आपल्या विषयासंबंधी आपण मातृभाषेत लिहिले नाही तर दुसरे कोण लिहील? आणि लिहून तिची प्रगती होणार असेल तर का लिहू नये?

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा’ हा अभ्यास प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातले वेगवेगळे कालखंड अभ्यासासाठी घ्यावयाचे होते. त्यात माझ्याकडे १८व्या शतकातल्या, म्हणजे पेशवाईच्या काळातल्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती गोळा करण्याचे काम आले. ही माहिती विश्वासार्ह असली पाहिजे, हा निकष असल्यामुळे ती फक्त प्रथम दर्जाच्या संदर्भसाधनांमधून गोळा करावयाची होती. त्यासाठी तत्कालीन पत्रव्यवहार, निवडपत्रे, सनदा, महंदतर अशा स्वरूपाच्या कागदपत्रांमधलेच संदर्भ फक्त घ्यायचे होते. हा अभ्यास ‘राजसत्तेच्या फटीं’मधून ‘पेशवेकालीन स्त्रिया’ या नावाने पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांनी प्रसिद्ध केला.
या वाचनात ज्या स्त्रियांचे उल्लेख सापडले त्या स्त्रिया मुख्यत: ब्राह्मण व मराठा या दोन जातींमधल्या होत्या. त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती व त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्टय़ेही वेगवेगळी होती. हा संदर्भ समोर आल्यावर उत्सुकता निर्माण झाली की मराठा स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांचे धागेदोरे पेशवाईआधीच्या शिवकाळात कुठे सापडतात का, ते पाहावे. त्यातून शिवकाळातली प्रथम दर्जाची संदर्भसाधने पाहायला सुरुवात केली. या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाची एक वर्षांची ‘सेतू माधवराव पगडी’ अभ्यासवृत्ती मिळाली. या वाचनातून जी माहिती हाती आली त्यात दिसले की शिवकाळात मराठा स्त्रियांच्या बरोबरीने मुसलमानी स्त्रियाही दरबारात व लष्करात कृतिशील होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्टय़े समान होती. ब्राह्मण स्त्रियांची नावे फक्त रामदास संप्रदायाच्या संदर्भात होती. हा अभ्यासही पॉप्युलर प्रकाशन यांनी प्रसिद्ध केला. शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा या नावाने.
त्यानंतरचा राजसत्तेचा पालटण्याचा कालखंड होता. पेशवाई खालसा केल्यानंतर स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाचा जादा अव्वल इंग्रजी काळ असेही म्हटले जाते. या कालखंडातली कागदपत्रेही हाच विषय- स्त्रियांच्या कर्तृत्व क्षेत्राचा- समोर ठेवून वाचली. हा अभ्यास अजून प्रसिद्ध झालेला नाही. 
राजकीय सत्ता उपभोगणारा वर्ग, त्या वर्गाचा विशिष्ट सांस्कृतिक परिवेश व तत्कालीन समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाशी असलेला त्या परिवेशाचा संबंध हा या अभ्यासमालिकेतून अधोरेखित झाला आहे. त्यासाठी केलेल्या प्रथम दर्जाच्या संदर्भसाधनांच्या वाचनामधून ‘इतिहास’ या अभ्यासक्षेत्राची एक वेगळी ओळख झाली. 
इतिहासाचे संशोधक, इतिहासाचे लेखक व इतिहासाचे शाहीर यांच्या भूमिका वेगवेगळय़ा असतात. त्यांचे कार्य व त्यांचे महत्त्वही वेगवेगळे असते. त्यांची सरमिसळ केली जाऊ नये, हे या वाचनातून लक्षात आले तसेच ऐतिहासिक व्यक्तींच्या लोकमानसावर ठसलेल्या प्रतिमा बऱ्याच वेळा काही विशिष्ट उद्देशाने तयार केलेल्या असतात. त्यांना तत्कालीन पुराव्यांचा पूर्ण आधार नेहमी असतोच असे नाही, असेही दिसून आले. प्रथम दर्जाच्या संदर्भसाधनांची विश्वसनीयता देखील बऱ्याच वेळा अंतर्गत-बहिर्गत पुराव्यांवरून पडताळून पाहावी लागते आणि नवी संदर्भसाधने उपलब्ध झाल्यानंतर जुने निष्कर्ष बदलण्याची गरज भासू शकते, असेही लक्षात आले. उपलब्ध कागदपत्रांची संख्या प्रचंड आहे. ते सगळे अजून नीट वाचलेही गेलेले नाहीत. त्यामुळे त्यातली माहिती अजून अंधारात आहे.
