शॉपिंग विशेष

कपडे असोत की गॅझेट्स आपल्याला नेमकं काय हवंय हे माहीत असेल तर सणासुदीच्या दिवसात दुकानातल्या गर्दीत कशाला जायचं? घरबसल्या एका क्लिकवर आता सगळी खरेदीची दुनिया आपल्यासमोर हजर आहे. विंडो शॉपिंग आवडीने करणाऱ्यांसाठी आता इंटरनेटची विंडो चोवीस तास खुली आहे.
मनसोक्त खरेदी करणं, शॉपिंग करणं, त्यासाठी या दुकानातून त्या दुकानात फिरणं, मॉल्स पालथे घालणं आणि हव्या त्या दुकानांमधून हव्या त्या वस्तूंची भरपूर खरेदी झाल्यावर थकूनभागून घरी येणं.. अर्थात शॉप टिल यू ड्रॉप.. हे प्रत्येक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात सारखंच असतं. त्यातून आता तर दसरा-दिवाळी, म्हणजे धम्माल शॉपिंगचा पीक सीझन’. एव्हाना सर्व मॉल्स, शॉपिंग सेंटर्सवर तर रंगीबेरंगी लाइटींच्या, आकर्षक रोषणाईच्या माळाही चढल्या आहेत. ग्राहकराजावर विविध ऑफर्सचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. दिवस शॉपिंगचे आहेत.. पण गर्दी आणि पायपीट आवडत नाही त्यांच्यासाठी दुकानं आणि मॉलच्या पायऱ्या झिजवण्याचे दिवस आता संपले. त्यांच्यासाठी आता आहे, ऑनलाइन शॉपिंग.. सो फ्रेण्ड्स, से नो टू विण्डो शॉपिंग अँड यस टू स्क्रीन शॉपिंग!
दृश्य पहिलं
अविनाश : अरे पुष्कर, मला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे रे, पण जायला वेळच होत नाहीये, काय करू?
पुष्कर : कुठे जायची गरजच नाही. फ्लिपकार्टवर जा आणि बुक कर ना. त्यांच्या वेबसाइटवर अनेक लेटेस्ट मोबाइल्सचे मॉडेल्स तुला पाहता येतील. तुला हवा तो त्यातून निवड आणि घेऊन टाक.
दृश्य दुसरं
शिवानी : गीता, मी क्लिनिकल सायकॉलॉजीत डॉक्टरेट करतेय. लायब्ररीतून मिळालेल्या पुस्तकांच्या आधारे अभ्यास सुरू आहे. मात्र, काही पुस्तकं मिळतच नाहीएत. काय करू, सर्व काम अडलंय..
गीता : टेन्शन घेऊ नकोस. अ‍ॅमॅझॉन डॉट कॉमवर जा. विषयानुसार पुस्तकांची सविस्तर माहिती उपलब्ध असते. पुस्तक कोणतं ते ठरव आणि घेऊन टाक. सोप्पंय. घरबसल्या पुस्तकं तुझ्या हाती येतील. चार दुकानं फिरायला नको की शोधाशोध करायला नको.
नेलपॉलिशच्या हजारो शेड्स, केसाच्या पिनांचे बदलते ट्रेण्ड्स इथपासून ते कपडे, चपला, शूज, पुस्तकं आणखी काय वाट्टेल ते पाहण्याची आणि त्यातलं आवडलेलं घरच्या घरी मागवून घेण्याची एक छानशी सोय आता एका क्लिकसरशी उपलब्ध झाली आहे. त्याची ही वरची दोन प्रातिनिधिक उदाहरणं. शॉपिंगचा बदलता ट्रेण्ड.. ऑनलाइन शॉपिंग. खरंतर हा पाश्चात्त्यांचा शॉपिंग प्रकार. मात्र आता आपल्याकडे चांगलाच मूळ धरू लागलाय.
