नेपाळला आम्ही भेट दिली होती ती भूकंपाच्या आधी. निसर्गसौंदर्याने नटलेला, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला तो चिमुकला देश मनावर ठसा उमटवून गेला होता. आता तर ते तो ठसा अधिकच गडद झाला आहे. कारण भूकंपानंतर या देशात अक्षरश: होत्याचे नव्हते झाले आहे. पण त्याआधी आम्ही पाहिलेला नेपाळ आता पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही याचे वैषम्य वाटते आणि ते आठ दिवस पुन्हा पुन्हा आठवत राहातात.

मी आणी माझ्या पत्नीने नेपाळला पर्यटनासाठी जाण्याचे ठरविले तेव्हा ‘तुम्ही नेपाळला चाललाय? पशुपतीनाथ सोडले तर काय पाहण्यासारखे आहे त्या गरीब देशात?’ अशा प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रांकडून आल्या. परंतु आम्ही जेव्हा पुरी, भुवनेश्वर, कोलकाता, गंगटोक, दार्जििलंग करून काठमांडूमध्ये प्रवेश केला तेव्हा आपण आपल्याच देशातील कोणत्यातरी राज्यात आल्याचे जाणवले. दार्जििलंग वरून सकाळी जेव्हा मिरीक लेक या सुंदर ठिकाणी जाण्यास निघालो तेव्हा घाटरस्त्यातील अलौकिक सृष्टीसौंदर्य पाहून, चहाचे मळे पाहून मंत्रमुग्ध झालो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कारने काकार्विता या नेपाळ सीमेमार्गे भद्रपूर या छोटय़ा विमानतळावर जाण्यास निघालो तेव्हा दुसऱ्या देशात प्रथमच प्रवेश करीत असल्याने थोडा साशंक होतो. परंतु थोडय़ाच वेळात ‘सुलभ’ प्रवेश प्रक्रियेद्वारे नेपाळमध्ये प्रवेश केला. छोटेखानी विमान नियोजित वेळत सुटून सुमारे ५० मिनिटांत काठमांडू येथे पोहोचलो. परंतु विमानातून जाताना सुंदर आकाश, बर्फाळ प्रदेश, लांबूनच का होईना झालेले अन्नपूर्णा व एव्हरेस्ट पर्वतराजी यांचे दर्शन मनास सुखावून गेले. काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरून थामेल या पर्यटकांसाठी राखीव असलेल्या भागातील हॉटेलवर पोहोचलो. रूमचा ताबा घेतल्यावर जवळच असलेल्या काठमांडू दरबारला भेट दिली. अत्यंत भव्य व सुंदर मंदिरे, मनमोहक कारागिरी, संग्रहालय, कुमारी माता मंदिर खूपच छान. दुसऱ्या दिवशी काठमांडू व आसपासच्या स्थळांना भेटी दिल्या. मनोहारी भक्तपूर दरबार पहिला. अत्यंत सुंदर कारागिरीने नटलेली मंदिरे, सज्जे, महाल आणी संपूर्ण परिसर पाहिला की भान हरपून जाते. पशुपतीनाथ मंदिरही सुंदर आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असूनही भव्य मंदिर पाहून, शिवलिंगाचे दर्शन घेताना भान हरपते, मंदिरामागील १२ ज्योतिर्लिगाची मंदिरे व घाटही सुंदर. पाटण दरबार, स्वयंभूनाथ मंदिर, बौद्ध स्तूप काठमांडूमध्ये नेपाळी खान्याबरोबरच, मोमोज, थुक्पा, चाउमेनचा आस्वाद घेतला. हॉटेल सोडून पोखरा येथे जाण्यासाठी बसने निघालो. वाटेत देवीचे सुंदर मनकामना मंदिर आहे. येथे जाण्यासाठी उतरलो. येथे केबल कारने जाण्याची अत्यंत सुंदर व्यवस्था नेपाळ सरकारने केली आहे. सुमारे दहा मिनिटांत आपण एवढय़ा उत्तुंग शिखरावरील मंदिरात पोहोचतोदेखील. मंदिर परिसर थोडासा अस्वच्छ असूनही परिसरातून दिसणाऱ्या पर्वतराजी, उचंच उंच झाडे, निर्मळ वाहणारी नदी खूपच सुंदर. केबल कारच्या परतीच्या प्रवासानंतर पोखरा येथे जाण्यासाठी बसने निघालो. रस्ता खराब असूनही नदी शेजारून जाणारा रस्ता व एका बाजूला उंच डोंगर आणि त्यावरील झाडांची दाटीवाटी पाहून निसर्गाने मुक्तहस्ताने दान दिल्याचे जाणवते. पोखरा येथे सुंदर लेकव्ह्य़ू असलेल्या हॉटेल रूमचा ताबा घेऊन जवळच असणाऱ्या मार्केटला भेट दिली. येथे हिमालयन ट्रेकिंग, साहसी खेळ इ. आस्वाद घेण्यासाठी भरपूर परदेशी पर्यटक येतात. त्यामुळे मेन मार्केट व विविध प्रकारची हॉटेल्स बघून पुण्यातील लष्कर परिसराची आठवण आली. फेवा लेक परिसरातील मार्केट खूपच मोठे परंतु अत्यंत महागडे. पोखरा दर्शनसाठी बसने निघालो. विंध्यवासिनी मंदिर छोटेखानी, परंतु येथून हिमालयातील अन्नपूर्णा व माछुपिचू पर्वतांचे सुंदर दर्शन झाले. तद्नंतर महिंद्र (वटवाघुळ) गुहा, गोरखा मेमोरियल, अलौकिक गुप्तेश्वर महादेव, बेग्नास लेक, डेविडस धबधबा खूपच सुंदर. शेवटी सुमाद्राची आठवण करून देणारा भव्य फेवालेक, व बोटीने जाऊन पाहता येणारे शांती मंदिरही सुंदर. पोखरा निसर्गरम्य असल्याने वेळ कसा जातो ते अजिबात कळत नाही.