आज उपलब्ध असलेल्या साधनांमधून दिसणारे इतिहासाचे चित्र आजपर्यंतसाठी खरे असते, पण हे ‘खरेपण’देखील वाचणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार बदलू शकते, हेही या वाचनातून लक्षात आले.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
The order issued by Reserve Bank in February 2013 regarding private banks
अन्यथा: अनुलेखांचं औदार्य!
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election in 1954
आचारसंहितेचे बंधन तपासयंत्रणांवरही असू शकते…

डोळस अंध!!
सचिन मेंडीस
मागच्या आठवडय़ाची गोष्ट. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून खाली उतरत होतो इतक्यात एक अंध व्यक्ती प्लॅटफॉर्मकडे जाताना दिसली. हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जाण्याचे ठिकाण विचारले. त्याला चर्चगेट स्लो पकडून लोअर परळला उतरायचे होते व तिथून कॉलेज गाठायचे होते. आम्ही निश्चित जागी पोहोचलो. मलाही अंधेरी डाऊन जायचे होते अन् गाडीला वेळ होता म्हणून मी त्याची चौकशी सुरू केली. तो जन्मत: अंध नव्हता, पण एका अपघाताने त्याचे डोळे निकामी झाले होते. आता सध्या तो अंधांच्या कॉलेजमध्ये जात होता.
इतक्यात गाडी आली अन् मी त्याला म्हटले, ‘‘तुझी चर्चगेट गाडी आली.’’ तर तो उत्तरला, ‘‘ही चर्चगेट फास्ट आहे, मला स्लो पकडायची आहे.’’ मी आश्चर्याने त्याला विचारले, ‘‘तुला कसे ठाऊक?’’ तर तो हसत म्हणाला, ‘‘अनाउन्समेंट झाली ना आता.’’ खरं सांगितलं तर मी काही ती ऐकली नव्हती, कारण माझे डोळे इंडिकेटर पाहू शकत होते. मी त्याला म्हटलं, ‘‘कमाल आहे बुवा तुमची!’’ तर तो म्हणाला, ‘‘दादा, आता आमचे कान आणि नाक हेच आमचे डोळे. आम्ही वासावरून अन् आवाजावरून सर्व गोष्टींचा अंदाज घेतो. रस्त्यावर कितीही रहदारी असली तरी वाहनांच्या आवाजाने आम्हाला रस्ता पार कसा करावा ते कळते. मी स्तब्ध झालो. इतक्यात गाडी आली अन् मी पुन्हा त्याला म्हटले, ‘‘तुझी चर्चगेट गाडी आली.’’ तर तो उत्तरला, ‘‘ही चर्चगेट फास्ट आहे, अनाउन्समेंट झाली ना आता.’’ मी इंडिकेटर बघितले अन् माझी मलाच लाज वाटली. मी अंध व्यक्तीला मदत करायला निघालो होतो, पण मी किती अपंग आहे याची जाणीव मला होऊ लागली होती.
