आणि मग जत्रेला उधाण आले. आदिवासी ‘मूरिया’  कसलीही लाज, संकोच न बाळगता जत्रेत उघडेच फिरत होते. देवतांना मिरवीत होते. ढोल-नगाऱ्यांच्या तालावर बेधुंद नाचत होते. पालखीपुढे केवढय़ातरी लांब ध्वजापताका फडकवीत होते. कुणी देवीचा सळ (७-८ फूट लांबीची टोकदार लोखंडी सळी) गालातून काढला होता, कुणी नाकपुडय़ांतून, तर कुणी कानाच्या पाळीतून! विलक्षण! देवतेच्या गजरात सगळीकडे गुलाल उधळल्याने काहीसे धुंद आणि गूढ वातावरण निर्माण झाले होते. कुणी अंगात आलेले आदिवासी पाठीवर आसूड मारून घेत होते. तासभर तरी हा देवतेच्या सवारीचा कार्यक्रम सुरू होता..
माझ्या यजमानांची बदली बस्तर जिल्ह्य़ातील नारायणपूर गावी झाली. नारायणपूर तेव्हा तहसीलाचे ठिकाण होते. आज जरी हा भाग नक्षलबाधित क्षेत्र असला तरी १९६०-६१ सालातही तिथे जायला भीती वाटायची. येथील आदिवासींचा एक उत्सव असतो- ‘मडई’! म्हणजे त्यांच्या इष्टदेवतांचा नवरात्र! साधारण फेब्रुवारी महिन्यापासून ‘मडई’ सुरू होते. सगळ्या ठिकाणच्या ‘मडई’ एका दिवशी नसतात. आज या गावाला, तर उद्या दुसऱ्या. इष्टदेवतांचे त्यांच्या आदिवासी रीतीरिवाजाने पूजन होते. नवस बोलले जातात, फेडले जातात. बकऱ्याचा बळी दिला जातो. आणि पालखीतून देवांची समारंभपूर्वक गावातून मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीतल्या त्यांच्या ध्वजपताका या त्यांच्या हिंदू वंशत्वाची साक्ष पटवतात. यानिमित्ताने गावागावांतून जत्राही भरते. त्यास दूरदूरहून आदिवासी मोठय़ा संख्येनं येतात. जत्रेत ही मंडळी मीठ, मिरची, फणी, कंगवा अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंबरोबरच ऐपतीप्रमाणे कपडे आणि दागिनेही खरेदी करतात. कलेचे कसलेही प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही त्यांनी तयार केलेल्या अनेक कलात्मक वस्तू वाखाणण्याजोग्या असतात. या जत्रेनिमित्ताने नातलगही परस्परांना भेटतात. जत्रेत काहींची लग्नेही जमतात. आदिवासी तरुण-तरुणींचे घोळके हसतखेळत, ठिठोली (थट्टा) करत जत्रेभर हिंडत असतात. त्यांच्या नजरेत तारुण्याचे रंग उसळताना दिसतात. परंतु तरीही कुठं छछोरपणा आढळत नाही.
या सगळ्यांत छोटे डोंगरची ‘मडई’ मुख्य असते. छोटे डोंगर हा भाग अति दुर्गम घनदाट जंगलाचा आहे. येथील आदिवासी जवळजवळ नग्नावस्थेत असतात. माझे यजमान सरकारी दवाखान्यात डॉक्टर होते. छोटे डोंगरच्या ‘मडई’करता सरकारी यंत्रणेतील तहसीलदार, पोलीस डिपार्टमेंट, सिंचन, मेडिकल, फॉरेस्ट ऑफिसर यांची डय़ुटी लागते. नारायणपूर त्याकाळी छोटंसं गाव होतं. फर्लागभर रस्ता. लाइट वगैरे तेव्हा आलेले नव्हते. एक बस सकाळी यायची; एक रात्री! करमणुकीच्या नावाने शून्य.
