‘दु निया रंगरंगिली बाबा..’सारखे जुने गाणे असो की आपण रोज अनुभवत असलेले जग असो- त्यातल्या रंगांच्या उधळणीत आपले मन रमते. आपल्या कित्येक आठवणी रंगांशी निगडित असतात. त्यामुळे त्याचे होणारे चित्रण जसेच्या तसे असण्याकडे माणसाची अपेक्षा असण्यात काहीच वावगे नाही. समोरचे दिसणारे किंवा कल्पनेतले चित्र रंगवताना चित्रकार हव्या त्या रंगाची हवी ती छटा आणण्यासाठी आपले कसब पणाला लावतो. चित्रकलेत अनेक नामवंत चित्रकार त्यांच्या रंगाच्या वापरावरून ओळखले जातात. रंग टिपण्याची गरज मनुष्याला प्रकाशचित्रकलेतही वाटू लागली. ही सर्वात तरुण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कला असल्याने त्यातील बदल आणि सुधारणाही वेगाने होत गेल्या.
lr09रंगीत चित्रणाचे मूळ तत्त्व जेम्स मॅक्स्वेलने १८५५ मध्ये मांडलेल्या प्रकाशाच्या सिद्धान्तात आहे. या सिद्धान्ताप्रमाणे प्रकाशात विविध तरंगलांबी असलेल्या लहरी असतात आणि त्या जेव्हा एखाद्या वस्तूवरून परावर्तित होतात किंवा शोषल्या जातात; तेव्हा त्या (लहरी) आपल्याला विविध रंगांत दिसतात. हे सर्व रंग लाल, हिरवा आणि निळ्या रंगाचे (यांना मूळ रंग म्हणून ओळखतात.) निरनिराळ्या प्रमाणात मिश्रण करून तयार करता येतात. एडवर्ड टर्नर यांनी इंग्लंडमध्ये १८९९ मध्ये रंगीत चित्रीकरणाचे स्वामित्व हक्क मिळवले आणि त्याचे प्रात्यक्षिक १९०२ मध्ये सादर केले. १९०९ मध्ये जॉर्ज स्मिथने त्याचे अधिक सुलभीकरण करताना व्यापारी तत्त्वावर ‘किनेमाकलर’ (kinemacolor)१) या नावाने  हे तंत्रज्ञान खुले केले. कृष्णधवल छटांमध्ये चित्रीकरण करून ते दाखवताना विविध रंगांच्या गाळण्यांमधून  (filters) प्रक्षेपित करण्याचे ढोबळ तंत्र तेव्हा वापरले जात होते. चित्र क्र. १ मध्ये १९०२ मध्ये एडवर्ड टर्नरने तयार केलेल्या चित्रफितीतील एक स्थिरचित्र दिसते.
कालांतराने रंगीत चित्रीकरण करणाऱ्या फिल्मचे दोन प्रकार रूढ झाले. १. इस्टमन कलर निगेटिव्ह- ज्यात कॅमेऱ्यात विरुद्ध छटांची प्रतिमा उमटून त्यापासून योग्य प्रतिमा असलेल्या प्रती काढल्या जायच्या. (उदा. स्थिर  किंवा चलचित्र कॅमेऱ्यात वापरली जाणारी फिल्म) आणि २. इस्टमन कलर पॉझिटिव्ह- या प्रकारच्या फिल्ममध्ये थेट आहे तशीच प्रतिमा उमटली जायची आणि त्या प्रतिमेचे थेट प्रक्षेपण करणे शक्य होते. (उदा. पारदर्शिका-२’slides). कृष्णधवल चित्रीकरण करू शकणाऱ्या फिल्ममध्ये वस्तूवरून कॅमेऱ्यात येणाऱ्या प्रकाशकिरणांच्या प्रकाशमानतेनुसार (luminous intensity) रंगांच्या विविध छटा मुद्रित केल्या जातील असे रासायनिक थर असत. तर रंगीत फिल्ममध्ये प्रकाशमानतेबरोबरच प्रकाशातील रंगांचा दृश्यपटल (visible spectrum) नोंदला जातो. ही नोंद चित्राच्या प्रत्येक भागातील लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांच्या प्रमाणात मोजली जाते.
रंगीत चित्रमुद्रण करणारी फिल्म विविध रासायनिक द्रव्यांचे थर देऊन बनवलेली असते. प्राण्यांच्या हाडांपासून मिळणारे जिलेटिन आणि सिल्व्हर हलाईड (चांदी आणि ब्रोमिन, क्लोरिन किंवा फ्लोरिनचे संयुग) ही त्यातील मुख्य रसायने. कारण त्यांचे प्रकाशाला प्रतिक्रिया देण्याचे गुणधर्म. या रसायनांवर प्रकाश पडल्यावर त्यांच्या प्रकाश- संवेदनशील प्रकृतीमुळे त्यांचा थर असलेल्या पृष्ठभागावर अदृश्य प्रतिमा तयार होते. या प्रकारच्या फिल्मचा काटछेद चित्र क्र. २ मध्ये दिसतो.