शेवटी मी त्याला विचारले, ‘‘भाऊ, कधी अपघात होण्याची भीती नाही का वाटत?’’ तर तो ताबडतोब बोलला, ‘‘दादा, आजपर्यंत रेल्वे अपघातात कधी अंध दगावल्याचं ऐकलं आहे? मरतात ते सगळे डोळे असून आंधळे बनलेले लोक.’’ मला थोबाडीत बसल्यासारखे झाले. त्याच्या हातातील काठीची जागा चुकीची वाटू लागली. मला बाय करून तो नुकत्याच आलेल्या चर्चगेट स्लोमध्ये बसून तो निघून गेला. मी सुन्न झालो. मी स्टेशनवर नजर टाकली. कान असलेले बहिरे अन् डोळे असलेले आंधळे मला स्टेशनवर सर्वत्र दिसू लागले. मला त्या अंध व्यक्तीच्या ताकदीची अन् आपल्या अपंगत्वाची जाणीव झाली.

काचेच्या घरावरचे दगड
माधव गवाणकर, दापोली, रत्नागिरी</strong>
नाना पाटेकर हे सामाजिक जाणीव ठेवणारे कलाकार आहेत. भारतीय व्यवस्थेतील विषमता, शोषण आणि त्यातून गरीब समाजाच्या मनात सतत खदखदणारा असंतोष याची पूर्ण जाणीव अशा मंडळींना असते. मुलाखतीत, भाषणात ते समाजभान व्यक्त होते. म्हणून समाजाचे ऋण मानून पु.लं.सारखे कलावंतसुद्धा योग्य ठिकाणी दानधर्म करत आले. जे समाजाकडून मिळाले, ते समाजाला परत करणे एवढाच (मनो)धर्म त्या मागे आहे.
आज कुणीही सुखरूप नाही. एटीएमचे पैसे काढायला गेलेल्या सुखवस्तू महिलेलासुद्धा कसे भोसकण्यात येते ते तुम्ही पाहिले असेल. गुन्हेगारी, बेकारीचा भोवरा, दारिद्रय़ त्यातून येणारा हिंसक बेफामपणा या गोष्टी भविष्यात वाढतच जाणार आहेत. तुम्ही कोटी रुपयांचा काचमहाल बांधाल, पण दरोडा कधी पडेल सांगता येत नाही.
नक्षलवादाचे, माओवादाचे फार मोठे सशस्त्र आव्हान महाराष्ट्रासह देशापुढे उभे राहात आहे. शहरांतील बेरोजगार, अर्धबेकार, असंतुष्ट, अतृप्त तरुणांचा वापर फार मोठय़ा प्रमाणात भविष्यात दहशतवादासाठी होईल असे भय मला वाटते. घरावर येणारे दगड ही काही भ्रामक अंधश्रद्धा नव्हे, तर त्यातून विकृत मानसिकता किंवा गुन्ह्यची चाहूल मिळते. नवश्रीमंत समाजाबद्दल ‘ओहे रे’ गटाबद्दल ‘नाही रे’ गटाच्या मनात आज नफरत आहे. हा तिरस्कार कळत-नकळत सशस्त्र बनतो. पोटाची भूक मस्तकात जाते.
केवळ ग्रामीण किंवा दुर्गम भागातील विकास हे या प्रश्नावरचे उत्तर नव्हे. तो तर हवाच, पण मुख्य म्हणजे, समाजमनाचा मानसशास्त्रीय अभ्यास अधिक नेटाने करून जागृत नागरिक व्यक्तिगत पातळीवर काम करू शकतात. ते कसे तर परिसरातील उन्मार्गी, उनाड समजल्या जाणाऱ्या मुलांच्या समस्या जाणून घेऊन अगदी ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्यांना मायाममतेच्या मार्गाने ट्रॅकवर आणू शकतात. अशी गरीब मुले ‘दत्तक विद्यार्थी’ म्हणून सांभाळून सधन लोक त्यांना उच्च शिक्षण देऊ शकतात. तरुण सेटल झाला की, विध्वंसक गोष्टींकडे वळत नाही! त्याला वेळच नसतो. श्रीमंत समाजाने भविष्यातील ‘धोके’ लक्षात घेऊन आता स्वत:चा चंगळवाद व स्वार्थ कमी करावा. फटाक्यांवर तुम्ही जे हजारो रुपये फुकट घालवता त्या पैशात एका शाळकरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलता येईल. विचार करा!

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com