आदिवासींच्या या ‘मडई’बद्दल मला खूप उत्सुकता होती, म्हणून मी हट्ट करून दोन्ही लहान मुलांना (वय वर्षे आठ आणि चार!) सोबत घेऊन ह्य़ांच्याबरोबर या जत्रेला जायला निघाले. बहुधा सर्व ऑफिसर्सची मुले तेव्हा शिकायला शहरात असत. माझी मुलं मात्र इथल्याच सरकारी शाळेत शिकत होती. जत्रेला एका फॉरेस्ट ऑफिसरची जीप आणि एक आमची- असे आम्ही निघालो. किर्र्र जंगलातली वाट. त्यातून आमची जीप कशीबशी मार्गक्रमणा करत चालली होती. सर्वत्र उंचच उंच झाडे. कधीतरी मधूनच सूर्याची किरणे झाडांच्या पानांतून जमिनीवर येत होती. अरुंद, धूळभरला रस्ता. नद्यांवर बहुतेक लाकडी पूल. कुठे ओढा लागला तर दगडगोटय़ांवरून जीप अक्षरश: डोलायचीच. त्या लाकडी पुलांवरून जाताना कुठे आवाज झाला की मनात धडकी भरायची. पूल तुटला तर..?
छोटे डोंगरला आम्ही दुपारी ११ पर्यंत पोहोचलो. थोडय़ाशा मोकळ्या जागेत तंबू बांधलेले होते. एकीकडे उंच पहाड, दुसऱ्या बाजूने घनदाट जंगल. त्या चिंचोळ्या जागेतच जत्रा भरली होती. उंच उंच झाडांतून सूर्याची किरणेही हा उत्सव पाहायला खाली उतरत होती. दुपारी १२ च्या सुमारास बरेच ऊन पडले. तरीही हवेत चांगलाच गारठा होता.
आणि मग जत्रेला उधाण आले. आदिवासी ‘मूरिया’  कसलाही संकोच न बाळगता जत्रेत उघडेच फिरत होते. देवतांना मिरवीत होते. ढोल, नगाऱ्यांच्या तालावर बेधुंद नाचत होते. पालखीपुढे केवढय़ातरी लांब ध्वजापताका फडकवीत होते. कुणी देवीचा सळ (७-८ फूट लांबीची टोकदार लोखंडी सळी) गालातून काढला होता, कुणी नाकपुडय़ांतून, तर कुणी कानाच्या पाळीतून! विलक्षण! देवतेच्या गजरात सगळीकडे गुलाल उधळल्याने काहीसे धुंद आणि गूढ वातावरण निर्माण झाले होते. कुणी अंगात आलेले आदिवासी पाठीवर आसूड मारून घेत होते. तासभर तरी हा देवतेच्या सवारीचा कार्यक्रम सुरू होता. मग देवतेला गुडी (मंदिर)मध्ये विराजमान केले गेले.
त्यानंतर आदिवासी तरुण-तरुणींचा नाचाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्या भाषेत ते आपल्याबरोबर सर्वाना नाचायचे आवाहन करीत होते. आदिवासी मुलं-मुली २५ ते ३० किलो वजनाच्या घंटा कमरेला बांधून सज्ज झाले.. आणि झाला की नाच सुरू! कानठळ्या बसविणाऱ्या नगाऱ्यांच्या तालावर ते एकमेकांना धरून करत असलेला लयबद्ध पदन्यास!! लय बदलायची वेळ आली की मधला म्होरक्या तोंडाने नाचता नाचता विशिष्ट आवाज करायचा, की नृत्याचा लय-ताल बदलायचा. म्होरक्याने तर ४० किलोच्या घंटा कमरेला बांधल्या होत्या.
सभोवती हिरवीगार वृक्षराजी.. त्यावर पडलेलं सोनेरी पिवळं ऊन.. आणि आभाळाच्या छताखाली चाललेला हा अनागर नृत्यविलास! एक अद्भुतरम्य माहोल! नृत्य करणाऱ्यांची काळी, पण कमावलेली सुदृढ शरीरे.. त्यांच्या तोंडावर विलसणारा निरागस, निर्भर आनंद.. आपल्याच खुशीत जगाचे भान विसरून चाललेला त्यांचा तो नाच! ही इंद्रसभा तर नव्हे? एक अननुभूत सौंदर्य.. जे मी ‘याचि डोळा, या देही’ अनुभवत होते. सगळंच दैवी! कुठून येत असेल त्यांच्यात ही उत्स्फूर्त ऊर्जा? कितीतरी वेळ त्यांचं हे नृत्य चाललं होतं. जत्रेतले लहानथोर भान हरपून त्यात सामील झाले होते.
