‘शंभर मी’ ही श्याम मनोहर यांची वैशिष्टय़पूर्ण कादंबरी आहे. अगदी मनोहर यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच ही कादंबरी आहे. मनोहरांच्या कादंबऱ्यांची, नाटकांची शीर्षके गमतीदार, मजेशीर व विषयाबरहुकूम असतात. ‘शंभर मी’ हे शीर्षक असेच आहे. साधे, सरळ विधान धरले तर अनेक रूपे प्रगटणारा ‘मी’ वाटतो, पण उद्गार गृहीत धरले तर आत्मप्रौढी आणि आपल्यावरच प्रसन्न असलेला ‘मी’ प्रकट होऊ लागतो. मनोहर अध्यात्मवादी नाहीत आणि साधनशुचितेद्वारे प्रकट होणारी आध्यात्मिकता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नाही. त्यामुळे ‘को२हम? मी कोण?’चा विचार ‘शंभर मी’तून प्रकट होत नाही. या शंभरात असणारा मी हा सामान्यातिसामान्यांचा ‘मी’ आहे. या ‘मी’चे प्रश्न सामान्य आहेत. त्यांना सतावणारे प्रश्नही सामान्यांचे सामान्य प्रश्न आहेत. ‘शंभर मी’ हा या अर्थाने काव्यात्म उद्गार आहे. अशा उद्गारातून कादंबरीच्या गुहेत काय असेल, याचा शीर्षकातूनच काहीसा अंदाज येतो.

‘शंभर मी’ला कथानक नाही. घटना नाहीत. प्रसंग नाहीत. नायक/ नायिका नाहीत अथवा विशिष्टाविशिष्ट व्यक्तिरेखाही नाहीत. कुठल्याही कथेभोवती, व्यक्तिरेखेभोवतीची स्पंदनशीलता जाणवत नाही. यातल्या कथानकविरहित सरळ, बोलक्या व्यक्तिरेखा म्हणजे भारतीय परंपरेमधील रंगपांचालिका वाटाव्यात अशा आहेत. कादंबरीत सव्वाशेच्या वर प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात ‘मी’ एक व्यक्तिरेखा आहे. फेर धरून आपापली भूमिका वठवून ती लुप्त होते. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनातील वासना, विकार, विचार, शंका, संशय, घटिते, घटितशक्यता, उगीचच निर्माण झालेले कुतूहल, वर्तन, वेगवेगळे नातेसंबंध, शारीर कुतूहलाचे शमन, तहान, भूक, भावना, घाण, सौंदर्य, स्वप्न, प्रेम व प्रेत, अध्यात्म, धर्म-धर्मग्रंथ, सर्जनशील निर्मिती, स्वातंत्र्य, जन्महिशेब, प्रयोजन, गुंड, राजकारण, विवेक, वृद्धत्व, विनोद, गॉसिपिंग, अनाचार, निपुत्रिक, आई, बायको, भावजय, बहीण, सासू-सून, सासर-सून, पाऊस, उन्हाळा, समाज, घर, मैथुन, घरवाली, कामवाली, लग्न, आख्यायिका, शारीरिक न्यूनत्वाची भावना अशा असंख्य गोष्टी ‘शंभर मी’मध्ये आलेल्या आहेत.

जीवन, जीवनातील लहानसहान गोष्टी आणि त्या गोष्टींविषयी सामान्य लोकांच्या मनातील कुतूहल अशा एका सूत्रामधून ‘शंभर मी’ची निर्मिती झालेली आहे. या आशयसूत्रातील सर्व विषय मोजक्या आणि नेमक्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत घडले असते तर जीवनाचा विशाल असा पट उलगडला गेला असता. एक बहुपेडी वीण या कादंबरीमध्ये असूनही प्रत्येक विणीचे अस्तित्व स्वतंत्र असल्याने, तुटक असल्याने कादंबरीच्या अंतरंगात जिव्हाळा निर्माण झालेला नाही. विखुरलेल्या आरशाच्या तुकडय़ा-तुकडय़ांमधून लेखक समाजमनाचा चेहरा दाखवीत आहेत. यामुळे समाजमनाचा बीभत्सपणा, मानभावीपणा प्रभावीपणे प्रतिबिंबित होताना दिसत नाही. परंतु तरी ही तुकडय़ांची निर्मिती सुंदर झालेली आहे.

कादंबरीच्या सरळ निवेदनातून मनोहरांच्या संवेदन-स्वभावाचा तिरकसपणा जाणवतो. त्यात लय आहे. गोडवा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचे निवेदन ढाळ लागल्याप्रमाणे आहे. त्यातून जीवनभाष्य करणे मनोहरांनी टाळले आहे. परंतु ते थेटपणे उपहास करताना दिसतात. ‘माझे रूप’ या घाणीवरच्या प्रकरणात ते घाणीलाच आत्मनिवेदन करायला लावतात. ‘‘स्वातंत्र्यानंतर साठेक वर्षांनी हागणदारीमुक्त गाव अशी सरकारी योजना सुरू झालीय. इतक्या ग्रामीण कादंबऱ्या, कथा, कविता आल्या, माझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष गेलेले नाहीय. राजकारणी, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, बुद्धिवादी, श्रद्धावादी, विचारवंत, आस्तिक, नास्तिक, लेखक, नट, कलावंत.. अशा कुणाचेही माझ्या रूपाकडे कठोरपणे लक्ष गेलेले नाहीये.’’

समाजातील कृतिशील अंगाचा नि वैचारिक अंगाचा सहजपणे उपहास मनोहर करताना दिसतात. ग्रामीण जीवनानुभव, अस्सल ग्रामीण साहित्य म्हणत उदो-उदो करणाऱ्या साहित्याला समाजातील घाण दिसली नाही, याचे घाणीलाच आश्चर्य वाटते. हा उपहास ग्रामीण साहित्यिकांचाही आहे. अलगद पापुद्रे काढावेत तसे मनोहर एखाद्या गोष्टीला नागडे करतात. फ्रॉइडही काही प्रकरणांतून डोकावतो. ‘एका दुपारी’ शून्यमनस्कपणे आपली निर्मिती आई-वडिलांच्या सेक्समधून कशी झाली असेल याचे निवेदन करणारा ‘मी’ही आपल्याला भेटतो. हा विचार निर्थक तर वाटतोच; शिवाय ते वाचत असताना संकोचही वाटतो. याची काय गरज होती, असा प्रश्नही पडतो. काही नासमज पुरुषांच्या मनात पत्नीविषयीचा संशय असतो. तो भाग एका प्रकरणात आला आहे. पत्नीचे आपल्या बापाशी (म्हणजे तिच्या सासऱ्याशी) संबंध असल्याचा पतीला संशय आहे आणि या संशयाचे कारण पत्नीचे सौंदर्य. मित्राच्या पत्नींमध्ये याचीच पत्नी सुंदर असल्याने मित्रांनीच तशी अफवा उठवली, या संशयाप्रतही तो पोचतो. यामुळे त्याच्या दैनंदिन जगण्यावर ताण येतो. काम करताना व झोपेतही तो संशयाने ग्रासला जातो. अशा संशयी वृत्तीमुळे सहजीवनाला कसे तडे जातात, हे कसलेही भाष्य न करता, टीकाटिप्पणी न करता सांगितले आहे.

‘शंभर मी’चे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे लेखकाने यात मध्यमवर्गीय स्त्रीला बोलते केले आहे. ‘निपुत्रिक’ या प्रकरणातील बाईला जीवन एन्जॉय करायला लावणारा नवरा भेटतो.. सासू-सासरे भेटतात. किराणा दुकान टाकून जगणारे हे कुटुंब पुरोगामी विचारांचे आहे. ते पुरोगामी विचार बोलून दाखवत नाहीत. तशी शब्दसंकल्पना त्यांच्याकडे नाही. मूलबाळ नाही तर नाही, हसत राहायचं- इतकाच विचार तो नवरा आपल्या बायकोला बोलून दाखवतो. हे सामान्यांतील असामान्यपण या कादंबरीत फार हृद्य झाले आहे.