परवलीचा शब्द
ऑनलाइन शॉपिंग या नव्या व्हेंचरला आíथक, सामाजिक, तांत्रिक (म्हणजे टेक्नॉलॉजिकल), दिल्लॉजिकल पण.. असे अनेक पदर आहेत. तंत्रज्ञान साक्षरतेचं (टेक्नोसॅव्ही) प्रमाण आता आपल्याकडे मूळ धरू लागलंय. त्यामुळेच डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉप आणि साध्या मोबाइलपेक्षा स्मार्टफोन यांना महत्त्व देणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बरं, याला काही वयाचं बंधन नाही. त्यामुळे नुकत्याच चालायला लागलेल्या बाळापासून ते चालता येत नसल्यामुळे हातात काठी घेऊन फिराव्या लागणाऱ्या आजोबांपर्यंत (आठवा व्होडाफोनची नवी जाहिरात) या सर्वानाच हे तंत्र अवगत होऊ शकतं एवढं सोपं आहे. टेक्नोसॅव्हींच्या या वाढत्या प्रमाणामुळे या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समधला इंटरनेटचा वापर हा ऑनलाइन शॉपिंगच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरला आहे. इंटरनेटसाठी सायबर कॅफेत धाव घेण्याचे दिवस तर आत्ता.. परवापरवा संपले. सरकारमान्य ब्रॉडबँड सेवेद्वारे घरबसल्या मायाजालाची गंगा प्रवाही झाली. केबलनेट, डेटाकार्ड आदींच्या माध्यमातून इंटरनेट अ‍ॅक्सेस सहजसुलभ झाला. आता तर डेस्कटॉप, लॅपटॉप मागे पडून तळहातावरील मोबाइलमध्येच इंटरनेटचा मुक्त संचार सुरू झाल्याने दुनिया मुठ्ठीमध्ये आली आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या प्रसारामागचे मूळ यातच तर दडले आहे. स्मार्टफोन आणि टू-जी, थ्री-जी यंत्रणांमुळे मोबाइलमधलं नेट असणं सोपंही आहे आणि स्वस्तही. बिल भरणं असो, प्रवासाचं आरक्षण असो किंवा अन्य काहीही.. ही सर्व कामं न रांगा लावता, वेळेचा अपव्यय न करता, सहज होऊ लागली. या यंत्रणेवर लोकांचा विश्वास बसू लागला. ऑनलाइन बिल भरल्यावर आपल्या खात्यातून वळती झालेली रक्कम आपण दिलेलीच आहे याबाबत खात्री पटू लागली आणि यातूनच ऑनलाइन शॉपिंगचा फण्डा जन्माला आला. बरं, यासाठी काही तुमच्याकडे जगातले सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असायलाच हवेत अशीही अट नाही. इंटरनेटची सोय असलेला एक मोबाइल असला की झालं. या दोन्ही गोष्टींची उपलब्धता सहज झाल्याने ऑनलाइन शॉपिंग हा परवलीचा शब्द झाला आहे.

