|| प्रकाश खाडे

टाळ-मृदंगांच्या तालावर विठू नामाचा गजर करीत कठीण दिवेघाट पार करुन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रात्री नऊ वाजता  संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावला.

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखीने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. एकादशीनिमित्त ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळाच्या पदार्थाचे वाटप करण्यात आले. दुपारी वडकीनाला येथे थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात झाली. पावसाने उघडीप दिली असली तरी हवेत गारवा असल्याने घाट पार करताना श्रम पडले नाहीत. पाच बैलजोडय़ा लावल्याने माउलीच्या रथाने घाटाचा अवघड  टप्पा सहज पार केला.

दिवे घाट पार केल्यानंतर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, दादा जाधवराव, विजय कोलते यांच्यासह मान्यवरांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.सासवड नगरीमध्ये रात्री साडेआठ वाजता पालखी पोहोचली. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे,उपाध्यक्ष मनोहर जगताप,मुख्याधिकारी विनोद जळक,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दिंडीप्रमुखांचा सत्कार केला. पालखी तळावर रात्री आरती झाली.

संत सोपान देवांच्या सासवड नगरीत दोन दिवस मुक्काम करून पालखी सोहळा बुधवारी (११ जुलै) खंडेरायाच्या जेजुरीकडे मार्गस्थ होणार आहे.

((((  टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट पार करून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी संत सोपानदेवांच्या सासवड नगरीमध्ये विसावला.