दोन-अडीच तासानंतर जेवण वगैरे आटोपल्यावर तिथून ३० मैलांवर असलेल्या अबूज माडला जायचं ठरलं. आम्ही निघालो खरे; पण वाट इतकी दुर्गम! एक जीप जेमतेम जाईल एवढीच वाट. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खळाळणारी नदी. नदीकाठच्या वाळूत जीप घसरायला लागते म्हणून वाटेत ताडाच्या चटया अंथरल्या होत्या. दहा मैल जेमतेम गेलो असू-नसू, तोच एक असं वळण आलं- की समोरून दुसरं वाहन आलं तर बाजूच्या डोंगरावर कपाळमोक्ष किंवा जलसमाधी ठरलेलीच! शिवाय अबूज माडला नरभक्षक मारिया आदिवासींची वस्ती होती. ते त्यावेळीही सरकारी यंत्रणेविरुद्ध होते. राजा भंजदेवला मानणारे होते. आमचे तिथे जाणे त्यांना आवडेल की नाही, ही शंकाही होतीच. चिडलेले मारिया काहीही करतील. शिवाय भाषेचा प्रश्न! वाटेत रात्र झाली तर परतणे कठीण. राहणार कुठे? खाणार काय?
एकूण विचार करता आमच्यासोबतच्या इरिगेशन ऑफिसरने माघारी परतण्याचा सल्ला दिला. आणि आमचा उलटा प्रवास सुरू झाला! रिव्हर्समध्ये जीप.. कधी घसरेल नेम नव्हता. छातीत धडधडत होते. चार वाजले होते. पण आजूबाजूला भयाण शांतता. संध्याकाळ झाल्यासारखा अंधार होत चाललेला! कुठून दुर्बुद्धी झाली आणि इकडे आलो, असं वाटू लागलं. आम्ही तिघीही मुलांना पोटाशी घेऊन देवाचा धावा करत होतो. दोन मैल रिव्हर्समध्ये जीप चालल्यावर थोडीशी मोकळी जागा मिळाली आणि मग जीप सरळ धावू लागली. एकदाचे आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचलो आणि मग छोटे डोंगरला न जाता थोडय़ा आडवाटेनं नारायणपूरला परत जायला निघालो. मघाचं टेन्शन थोडंसं कमी झालं. गप्पा, विनोद सुरू झाले. हास्याची कारंजी फुटू लागली.
एवढय़ात एका चढावावर ड्रायव्हरने गाडी घातली. पण ती वर चढेचना. उलट मागेच उतरायला लागली. मागून दुसरी जीप येत होती. तिच्यावर आदळण्याची भीती! जीपच्या ‘घुईं घुईं’ आवाजाने पुन्हा एकदा भीती मानगुटीवर बसली. ड्रायव्हरने जीप पुन्हा चढावावर घातली. जीप कशीबशी तो टेकाड चढली आणि दुसऱ्या बाजूने उतारावरून वेगाने खाली जाऊ लागली. काही कळण्याच्या आतच ड्रायव्हरचा जीपवरील कंट्रोल सुटला आणि ती धाडकन् एका पाणीभरल्या डबक्यात शिरली आणि तिथंच फसली. डबका पूर्णपणे गाळानं भरलेला. जीप सुरू केली की चारही चाकं चिखलात फिरून चिखलाची कारंजी उडायची. सगळंच इतकं अनपेक्षितपणे घडलं, की विचार करायलाही कुणाला उसंत मिळाली नाही. तोवर मागची जीप आली आणि तिच्या ब्रेकच्या करकचून आवाजाने भयकंपित पक्षी आभाळभर झाले. वातावरणात भीतीची गडद सावली पसरली. मन आणि मेंदूही बधीर झालेला. आमचा ड्रायव्हर त्या जीपच्या ड्रायव्हरला ओरडून सांगत होता.. ‘दायेसे घुमावो, नदी में गाडी डालो.. पत्थरसे डुबेगी नहीं..’ सगळाच हलकल्लोळ!