सर्वाधिक पसंती
*     डिझायनर ड्रेस
*     घडय़ाळं
*     पफ्र्युम्स
*     चपला, बूट
*     पुस्तकं
*     फूड आयटेम्स
*     ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी
*     फर्निचर, होम अप्लायन्सेस
*     इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मोबाइल्स, स्मार्टफोन्स

ब्रँण्डेड वस्तू खरेदी करण्याची एक आगळी क्रेझ निर्माण झाली आहे. खर्चिक असलं तरी एखाद्या प्रसिद्ध ब्रँण्डची वस्तू घेणं आता स्टेटस सिम्बॉल झालं आहे. ऑनलाइन शॉपिंगनुसार वस्तू घेताना तिची किंमत वाढते, मात्र ती देण्यासाठीही मंडळी तयार आहे. लिक्विडिटी अर्थात खर्च करण्यासाठी रक्कम तयार असणाऱ्या लोकांचा वर्ग वाढतो आहे. नवरा-बायको नोकरी करत आहे, दोघांची मिळून एक भरीव रक्कम खात्यात जमा होतेय, कुटुंब छोटं आहे, छानशा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घर आहे, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीत, असा वर्ग मोठय़ा प्रमाणावर तयार झाला आहे. त्यातूनच मग पसा खर्च करण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही निर्माण होतात. शॉपिंग कुठलंही असलं तरी ते खिशाला चाट देणारंच असतं. परंतु हातात पसा असल्या कारणाने चांगल्या दर्जेदार गोष्टीसाठी चार पसे जास्त देण्याची त्यांची मानसिकता आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या आक्रमणानंतर आपलं आयुष्य वैयक्तिक, एककेंद्री असं होऊ लागलं आहे. एकत्र भेटणं-भटकणं यापेक्षा व्हच्र्युअल जगाची सर करण्यातला आनंद वाढला आहे. याचा अर्थ दादरच्या रानडे रोडवरची किंवा पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरची गर्दी पार ओसरली आहे असा नव्हे, परंतु या गर्दीतली काही मंडळी आता घरबसल्याच एका क्लिकवर शॉपिंगचा आनंद लुटू लागली आहेत.
बदलता ट्रेण्ड
स्मार्टफोन, इंटरनेट हे केवळ शहरातच आलंय आणि निमशहरी, ग्रामीण भाग त्याला अपवाद आहे असा विचार करत असाल तर तो झटकून टाकणंच योग्य होईल. मुंबई, दिल्ली, बंगलोर या मेट्रो सिटीजबरोबरच छोटय़ा शहरांतही ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड वाढत चालला आहे. ईशान्येकडील राज्य म्हणजे मागास वगरे असे आपण समजतो. मात्र, आसामची राजधानी गुवाहाटीत ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मंत्रा डॉट कॉम या फॅशनविश्वातल्या आघाडीच्या वेबसाइटने केलेल्या सर्वेक्षणात ऑनलाइन शॉपिंगमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांच्यानंतर गुवाहाटीचा नंबर लागतो. केवळ गुवाहाटीच नव्हे तर ईशान्येतील अनेक शहरांमध्ये ऑनलाइन शॉपिंग प्रबळ होताना दिसत आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, चंडीगढ, लुधियाना, लखनऊ, जयपूर, नागपूर आदी शहरांमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार या शहरांतील जवळपास ४० टक्के ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली. त्यात अर्थातच यंग चॅप्सचा भरणा जास्त होता. येत्या दोन-तीन वर्षांत ऑनलाइन शॉपिंगचा हा ट्रेण्ड आणखी वाढत जाऊन ऑनलाइन रिटेल इंडस्ट्रीचा टर्नओव्हर सात ते आठ हजार कोटींच्या घरात असेल असा अंदाज आहे.

गुगल इंडियाने या वर्षांच्या सुरुवातीला ऑनलाइन शॉपिंगच्या भारतातील वाढत्या प्रस्थाच्या पाश्र्वभूमीवर एक पाहणी केली होती. त्यात असे आढळून आले की, या शॉपिंग प्रकारात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्चलिस्टमध्ये अग्रक्रमावर होत्या. प्रत्यक्षात मात्र सर्वाधिक खरेदी झाली ती कपडय़ांची! शिवाय ऑनलाइन खरेदी करण्याच्या टक्केवारीतही विलक्षण वाढ झाल्याचे निरीक्षण या पाहणीत नोंदवण्यात आले. २०१०-११ मध्ये फक्त ४० टक्के ग्राहकांनीच ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली होती. मात्र, २०११-१२ या कालावधीत त्यात लक्षणीय वाढ होऊन १२८ टक्के ग्राहक ऑनलाइन शॉपिंगमध्ये आले. अ‍ॅप्पॅरल अ‍ॅक्सेसरीज, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, पुस्तके आणि गृहोपयोगी वस्तू असा उतरता पसंतीक्रम या शॉपिंग दुनियेत होता.
ग्राहकाचे समाधान न झाल्यास त्याची रक्कम परत करणे, कॅश ऑन डिलिव्हरी, फास्ट डिलिव्हरी, उत्तमोत्तम पर्यायांची उपलब्धता या सर्व कारणांमुळे ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंगला सर्वाधिक पसंती दिली व त्यात सातत्याने वाढ झाल्याचे निरीक्षणही गुगल इंडियाने नोंदवले आहे.
निमशहरी-ग्रामीण भागातल्या लोकांची ब्रॅण्ड्सबद्दलची जागरूकता वाढली आहे. तंत्रज्ञान हाताशी असल्याने नवनव्या गोष्टी आपलंसं करणं त्यांना सोपं झालंय. लोकांच्या शॉपिंगच्या भूमिकेतला बदल त्या त्या राज्य सरकारांच्या लक्षात आला आहे. ऑनलाइन शॉपिंगवर काही कर लागू करण्यासंबंधी आसामचं सरकार विचार करतंय, यावरून या ट्रेण्डची व्याप्ती लक्षात यावी.
जुलै महिन्यात Yebhi.com या वेबसाइटने IRCTC शी ऑनलाइन शॉपिंगसाठी टायअप केलं. याद्वारे दररोज कोटय़वधी हिट्स मिळणाऱ्या रेल्वेच्या वेबसाइटवर शॉपिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या साइटला मिळालेली पहिली ऑर्डर कुठल्याही मेट्रो शहरातूनही आलेली नव्हती. झारखंडमधल्या सिंगभूम जिल्ह्यतल्या चक्रधरपूर नावाच्या शहरातून ही ऑर्डर नोंदवण्यात आली. ऑनलाइन शॉपिंगचा पसारा किती सर्वसमावेशक होत चालला आहे याचं हे द्योतक.
किशोर बियाणी यांची बिग बझार चेन सर्वानाच परिचित आहे. या कंपनीद्वारे ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रायोगिक तत्त्वावर बिग बझार डायरेक्ट हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. फ्रँचाइजी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या या संकल्पनेचा शुभारंभ विदर्भात करण्यात आला. ग्राहक आणि विक्रेता यांच्यात थेट खरेदी-विक्री होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प कार्यान्वित होतोय. शॉपिंग म्हणजे केवळ लब्धप्रतिष्ठितांसाठीच, हा समज हळूहळू दूर होतोय.
तारक की मारक?
ऑनलाइन शॉपिंग करताना मात्र तुमच्यासमोर असतं ते सारं आभासी जग. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष दुकानात जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचे विविध प्रकार (व्हरायटी) हाताळता येतात, त्याची अनुभूती घेता येते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनुभूतीचा हा मामला नाही. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तसंच प्रॉडक्ट तुमच्या हातात पडेल याची शाश्वती नाही. मिळालंच तर आनंद, नाही मिळालं तर तुम्ही त्या प्रॉडक्टचे पसे आधीच भरलेले असतात. शिवाय पसे भरताना स्क्रीनवर आलेल्या अटी-नियमांच्या खाली असलेल्या ‘आय अ‍ॅग्री’ या ऑप्शनवर आधीच क्लिक केलेले असते त्यामुळे वस्तू प्रत्यक्ष हाती पडल्यानंतर तिचा स्वीकार करण्यावाचून गत्यंतर नसतेच. तक्रार केली तर ज्यांच्याकडे तुम्ही शॉपिंग केली ते नियमांकडे बोट दाखवणार. म्हणजे तुम्हाला काहीच बोलता येत नाही. तुम्ही जास्त कटकट केलीच तर अमुक एक दंडाची रक्कम कापून घेऊन वस्तू परत घेणार. म्हणजे तुम्हाला पुन्हा तीच वस्तू घेण्यासाठी ‘पुनश्च हरिओम’ करण्यावाचून गत्यंतर नाही उरत. असा हा सरळसरळ मामला. पटलं तर घ्या, नाहीतर दुसरे पर्याय उपलब्ध आहेतच. आपलं आपण ठरवायचं, आपल्याला नक्की काय हवंय ते.. मात्र, आता यातही सुधारणा होऊ लागल्या आहेत.