एकूण १२ थर असलेल्या या फिल्मची जाडी फक्त आठ मायक्रॉन इतकीच असते. या थरांमध्ये असलेल्या नील, हरित आणि लाल रंगांना संवेदनशील असणारे थर, प्रकाश पडल्याबरोबर त्यातील सिल्व्हर हलाईड स्फटिकांचे त्या- त्या रंगांच्या रंजक जोडीदार (Dye Coupler) असलेल्या  पिवळा, मजेन्टा आणि सियान या पूरक ((Complementary) रंगात अदृश्य प्रतिमा (Latent Image) तयार करतात आणि या सर्व प्रतिमांचे एकत्रीकरण होऊन फिल्मवर रासायनिक प्रक्रिया झाल्यावर प्रत्यक्ष प्रतिमेच्या पूरक रंगांमधील प्रतिमा उमटते. या थरातील सर्वात वरचा थर आतील सिल्व्हर हलाईड स्फटिकांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. प्रत्येक रंगासाठी (नील, हरित आणि लाल) दोन गाळणी थर असतात, ज्यात त्या रंगाच्या प्रमाणाची नोंद केली जाते. जलद थरात जास्त संवेदनशील मोठे रंगकण (grains) पकडले जातात, तर मंद थरात कमी संवेदनशील लहान रंगकण पकडले जातात. सर्वात खालचा अपारदर्शक थर प्रकाशकिरणे परत उलट बाजूने परावर्तन होऊन दुहेरी प्रतिमा नोंदण्याची शक्यता टाळतो. तसेच प्रत्येक दोन थरांमधील जिलेटिनचा थर त्या थरांमधील अनावश्यक भेसळ टाळतो.
चित्र क्र.३ मध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मुद्रणातील फरक दिसतो.
रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या निगेटिव्ह प्रतीपासून पुढे प्रत्यक्षदर्शी प्रतिमा असलेली प्रकाशचित्रे मुद्रित केली जातात. किंवा चलचित्र असेल तर त्याच्या प्रती काढल्या जातात. या प्रती मुद्रित करताना अथवा प्रती काढताना प्रतीच्या अपेक्षित दर्जाला उपयुक्त असे रासायनिक थर असलेला कागद वापरला जातो.
जेव्हा प्रकाशचित्रणकला सदृश (अल्लं’ॠ) तंत्रज्ञानाकडून सांख्यिकी (Analog) तंत्रज्ञानात विकसित झाली तेव्हा अर्थातच फिल्मचा वापर बंद होत गेला आणि सर्व मुद्रण चकतीवर होऊ लागले. सांख्यिकी चित्रण करणाऱ्या कॅमेऱ्यात हे कसे होते, ते पाहू.
कॅमकॉर्डरमध्ये भिंगातून आत येणारे चित्र/ दृश्य CCD  वर आले की ते कोटय़वधी ठिपक्यांमध्ये (पिक्सलमध्ये) विखुरले जाते. CCD (Charged Coupled Device) किंवा CMOS (Complementary metal-oxide semiconductor)  हे या प्रकारच्या कॅमेऱ्यात प्रकाश- संवेदक म्हणून काम करतो आणि आलेल्या प्रकाशऊर्जेचे विद्युतऊर्जेत रूपांतर करतो. जास्त तीव्रतेचा प्रकाश कमी तीव्रतेच्या प्रकाशापेक्षा जास्त विद्युतभार तयार करतो आणि CCD समोरील प्रतिमेचे व्हिडीओ चित्र तयार करतो आणि पुढे असलेल्या बायर फिल्टरकडे पाठवतो. CCD  आणि त्याच्याबरोबर असलेला रंग वाचणारा बायर्स फिल्टर ते चित्र/ दृश्याच्या पिक्सलचे रंग आणि प्रकाशमानतेची (Brightness) तीव्रता मोजतो. ते मोजमाप ० आणि १ अशा आकडय़ांच्या संचात नोंदवतो आणि ही नोंद कॅमेऱ्यामधील सुरक्षित सांख्यिकी चकतीकडे Secure Digital card- SD card) पाठवतो. काही उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांत चित्र क्र. ५ मध्ये दाखवल्याप्रमाणे झोत विभाजक (Beam Splitter) वापरतात. त्यामध्ये समोरील वस्तूच्या लाल, हिरव्या आणि निळ्या रंगात तीन वेगळ्या प्रतिमा तयार होतात आणि तीन वेगवेगळ्या चकत्यांमध्ये मुद्रित केल्या जातात आणि पुढे प्रक्रिया करून त्याची एक प्रतिमा तयार केली जाते.
सामान्य वापराच्या बहुसंख्य कॅमेऱ्यांत एकाचCCD/ CMOS पुढे तीन रंगांच्या गाळण्या असलेली फिरती चकती वापरून बायर फिल्टरमधील चौकोन हवा तो रंग टिपतात. सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे खरोखरच ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ होऊ लागली आहे.
दीपक देवधर- dpdeodhar@gmail.com