खेळ आणि राजकारण या खर तर दोन वेगवेगळ्या गोष्टी. पण बायच्युंग भुतिया, राज्यवर्धन राठोड, मोहम्मद कैफ यांच्यासारख्या खेळाडूंनी यावेळच्या निवडणुकीत बाजी लावायची ठरवलं आहे.

लोकसभा निवडणुकांचा धुरळा आता उडू लागला आहे. ‘अब की बार मोदी सरकार’, ‘युवा शक्ती नव्हे युवा जोश’ अशा घोषणांचा नाद संपूर्ण देशभर घुमतो आहे. राजकारण आणि खेळाची सरमिसळ करू नये, असे म्हटले जात असले तरी पैशांसाठी असो वा सत्ता उपभोगण्यासाठी अथवा अन्य कुठल्या तरी कारणांसाठी, खेळात राजकारण्यांचा समावेश हा ओघाओघाने झालाच आहे. पण राजकारणाच्या पटावर खेळातील मोहरे फारसे यशस्वी ठरलेले दिसत नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजता यईल, इतकेच खेळाडू लोकसभेत ‘बॅटिंग’ करत आहेत. महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह, पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू इम्रान खान, सुप्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आरनॉल्ड श्वाइनस्टायगर, तसेच अ‍ॅथलिट सेबॅस्टियन को यांनी राजकारणात छाप पाडल्यानंतर गेल्या दशकभरात भारतातील खेळाडूंनीही राजकारणात आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नवज्योत सिंग सिद्धू, कीर्ती आझाद आणि मोहम्मद अझरुद्दीनसारखे क्रिकेटपटू लोकसभेवर निवडून आले. मॅच-फिक्सिंगच्या कारणांमुळे अझरुद्दीनला आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सांगता करावी लागली. पण राजकारणात उतरल्यानंतर अझरुद्दीनने सत्तेत आल्यावर आपल्यावरील सर्व आरोप ‘धुवून’ काढले. दुसरीकडे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला काँग्रेस पक्षाने थेट राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आणले.
आपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठल्यानंतर आता २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही अनेक खेळाडूंनी राजकारणात एंट्री घेतली आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या क्रीडा संघटनांवर असलेली राजकारण्यांची मक्तेदारी, त्यामुळे क्रीडा क्षेत्राची होत असलेली वाताहत, खेळाडूंना देशात मिळणाऱ्या सुविधा, परदेशी प्रशिक्षकांचा अभाव, परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी करावा लागणारा खटाटोप या सर्व गोष्टींची चीड असलेल्या आणि आपण देशातील क्रीडा क्षेत्रासाठी काही तरी करून दाखवू अशी तळमळ असलेल्या काही खेळाडूंनी आता राजकारणात आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भुतिया, भारताला २००० मध्ये युवा विश्वचषक जिंकून देणारा क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू दिलीप तिर्की, नेमबाज नवीन जिंदाल यांच्यासारखे अनेक खेळाडू आता लोकसभेतही आपली ‘इनिंग’ साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राज्यवर्धन सिंग राठोड
२००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावण्याची किमया केल्यानंतर राज्यवर्धन सिंग राठोड खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवून देणारा तो पहिला अ‍ॅथलिट ठरला. त्यानंतर राज्यवर्धनच्या कारकिर्दीचा आलेख उंचावतच राहिला. २००२ ते २००६ दरम्यान त्याने विविध स्पर्धामध्ये तब्बल २५ आंतरराष्ट्रीय पदके पटकावली. २००२च्या मँचेस्टर येथील राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि २००६च्या मेलबर्न येथील राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने एक सुवर्ण आणि एका रौप्यपदकावर नाव कोरले. २००३च्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. २००३-०४मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २००४-०५मध्ये त्याला राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय सेनादलामधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर राज्यवर्धन आता राजकारणात उतरला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यवर्धन आता राजस्थानमधील जयपूर या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे.

