाढवांचा पोळा साजरा करत आलो आहोत. आमच्या घरातील बाया, मुलांसह सर्वजण गाढवाचा पोळा हा मनोभावे साजरा करतात. चांगदेव चौरे यांच्याकडे १३ गाढवं आहेत; तर त्यांच्याच बाजूच्या राजू किसन कुडाळे यांच्याकडे ९ गाढवं, विष्णू चौरेंकडे ११ गाढवं आणि इतरांकडे ४ ते ५ गाढवं सरासरी आहेतच; शिवाय गावातील भोई समाजातील इतर लोकांकडेही एक-एक, दोन-दोन गाढवं आहेत. एकंदर गावात १५० ते २५० गाढवं आहेत. गाढवांबद्दल सविस्तरपणे सांगताना चांगदेव चौरे म्हणतात, पूर्वी गाढवांना फार किंमत नव्हती. ती फार महागही नसायची, पण अलीकडे गाढवांच्या होणाऱ्या बेसुमार चोऱ्या आणि गाढवांच्या मांसभक्षणाबद्दल असणाऱ्या गरसमजांमुळे गाढवांची संख्या गेल्या काही वर्षांत चिंताजनकरीत्या कमी होत चालली आहे. शासकीय पशुगणनेद्वारासुद्धा ही गोष्ट अधोरेखित होत आहे. मात्र याकडे सर्वाचंच दुर्लक्ष होत आहे. २००३ च्या पशुगणनेत महाराष्ट्रात गाढवांची संख्या ही सुमारे ७० हजार एवढी होती. २००७ च्या पशुगणनेत तीच संख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त घटली, तर २०१३ ला ही संख्या घसरून आणखीन कमी झाली. आतापर्यंत आमच्या मोहल्ल्यातून शंभरच्या वर गाढवं चोरीला गेलीत. पोलीस मात्र आमच्या चोरी गेलेल्या गाढवांच्या तक्रारीही सहजासहजी स्वीकारत नाहीत. एका गाढवाची किंमत ही सर्वसाधारणपणे ७ ते ८ हजार रुपयापर्यंत आहे.
साधा पाच हजारांचा मोबाइल चोरीला गेला तर त्याची तक्रार घेतली जाते, पण आमच्या तर उपजीविकेचे साधनच चोरीला जातं तेव्हा आम्ही काय करायचं, कसं जगायचं? आणि ही समस्या आमचीच नाही, तर सगळ्यांचीच आहे. परिसरातील अकोला, आकोट, नांदेड, दर्यापूर, अचलपूर, खोलापूर, येवदा आदी गावांमध्येसुद्धा गाढवचोरांनी गाढवं पाळणाऱ्यांना हतबल करून सोडलं आहे.’ चौरे यांच्या म्हणण्यानुसार, गाढवाचं दूध पिल्याने तसंच गाढवाचं मांस भक्षण केल्याने लैंगिक शक्ती वाढते, अशा गरसमजांमुळे गाढवांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या कपोलकल्पित गोष्टींना गाढव बळी पडत आहे. एखाद्या कासवाच्या जातीसाठी झाडून सारे प्राणिमित्र, प्राणी संघटना लढताना दिसतात; परंतु निरुपद्रवी असणाऱ्या, ओझे वाहून नेण्यात सक्षम असणाऱ्या गाढवांसारख्या गरीब पाळीव प्राण्यांबद्दल मात्र सगळीकडेच अनास्था दिसून येते. हे सर्व चित्र असेच राहिले तर येत्या काही वर्षांमध्ये वाघांपाठोपाठ आपल्याला गाढव नावाचा प्राणीही शालेय पुस्तकामधूनच पाहावा लागेल.

स्वयंचलित मशीनच..!
पाळीव प्राण्यांमध्ये गाढव हा प्राणी गरीब प्राणी समजला जातो. तो अतिशय कष्टाळू, मेहनती प्राणी आहे. ओझं वाहून नेत असताना ओझं उतरल्यावर गाढव जिथल्या तिथे परत येतं. गाढव ५० किलोचं ओझं सुमारे ५ किलोमीटपर्यंत घेऊन जाऊ शकतं. तसंच गाढव आपल्या वजनाच्या दीडपट वजन वाहून नेऊ शकतं. गाढव हे आपलं ठिकाण हरवत नाही. शिवाय गाढव कुणाला चावत नाही. ते चिडल्यावर लाथा मारतं एवढचं काय ते त्याचं उपद्रवमूल्य. गाढव हे स्वच्छतादूत म्हणूनही महत्त्वाचं आहे. ते रस्त्यावरच्या केरकचऱ्यावरून, केळीची सालं, भाजीपाला, फळं यांची सालं, खरकटं अन्न आदी खाऊन परिसर स्वच्छ ठेवतं. गाढवाचं सर्वसाधारण आयुष्य १५ ते २० र्वष आहे. गाढवाच्या पिलाचं सर्वसाधारणपणे तीन वर्षांत पूर्ण गाढवात रूपांतर होतं गाढवाच्या मादीला एका वेळी एकच पिल्लू होतं. भटकी कुत्री मात्र गाढवांच्या पिलांना जखमी करून मारून टाकतात.

गाढवांचा बाजार..!
राज्यात प्रामुख्याने घोडे माळेगाव नांदेड जिल्हा, सोलापूर, सातारा जिल्हय़ातील जेजुरी, िहगोली जिल्हय़ातील मालेगाव, बुलढाणा जिल्हय़ातील देऊळगाव राजा येथे भरतो तर धुळे जिल्हय़ातील सारंगखेडा येथे दत्त जयंतीला गाढवांचा बाजार भरतो. महाराष्ट्रात मराठवाडय़ाच्या सीमेवर असलेल्या नगर जिल्हय़ातील मढी येथे होळीच्या काळात गाढवांचा मोठा बाजार भरतो. तर महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदशातील उज्जेन, गुजरातमध्ये बडौदा येथे गाढवांचा बाजार भरतो. 
कुठल्याही जत्रेला गेले की, गधा पन्नालाल, हिरालाल याच्या हुशारीने केलेले मनोरंजन कमी-अधिक जास्त आपण सर्वानीच अनुभवलेले असेल. तसेच अलीबाबा चाळीस चोरचा अलीबाबा आपल्या गाढवांद्वारेच वाहतूक करून उदरनिर्वाह करताना दिसतो. तर मराठी चित्रपटामध्येपण ‘गाढवाचं लगीन’सारख्या चित्रपटांमधून आपण गाढव चरित्रातलं मनोरंजन अनुभवलं आहे. त्याशिवाय सामाजिक निषेध म्हटला की आपल्या डोळ्यासमोर गाढवावर बसून काढली गेलेली एखाद्याची िधड पटकन आठवते. महाराष्ट्राच्या काही भागांत तर पाऊस लांबला किंवा पाऊस आला नाही तर गाढवाचं लग्न लावून द्यायची एक प्रथा आहे. गाढवाचं लग्न लावून दिल्यास पाऊस हमखास बरसतो अशी ग्रामीण भागात काही लोकांची श्रद्धा आहे. इंग्लंडमधील ‘द डॉन्की सेंच्युअरी’ ही गाढवांवर संशोधन करणारी संस्था महाराष्ट्रातील गाढवांवर संशोधन करते आहे. गाढवांच्या संख्येत महाराष्ट्राचा भारतात चौथा क्रमांक असून त्यातही विदर्भात गाढवांची संख्या सर्वाधिक आहे तर त्यातही आकोला, अमरावती जिल्ह्य़ात गाढवांची संख्या ही निम्म्याहून जास्त आहे.

गाढवपालनासाठी शासनाच्या कुठल्याच योजना नाहीत. आज ओझी वाहून नेण्याकरिता गाढव हे सर्वात स्वस्त साधन आहे. सात ते आठ हजाराला मिळणारं गाढव कुठल्याही ऋतूत काम करतं. शिवाय गाढवांचा आहारपण इतर प्राण्यांप्रमाणेच असतो.

पारंपरिक व्यवसायासोबतच गाढवांबद्दल आपुलकी, प्रेम जपणाऱ्या भोई समाजाने वर्षांनुर्वष गाढवपूजन आणि गाढवांचा पोळा साजरा करत आपली अनोखी संस्कृती जपली आहे. माती, गोटे, वाळू, विटा (गाढवांद्वारा) वाहून नेणे आणि आपला उदरनिर्वाह करणे हाच या भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय मात्र पारंपरिक व्यवसायासोबतच जपलेलं अनोखं संस्कृतिभान या समाजाला वेगळी ओळख देऊन जातं आहे.