उदाहरणच द्यायचं झालं तर ओएलएक्स डॉट कॉमचं देता येईल. टीव्ही, सोफासेट, गाडी, घर अगदी वाट्टेल ते खरेदी आणि विक्री करण्याची छान सोय या संकेतस्थळाने करून दिली आहे. तुम्हाला या वेबसाइटवरील एखादा ड्रेस आवडला आणि तुम्हाला अगदी परफेक्ट बसणारा ड्रेस शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही वेबसाइटवरील आवश्यक ऑप्शन्सवर क्लिक केलंत की संबंधित विभागाचे लोक येऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या ड्रेसचं डिझाइन दाखवतील. तुम्हाला फिट होईल या मापाचा ड्रेस शिवून देतील. त्यानंतरच तुम्ही त्याचे पसे द्यायचे. तुम्हाला शिवलेल्या ड्रेसमध्ये काही बदल करायचे असल्यास तसेही करून मिळते. पशाचा मामला नंतर. तुम्हाला पसंतच नाही पडला तरी काही हरकत नाही.

ऑनलाइन शॉपिंगच्या लोकप्रिय वेबसाइट्स
* ई-बे इंडिया     
* ओएलएक्स
* जॅबाँग डॉट कॉम     
* अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम
* फ्लिपकार्ट इंडिया     
* अलिबाबा डॉट कॉम
* मंत्रा डॉट कॉम     
* शॉपऑनलाइन डॉट कॉम
* स्मार्टडील्स डॉट कॉम

फ्लिपकार्टवरही अशाच प्रकारच्या ऑफर्स लागू असतात. तुम्हाला हवी ती वस्तू मिळाल्याचं समाधान झालं की मगच तुम्ही त्याचे पसे संबंधितांना तुमच्या ऑनलाइन खात्यातून वळते करायचे. त्यात काही गर नाही. कमीअधिक प्रमाणात आता बहुतांश ऑनलाइन शॉपिंग व्यवहारात हे लागू झाले आहे.
ऑनलाइन शॉपिंगचं चित्र सकारात्मक असलं तरी त्याच्या प्रसारात काही अडथळे आहेत. लॉजिक्टिस आणि करप्रणाली हे ऑनलाइन शॉपिंगच्या वाढीसाठी मारक गोष्टी आहेत असे प्रसिद्ध ई-बे वेबसाइटचे व्यवस्थापकीय संचालक लतीफ नाथानी यांनी स्पष्ट केलंय. ५० विविध प्रकारचे कर लागू झाल्याने वस्तूची किंमत वाढते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकाला त्याच्या घरापर्यंत वस्तू पोहोचवण्याचे काम कंपनीचे असते. यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा ग्राहकाच्या खिशातूनच जातो. वस्तूंच्या ने-आण यंत्रणेवरील करप्रणालीत बदल आवश्यक असल्याचे नाथानी यांनी म्हटलं आहे. ऑनलाइन शॉपिंगला भौगौलिक मर्यादा नसल्याने देशांतर्गत वस्तूची-मालाची ने-आण करावी लागू शकते. अशा वेळी खर्चाची रक्कम आणखी वाढू शकते.
ऑनलाइन शॉपिंगमध्ये ई-बे कंपनी १९९५ पासून आहे. आíथक व्यवहारात पारदर्शकता यावी आणि व्यवहार निर्धोक व्हावा यासाठी ई-बे कंपनीने एक यंत्रणा राबवली आहे. ग्राहक तत्काळ वस्तू खरेदी करू शकतो. परंतु वस्तू त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्यानंतरच त्याच्या खात्यातून पसे वळते होतील अशी ही व्यवस्था आहे. पसे गेले म्हणजे संपले, आता कोणी वाली नाही अशी गत अनेकदा प्रत्यक्ष खरेदी-विक्री प्रकारात होते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये समोर असं कुणी नसतंच. हे असं होऊ नये म्हणूनच अशा यंत्रणा राबवणं अत्यावश्यक आहे.