कादंबरी या वाङ्मयप्रकारात कथानकतेची अपेक्षा असते. ही अपेक्षा आधुनिक काळातील निर्मितीने संस्कारित झालेल्या अभिरुचीमधून उत्पन्न झालेली आहे. निश्चित एक कथानक कादंबरीला असल्याने तिचे घटकही आपल्या मनात ठसले आहेत. याला पहिल्यांदा भालचंद्र नेमाडय़ांनी धक्का दिला आणि त्यांनी स्पष्टपणे सिद्धही केले की, भारतीय परंपरेच्या श्रेष्ठ साहित्याला एकसलग कथानक नाही. एकसलग कथानक नसतानाही परंपरेतील भारतीय साहित्य मनावर आजही अधिराज्य गाजवते आहे. वाचकाच्या मनाचा तळ ढवळून काढण्याची, मनाला हेलावून टाकण्याची, जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करण्याची व जीवनचिंतनाची डूब देण्याची विलक्षण व प्रचंड क्षमता रामायण, महाभारत, कथासरित्सागर या एकरेषीय भारतीय परंपरेतील साहित्यात आहे. ‘शंभर मी’मध्ये एकरेषीय कथानकाचा अभाव आहे. साम्य हे एवढेच. परंतु उप-उप रंगभरण करण्याची कला मनोहरांना लाभलेली नाही. श्रेष्ठ, सकस असे काही दिसते आहे, पण त्याला धरायला जातात तेव्हा त्यांना ते सारे मृगजळ वाटते. परिणामी निर्मितीमध्ये एक भासमान स्थिती निर्माण होते. पण ते जीवनाला गंभीरपणे भिडतात आणि वाचकाला प्रश्नांकित करतात.

‘शंभर मी’मधील पात्रांच्या विकासाला वाव नाही. अर्थात लेखकच त्यांना जास्त वावरू देत नाही. ही व्यक्तिरेखा अंतर्मुख अशी आहे. अशा स्वरूपाची व्यक्तिरेखा आपल्या परिघाचा छेद करून पुढे जात नाही. आणि असे लेखन काव्यविभोर, भावविभोर, मेलोड्रॅमॅटिक आणि केवळ प्रश्न उपस्थित करणारे ठरते. याला मात्र मनोहरांनी छेद दिला आहे. कादंबरीचे लेखन अत्यंत खेळकर, प्रासादिक असे झाले आहे. खरी सामाजिक कादंबरी बहिर्मुखपणे मोठय़ा आशयाला भिडत असते, तर अंतर्मुख कादंबरी संकोच पावून आपल्या परिघाभोवतीच घिरटय़ा घेत राहते. ‘शंभर मी’मध्ये मोठय़ा सामाजिक आशयाला बगल देऊन व्यक्तिरेखांना वाटणाऱ्या कुतूहलाला स्थान दिले गेले आहे.

सव्वाशेपेक्षा जास्त प्रकरणांची ही कादंबरी निश्चितच वाचनीय आहे. एकसलग कथानक नसणे हे वैशिष्टय़ असलेली ही कादंबरी तिच्या मनोहर रूपामुळे वाचकांना खिळवून ठेवते. या कादंबरीत व्यक्तिसमूहाला वाव आहे; परंतु हा समूह कधीच समूहरूपात येत नाही. श्याम मनोहर यांना समूहमनातील भावभावनांना आशयाशी सुसंगतपणे जोडून घ्यावयाचे असते. सर्व सांधे जोडून एक विशाल असे रूप त्यांना दाखवावयाचे असते. शिवाय त्यांनी भाषेमधील सर्जनाच्या रूपाला महत्त्वाचे मानले आहे. ‘भाषेत धरता आले पाहिजे’ हे पालूपद पुन:पुन्हा आले आहे. मनोहरांना भाषेविषयी प्रचंड औत्सुक्य दिसते. जगण्याची रीत, संस्कृती, संशोधन, विचार, भावना, वासना, कला, गायन, कीर्तन, नर्तन, चित्रकला, शिल्पकला हे सारे भाषेत धरता वा पकडता आले पाहिजे असे त्यांना वाटते आणि हे ‘शंभर मी’मध्ये त्यांना छान पद्धतीने धरता आलेले आहे. तरीपण मोठय़ा आशयाचा संकोच पावलेला अवकाश अशी ‘शंभर मी’बद्दल रूखरूखही वाटते.

‘शंभर मी’- श्याम मनोहर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – ३३६, किंमत – २३५ रुपये.