दुसऱ्या दिवशी पोखरा येथून जवळच असणाऱ्या चितवनची जंगल सफर करण्यासाठी निघालो. परदेशी पर्यटक असल्याने बस चांगली होती. चितवनमधील जंगल रिसोर्ट येथे मुक्कामाची व्यवस्था चांगली होती. तेथे दुपारी विश्रांतीनंतर सूर्यास्त, व स्थानिक नेपाळी कलाकारांचा नृत्य कार्यक्रम पाहून दुसऱ्या दिवशीचे जंगल सफारीचे बुकिंग केले. येथे नेपाळ सरकारची हत्तींवरून जंगल पाहण्याची व्यवस्था आहे, परंतु काहीशी महागडी.
पहाटे साडेपाचच्या कडाक्याच्या थंडीत जीपने जंगल सफारीसाठी निघालो. अत्यंत आल्हाददायक धुक्याचा परिसर व दाट जंगल. येथील जंगल परिसर भारतातील ताडोबा, राधानगरी, कान्हा जंगलांच्या तुलनेत लहान आहे. पण तो लष्कराच्या ताब्यात आहे. फारशी वर्दळ नसलेल्या परिसरात गेल्याने सांबार, हरीण, अस्वले, त्यांची गुहा, आणि अर्थातच येथील प्रसिद्ध पाणगेंडे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. जंगलातील भव्य तळी, त्यातील मगर, सुसर इत्यादी प्राणिमात्रांचा तसेच विविध पक्षी, माकडे यांचा प्रत्यक्ष वावर आसपास असल्याने सुखावलो.
हॉटेलवर परतल्यावर थोडय़ाशा विश्रांतीनंतर येथील एलिफंट बाथ अर्थात ‘हत्तींची आंघोळ’ अनुभवली. येथील विविध प्राणी व पक्ष्यांचे अवशेष जतन केलेले संग्रहालय सुंदर आहे. दुपारी आशियातील एकमेव एलिफंट ब्रीडिंग फार्मला भेट दिली. येथे नदीतून बोटीने जावे लागते. हत्तींची छोटी छोटी पिल्ले प्रथमच पाहात होतो.
शांतिदूत गौतमबुद्धांचे जन्मस्थान असलेले प्रसिद्ध लुंबिनी गाव हे येथून जवळच असल्याने तेथे भेट देण्याचे ठरविले होते. त्यानुसार पोहोचलो. भारत-नेपाळ सीमेच्या जवळच असलेले हे छोटेखानी गाव बौद्धधर्मीयांचे पवित्र ठिकाण तर आहेच, परंतु संपूर्ण जगातील पर्यटक, बौद्धधर्मीय येथे भेट देतात. गौतमबुद्धांचे जन्मस्थान असलेले पवित्र मायादेवी मंदिर व त्यामधील जपून ठेवलेले अवशेष पाहून मंत्रमुग्ध झालो. आणि परिसरातील बोधिवृक्ष, कुंड व सम्राट अशोकाने बांधलेला स्तंभ पाहून नतमस्तक झालो. याच परिसरात जवळ जवळ ९०० एकर परिसरात ‘लिटील बुद्धा’च्या प्रतिकृतीपासून जगातील विविध देशांमधील भव्य बौद्ध मंदिरे, स्तूप यांच्या प्रतिकृती पाहिल्या. त्यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. चीन, श्रीलंका, ब्रह्मदेश, म्यानमार, फ्रान्स, जर्मनी, जपान, भारत या देशांमधील पूर्ण झालेली तसेच कंबोडिया, बर्मा या देशांमधील होऊ घातलेल्या मंदिरांची कामे पाहताना दिवस मावळला. उद्या नेपाळ भेटीचा शेवटचा दिवस असल्याने व हाती थोडा वेळ असल्याने येथील बौद्ध संग्रहालयास भेट देण्याचा योग आला. येथे बौद्ध काळातील अवशेष, कोरीव शिल्पे तसेच भारतातील अजंठा, एलोरा, बौद्ध गया इतकेच काय कार्ले, भाजे येथील स्तूपांचे फोटो पाहताना अतीव आनंद झाला.
किरण गुळुंबे response.lokprabha@expressindia.com