एटीएम मशीन, डेबिट्स कार्डससंदर्भात समोर येणारे गुन्हे पाहता ऑनलाइन शॉपिंगमधला आíथक व्यवहाराचा मुद्दा कळीचा ठरतो. यासाठी कंपन्यांनी आणि व्हच्र्युअल खरेदीची चंगळ अंगीकारलेल्या ग्राहकांनी सावधानता बाळगणे नितांत गरजेचे आहे.
ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय उपलब्ध करणारी अनेक संकेतस्थळं सिक्युरिटी गेटचा वापर करतात. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना आपण सिक्युरिटी गेटमध्ये आहोत किंवा कसे याची खातरजमा करून घेणे आवश्यक ठरते. शक्यतो नेटबँकिंगचाच वापर करावा. आणि सायबर कॅफेतून ऑनलाइन शॉपिंग करणे केव्हाही योग्यच. कारण तेथील नेटसुरक्षेची हमी देता येऊ शकत नाही.
ट्रेण्ड बदलण्याची कारणे
ऑनलाइन शॉपिंगला महत्त्व येण्याची तशी बरीच कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेली युवाशक्ती. ऑनलाइन शॉपिंगमध्ये सध्या १८ ते ३० या वयोगटातील तरुणांचाच भरणा अधिक आहे. तसंच आपल्याकडे इंटरनेट साक्षरताही झपाटय़ाने वाढते आहे. त्यामुळेच पारंपरिक खरेदीला फाटा देऊन ऑनलाइन खरेदीला अधिक मागणी होऊ लागली आहे. शिवाय या प्रकारात एकाच वेळी अनेक पर्याय एकाच स्क्रीनवर उपलब्ध असतात. अमुकच एक वस्तू तुम्हाला फिट्ट शोभून दिसते असे सांगून वस्तू गळ्यात मारणारा दुकानदार या ठिकाणी नसतो. शिवाय तुम्हाला हवा तेवढा वेळ या शॉपिंगमध्ये घालवता येऊ शकतो. एकाच वस्तूचे अक्षरश: शेकडो-हजारो पर्याय उपलब्ध असणे हे दर्दी खरेदीदारांसाठी तर पर्वणीच. शिवाय तुम्हाला त्याच वस्तूच्या दराविषयी जाणून घ्यायचे असेल तर प्रतिस्पर्धी वेबसाइटवर क्लिक करून तुम्ही किमतीतील फरक ताडू शकता. शिवाय वस्तू खरेदी करण्यासाठी लगेचच पसे देण्याची गरज नसते. शिवाय यात श्रीमंत-गरीब असा भेदाभेदही नाही. अगदी ४९ रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या वस्तूंची तुम्ही खरेदी-विक्री बिनधोकपणे करण्याची मुभा ऑनलाइन शॉपिंगमध्ये असते.
जागेच्या वाढत्या किमती, दिवसेंदिवस वाढती महागाई, मनुष्यबळाची वाढती कमतरता यामुळे अनेक कंपन्यांनाही आता ऑनलाइन शॉपिंग हा व्यवहार अधिकाधिक व्यवहार्य वाटू लागला आहे. त्या माध्यमातून एकाच वेळी लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, शिवाय जागेची अडचण नाही की इतर मेण्टेनन्सची गरज नाही की वेळेचे बंधन नाही. सोमवारी-बुधवारी दुकान बंद अशी पाटी लावण्याची गरज नाही. २४ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस दुकान उघडेच राहते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्यवहार फायद्याचा ठरतो.