बायच्युंग भुतिया
‘सिक्किम्स स्नायपर’ या नावाने ओळखला जाणारा बायचुंग भुतिया म्हणजे भारतीय फुटबॉलला मिळालेली दैवी देणगी, असे त्याचे वर्णन केले जात असे. भारतीय फुटबॉल संघाचा प्रमुख आधारस्तंभ असलेला भुतिया गोल करण्याची कोणतीही संधी वाया घालवत नसे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला भारताचा एकमेव फुटबॉलपटू आणि तीन वेळा देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार त्याने आपल्या नावावर केला. १०७ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्याने ४२ गोल लगावले आहेत. मोहनबागान, ईस्ट बंगाल यांसारख्या देशातील अव्वल क्लबकडून खेळताना त्याने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. परदेशातील अनेक क्लबचे त्याने प्रतिनिधित्व केले. १९९८मध्ये त्याला अर्जुन आणि २००८मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘झलक दिखला जा’ या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमातून त्याने आपल्या नृत्यकलेची झलक दाखवली होती. तिबेट मुक्ती चळवळीला पाठिंबा देण्याच्या कारणावरून त्याने ऑलिम्पिक ज्योत कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. ऑगस्ट २०११मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली. पण बायच्युंग भुतिया फुटबॉल स्कूलच्या माध्यमातून देशातून अनेक युवा फुटबॉलपटू घडवण्याचे त्याचे काम सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर दार्जिलिंग या मतदारसंघातून तो निवडणूक लढवणार आहे. जर तो निवडून आला तर क्रिकेटपटू राजकारण्यांच्या मांदियाळीत बसणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरणार आहे.

मोहम्मद कैफ
२०००मध्ये युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने युवा विश्वचषक जिंकला, त्या भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता तो मोहम्मद कैफने. त्या विश्वचषक विजयाने भारताला युवराज आणि मोहम्मद कैफच्या रूपाने दोन क्रिकेटपटू मिळवून दिले. युवराज अजूनही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. २००६मध्ये कैफ भारतातर्फे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तरी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कैफ अजूनही आपल्या फलंदाजीने आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेकांची मने जिंकत आहे. २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कैफने कसोटी पदार्पण केले. मधल्या फळीतील फलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक ही कैफची ओळख बनली. १३ कसोटी आणि १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र भारतीय संघातून डावलल्यानंतर कैफच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला. पण आता त्याने राजकारणात आपली कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील फुलपूर मतदारसंघातून तो काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे. ज्येष्ठ राजकारण्यांच्या मांदियाळीत ३३ वर्षीय कैफची भंबेरी उडणार असली, तरी काँग्रेसने एक युवा खेळाडू खासदाराच्या रूपाने देशाला देण्याचा प्रयत्न केला आहे.

दिलीप तिर्की
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि ओदिशाचा हॉकीपटू अशी दिलीप तिर्कीची ओळख. पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असलेला दिलीप तिर्की हा जगातील सर्वोत्तम बचावपटूंपैकी एक. गोलपोस्टजवळ बचाव करणाऱ्या दिलीप तिर्कीला चकवताना प्रतिस्पध्र्याच्या नाकी नऊ यायचे. १९९६ अटलांटा, २००० सिडनी आणि २००४ अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळणारा तो भारताचा पहिला आदिवासी खेळाडू ठरला. एकलव्य, अर्जुन आणि पद्मश्रीसारख्या पुरस्कारांवर त्याने मोहोर उमटवली. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला आदिवासी खेळाडू ठरला. भारतातर्फे सर्वाधिक ४१२ सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले. मे २०१०मध्ये आपल्या कारकिर्दीचा समारोप केल्यानंतर २०१२मध्ये तो बिजू जनता दलकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आला. आता तो बिजू जनता दलाच्या तिकिटावर ओदिशामधील सुंदरगढ या मतदारसंघातून आपले नशीब अजमावणार आहे.

नवीन जिंदाल
जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेडचा अध्यक्ष आणि हरयाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा मान स्किट नेमबाज नवीन जिंदालने मिळवला आहे. हरयाणाचे मंत्री आणि वडील ओमप्रकाश जिंदाल यांच्याकडून लहानपणापासून त्याने राजकारणाचे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली. पाकिस्तानमध्ये २००४साली झालेल्या सॅफ स्पर्धेत नवीन जिंदालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. २००२मध्ये बुसान (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. २०११मध्ये राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हरयाणा संघाचा तो कर्णधार होता. नेमबाजीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवल्यानंतर नवीन जिंदालने पोलो या खेळातही अनेक जेतेपदे मिळवली आहेत. आता तो कुरुक्षेत्र या मतदारसंघातूनच तिसऱ्यांदा लोकसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहे.