जन्म म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा नव्हे बरं का! हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. घामाघूम होऊन जातो मी. मित्रांनो, मी भोगलंय ते तुम्ही भोगू नये म्हणून.

lr05

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

विशेषत: नवीन लग्न झालेले असाल तर ही कथा तुम्हाला मार्गदर्शक होईल.
अलीकडे ही म्हणजे- मिनी एखादा पदार्थ करते म्हणाली की मला हुडहुडीच भरून येते. आधी बाहेर जाऊन ‘मॅक्सा फॉर्म’ किंवा ‘लोमोटील’ वगैरे पोट बिघडल्यावर घेतात त्या गोळय़ा घेऊन येतो. मनाची तयारी करून पाटावर जाऊन बसतो. खरं तर दूर कुठेतरी पळून जावं असंही वाटतं. पण आपल्या तरुण पत्नीला एकटं टाकून असं बेजबाबदारपणे निघूण जाणं तरी बरं दिसतं का! समाजाला विषय देण्यापेक्षा एकटय़ानं भोगलेलं बरं.
भगिनींनो, तुम्ही म्हणाल एवढं काय भोगलं? बायको एखादा पदार्थ इतक्या प्रेमाने करते म्हणते तर तिचं कौतुक जाऊ द्या, पण असं एकदम पळून वगैरे.. नाही तरी सगळे मेले पुरुष अस्सेच- भगिनी असं म्हणतील. पण पुरुषांना कदाचित पुन:प्रत्ययाचं दु:ख आठवेल. असो. आता नमनालाच घडाभर तेल पुरे!
एकदा नेहमीपेक्षा वेगळी (अगदी वेगळी) सकाळ उगवली. अजूनही ती आठवण.. रविवार असूनही मिनी लवकर उठली. माझा थोडासा हिरमोडच झाला, पण हे दु:ख पुढच्या दु:खापुढे अगदी नगण्य.
मलाही ती उठवायला लागली. ‘‘ऊठ ना! आज किन्नई मी तुझ्या आवडीचा पदार्थ करणारै! पर्वा तू त्या नायकीणबाईंकडे (मी दचकलोच. पण नाईक आडनावाच्या बाई) त्या सुरळीच्या वडय़ा खाल्ल्या होत्या ना त्या करणारै! तुला खूऽऽप आवडल्या होत्या.’’ (खू ऽ ऽप या शब्दांत दर्द आणि उपरोध आणि मीही करू शकते असे अनेक अर्थ) त्या वडय़ा खरंच मला खूप आवडल्या होत्या, तसं नाईकीणबाईना बोलून दाखवलं होतं. (ती फार घोडचूक झाली हे उशिरा कळलं.)
सौ. मिनी मला उठवीत होती. खरं तर आज एक दिवस सुट्टीचा! आरामात उठून चहा घेत पेपर वाचायचा. पुन्हा चहा घेत संध्याकाळचे किंवा मॅटिनीचे बेत रचायचे. पुन्हा कॉटवर लोळायचं. पण सगळे प्रकल्प रद्द झाले. मी चिडू नये म्हणून मिनीने तिचे एवढेसे केस माझ्या गालावर फिरवले, ‘उठतोस ना!’ लाडिक आवाज- ‘वडय़ा खायच्यात ना!’
‘अगं, मला वडय़ा खायच्यात खरं आहे. पण त्यांचा माझ्या उठण्याशी काय संबंध?
ती लाडिकपणे म्हणाली, ‘हे काय! तू उठल्याशिवाय मला सगळे पदार्थ कोण आणून देणार! आणि या वडय़ा केवळ तुझ्यासाठीच मी करणारै! मला नाही एवढी आवड आणि खाण्याची हौस!’ (म्हणजे माझ्यावर उपकार आणि मीच खादाड असा गर्भित अर्थ)
उठणं भाग होतं, नाहीतर रविवारचा विचका. चहाबरोबर खारी बिस्किटं- जी फार महाग असतात म्हणून व तुपकट असतात म्हणून मला मोजकीच मिळत; तिने अगदी बरणी पुढे ठेवून दिली. मीही चवीने खाल्ली. मिनीचा मूड बघून जरा अधिकच. तरीही तिने बरणीकडे पाहिले नाही.
अंघोळ लवकर उरकावी लागली. पैसे सहज हातात ठेवत मिनी म्हणाली, ‘पळ आता! ओला नारळ, तीळ, खसखस, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, अर्धा लिटर दही, चण्याची डाळ घेऊन ये. मी तिच्याकडे बघितल्यावर म्हणाली, ‘हे सगळं आवश्यकच आहे! तुझ्या लक्षात राहणार नाही. मी लिहूनच देते’ (माझ्या बुद्धिमत्तेवर केवढा विश्वास).
वस्तूंची यादी व पैशांचं व्यस्त प्रमाण बघून मी पैशांकडे केविलवाणेपणे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, ‘पुरतात एवढे! जास्त दिले की एखादा मित्र भेटतो, त्याला हॉटेलात चहा पाजवावा लागतो, वर सिग्रेटी फुंकणं!’ मी गप्पच बसलो. माझे ‘आतले’ पैसे घेऊन गेलो (तेही एक दु:ख.)
सर्व वस्तू घेऊन मिनीच्या कल्पनेइतकं लवकर परतलो. या दोन वर्षांत इतकं वेगात मी काम केलं म्हणून मिनी खूश झाली. कौतुक करू लागली. लगेच मी बाहेर निघालो तर म्हणाली, ‘हे काय! हे सगळं असंच काय टाकलंस! थोडीशी कोथिंबीर निवडून चिरून दे. थोडं खोबरं खवून दे, थोडे तीळ, खसखस बघून दे. बारीक खडे असतात कधी कधी..’ मी जरा रागात म्हटलं, ‘अजून काही थोडंसं आहे का?’
‘काही नाही बरं! बाकी सर्व मीच करणारै, फक्त एवढंच तर सांगितलं!’
मिनीचं ‘थोडंसं’ व ‘फक्त’ काय असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कोथिंबीर धुवून चिरून दिली. खोबरं खवून दिलं. खसखसे, तीळ निवडले, ताकही करायला लावलं. मग म्हणाली, ‘अय्या! डाळ दळून आणायचीय की!’ केवळ जिव्हालौंल्यासाठी माणूस किती कष्ट करू शकतो असं मला वाटून गेलं. आईच्या हाताखालीसुद्धा मी काही केलं नव्हतं.. पण बाईच्या.. जाऊ द्या. महिला आघाडी, स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, समान हक्क वगैरेमुळे बायका फार शेफारल्यात असं वाटलं.
आता आरामखुर्चीत पडून पेपर वाचून म्हणत सिगारेट शिलगावली. एक-दोन झुरके घेतले. इतक्यात मिनी बाहेर आली. भयंकर घोटाळा झाल्यासारखा संकटग्रस्त चेहरा. मीच भयभीत झालो. प्रश्नार्थक बघू लागलो. मिनी केविलवाणी झाली होती.  ‘एक वाटी पिठाला किती वाटय़ा ताक घेतात मला आठवेचना. जरा नाईकीणकाकूंना विचारतोस का फोन करून!’ आता न करून काय करणार? ‘वडय़ा आवडल्या’ म्हणालो होतो ना! मी फोन केला तर नाईककाका म्हणाले, ‘ती मैत्रिणींबरोबर मॅटिनीला गेलीय.’ मग समोरच्या उषा वहिनींकडे तिने मला पिटाळले. त्यांनाही नक्की प्रमाण माहीत नव्हतं. पण दोघी-तिघींच्या बहुमताने सुरळीच्या वडय़ा सुरू झाल्या.
ताटांना दोन्ही अंगाने तेल लावणे, ताटांवर शिजलेलं पीठ पसरणं (हात भाजून घेत!), त्यावर भराभरा खोबरं, कोथिंबीर पसरणं वगैरे कामात मी तिला मदत केली आणि बाहेर जाऊन वडय़ांची वाट बघत बसलो. रेशमासारख्या मऊसूत पिवळय़ाधम्मक वडय़ा, वर ताजी हिरवीगार कोथिंबीर, खोबऱ्याचा शुभ्र दुधाळ कीस, वरून हिंग-मोहरी-खसखशीची फोडणी..
सकाळपासूनच्या दगदगीमुळे मला झोप लागली असावी. साडेबारा- एकच्या सुमारास मिनीने मला उठवले. वडय़ा खाण्याच्या कल्पनेने सुखावलो. ‘इतक्यात मिनीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. दचकलोच. खूप उतरला होता तिचा चेहरा. केविलवाणा झाला होता. अध्र्याच्यावर तर मीच काम केलं होतं. मग हिला काय झालं थकायला! मी बळेच हसलो. पण ती हसेना. उगीच विचारलं, मिने, दमलीस का गं?’ म्हणाली, ‘दमायचं काही नाही रे! पण वडय़ा म्हणाव्या तशा जमल्या नाहीत. काय चुकलं काही समजेना. कितीवेळा मोडून केल्या, पण..’ मी म्हणालो, ‘जाऊ दे! त्याचं काय एवढं? जशा असतील तशा वाढ. एवढी नव्‍‌र्हस होऊ नकोस.’
मिनीने वडय़ा म्हणून ताटात जे वाढलं यावरून माझे सगळे अंदाज चुकल्याचं लक्षात आलं. वडय़ांच्या ऐवजी पिठाच्या गाठी गाठी ताटात पडल्या. सुरळीच्या वडय़ांचे जे रम्य दृश्य मी पाहिलं होतं ते एकदम भंगलं. मीही नव्‍‌र्हस झालो. मिनीचा चेहरा बघून माझी निराशा मी लपवली. मग काही आठवल्यासारखं करीत मिनी म्हणाली, ‘अरे! तू डाळीवरच डाळ टाकली होतीस ना? पुष्कळदा गिरणीत भेसळ होते?’
‘छे गं! अगदी समोर उभं राहून डाळ दळून घेतली.’
‘पण चवीला बऱ्या झाल्यात ना रे?’
आवंढा व पिठाच्या गोळय़ा गिळत मी म्हणालो, ‘तशा बऱ्या झाल्यात.’ खरं तर खसखशीतले बारीक खडे दाताखाली कचकच येत होते. मीच निवडले होते. सांगणार कुणाला? पिठाचे गोळे गिळवत नव्हते. पण आता काही म्हटलं तर मिनी रडेलच म्हणून तिने काही विचारले की डोळे मोठे करून हसायचा प्रयत्न मी करायचो. म्हणायचो, ‘काही का असेना, चवीला छान झाल्यात.’
मित्रांनो, खोटं नाटक करताना किती प्रयास करावा लागतो हे कदाचित तुम्हालाही ठाऊक असेल. महागाईचं टाकायचं तरी कसं? एवढी खसखस, खोबरं, कोथिंबीर तिच्यापुढे एक गुठळी तोंडात टाकायचो व तिचं लक्ष नसलं की हळूच पाटाखाली किंवा पाण्याच्या तांब्यात टाकायचो. ‘बरी झालेय’ म्हटल्यामुळे मिनी मला वाढतच गेली.
इतक्यात समोरच्या उमावहिनी आल्या. ‘मीना! ए मीना! कशा झाल्यात ग वडय़ा?’’ मिनीचा चेहरा एकदम उतरला. पण तशी ती फार प्रसंगावधानी!
‘अहो काकू, वडय़ा इतक्या मस्त झाल्या होत्या म्हणता! रेशमासारख्या मऊसूत. यांनी फस्तच केल्या बघा. (त्यावेळी पिठाच्या गोळय़ा टाकलेला तांब्या घेऊन मी मोरीकडे पळत सुटलो) आणि थोडय़ाशा उरलेल्या मी खाऊन टाकल्या. पुढच्या वेळी जरा जास्त करीन.’ उमा वहिनी गेल्यावर मिनी म्हणाली, ‘मुद्दामच त्यांनी चुकीचं माप सांगितलं असावं असं वाटतंय! खोटारडय़ा. वडय़ा बघायला येतात! पुढे ती काय बोलली हे ऐकायला मी थांबू शकलो नाही. म्हणजे थांबता आले नाही. पोटात कळा येत होत्या. पाच-सहा वेळा धावावं लागलं.
नंतर मात्र ठरवलं, यापुढे कधीही कुणाकडचाही पदार्थ आवडला तरी त्याचं बायकोसमोर कौतुक करायचं नाही. कारण तो पदार्थ नव्याने जन्मणार आणि वेदना मात्र मला सहन कराव्या लागणार. हा अनुभव मित्रांनो, तुम्हालाही आला असेल ना! द्या तर टाळी! नसेल आला अनुभव, तर माझ्या अनुभवाने शहाणे व्हा. कुणाच्याही पदार्थाची आपल्या बायकोपुढे स्तुती करू नका. लक्षात ठेवा.