तेवढय़ात बाजूच्या गावातली तीन-चार माणसं आमच्या आरडय़ाओरडय़ानं तिथं धावून आली. त्यांनी दोर लावून ओढून पाहिली; पण आमची जीप जागची हलेना. चाकांखाली चटई टाकली.. दुसऱ्या जीपला दोर बांधून ओढण्याचा प्रयत्न केला.. पण व्यर्थ! तोवर संध्याकाळ झाली होती. मुलं भीतीने आणि भुकेनं रडकुंडीला आली होती. ‘हे’ही एव्हाना माझ्या जत्रेला जाण्याच्या हट्टावरून चिडचिडले होते.. आता बहुधा रात्र इथेच काढावी लागणार, या चिंतेनं सगळेच हवालदिल झालेले. भोवतीच्या चिखल-गाळामुळे आम्ही जीपबाहेरही पडू शकत नव्हतो. उघडय़ावरचा तुरुंगवासच जणू!
त्यात आणखीन इथं ‘रात को शेर आता हैं’ हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. ‘मडई’ चांगलीच महागात पडली होती. मी त्या ‘मडई’ देवतेचा मनोमन धावा केला- ‘सुखरूप सोडव गं माते आम्हाला या जीवघेण्या संकटातून..’
एवढय़ात आमच्या ड्रायव्हरला एक कल्पना सुचली. तो सभोवती जमलेल्या गावकऱ्यांना म्हणाला, ‘ये तहसीलदार साहब है. और पिछेसे पुलीसवाले साहब आ रहे है.. जल्दी से कुछ उपाय करो, नहीं तो तुम्हारी खैरियत नहीं.’ आणि मग वेगाने हालचाली सुरू झाल्या. त्यांचा जो मुखिया होता त्याने दोन मोठय़ा मोठय़ा बल्ल्या (लांब जाड लाकडं) आणल्या. आणखीन पाच-सहा लोक आले. त्या बल्ल्या त्यांनी गाडीखाली अडकवल्या. लाकडाच्या जाड फळ्या आणल्या. आमच्या जीपचा दोर मागच्या जीपला बांधलेला होताच, तो सोडला. आणि त्यांच्या भाषेत काहीतरी जोशात बोलला.. हुर्रर, हर्रर..
तिघा-चौघांनी जीपच्या पुढच्या भागाखालून लाकडं अडकवली आणि जीप समोरून वर उचलली गेली. चाके चिखलाबाहेर आली. आम्ही सी-सॉच्या पोझिशनमध्ये वरती!! चाकाखाली (दोन्ही) दगड टाकले आणि फळ्या घातल्या. आमच्या जीपचं इंजिन धडधडू लागलं. तिकडं वर आमच्या छातीतलं इंजिन थंड होणार अशी स्थिती. मागच्या जीपने नदीतून समोरून येऊन दोर बांधून जोर करून आमची जीप सर्वशक्तिनिशी ओढली आणि एका झटक्यात आम्ही गाळातून बाहेर आलो.
आम्ही केवढय़ा मोठय़ा संकटातून वाचलो होतो! संध्याकाळच्या त्या धूसर प्रकाशात आम्ही किंचित मोकळा श्वास घेतोय तोच हरणांचा एक कळप कुठूनसा धावत आला. पक्षी खूप कलकलाट करायला लागले. माकडे चित्कारू लागली. सगळंच विचित्र! त्या कोलाहलातच गावकरी पळता पळता ओरडत होते.. ‘भागो, शेर आएगा..’
क्षणाचाही विलंब न लावता ड्रायव्हरने त्या गोटाडय़ा रस्त्यावरून जीप जोरात हाणली.. जीप सुसाट पळत होती. काहीशी सावरलेली आमची मनेही त्या अनोख्या सफरीनं ठेचकाळली होती, तरीही आम्ही आनंदात होतो.. जीवानिशी वाचल्याच्या!        

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती