नव्या जगात गूढ वसतं का? जुन्या जगात ते ठासून भरलं होतं. कारण त्या जगात विज्ञान नव्हतं. नव्या जगात विज्ञानासोबत तंत्रज्ञान आलं. माहितीची क्रांती झाली. मानवी मनावर मीडियाची अधिसत्ता वाढली. त्यामुळे मानवी जाणीव आणि नेणीव आत्मनिष्ठ न राहता झुंडनिष्ठ झाली. ज्या जगात जगणं म्हणजे ‘रिअ‍ॅलिटी शो’ आणि अनुभव म्हणजे ‘टुरिझम’ होतं, त्या जगात अंगावर काटा आणणारं, छातीत धडकी भरवणारं भय वसतं का?
‘दैत्यालय’ आणि ‘नशकाप्रमराश्री’ या दोन दीर्घ भयकथांचे लेखक हृषीकेश गुप्ते म्हणतील, हो, वसतं. कारण माणसाने कितीही आधुनिक किंवा उत्तरआधुनिक होण्याचा दावा केला तरी माणूस आदिम प्राणी आहे. प्राणी म्हटलं की भय आलं, गूढ आलं, िहसा आली आणि मानवी मनातल्या दैत्यांचा नाचसुद्धा आलाच. ‘जगताना उजेडापेक्षा अंधाराचं तात्त्विक मोल अधिक आहे’ असं सुचवणारे हृषीकेश गुप्ते भय आणि गूढ या दोन प्राथमिक प्रेरणांचं भयकथेच्या माध्यमातून उत्खनन करतात. त्याचे निष्कर्ष वेधक आहेत.
जागतिक साहित्यात भयकथांना सर्वोच्च स्थान नाही, पण मानाचं जरूर आहे. भय ही जैविक, म्हणून प्राथमिक प्रेरणा आहे. तिचा अप्रतिहत अंमल मानवी जाणिवेवर असतो. मग हा माणूस खेडय़ाच्या अंधाऱ्या पायवाटेवर चाचपडत असो, की गप्पकन दिवे गेलेल्या महानगरी हमरस्त्यावर. भयकथांचं अपील अशा अंधारात शोधता येतं.
मराठीत भयकथांची समृद्ध परंपरा आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी ‘पारंब्यांचे जग’ लिहिणारे नारायण धारप, नंतरचे रत्नाकर मतकरी, भारत सासणे इत्यादींच्या पंक्तीत हृषीकेश गुप्ते बसतात. त्यांच्यासाठी भय, गूढ, विस्मय आणि माणसाचे कुठलेही मनोव्यवहार निषिद्ध नाहीत. सोडियम व्हेपरच्या चकाचौंद प्रकाशात सारं महानगर न्हाऊन निघताना गुप्ते मात्र एकाकी इमारतींच्या जिन्यांमधला आणि मानवी मनातला अंधार शोधतात आणि त्याद्वारे आपल्या कथांमधून केवळ भयच नव्हे तर त्या भयाची कारणमीमांसासुद्धा करतात.
भयाला वास्तव समजून जगभरात अभिजात भयकथा लिहिल्या गेल्या. काळ बदलला. भयाला भय न समजता त्याचा अज्ञानाशी संबंध लावून भयाची विरचना करण्याचा नवा काळ आला. सायकॉलॉजी आणि सायकियाट्रीच्या विकासानंतर भयाला मानवी मनाचे विभ्रम समजलं गेलं. या भयाचं विश्लेषण करणाऱ्या आधुनिक लेखकांमध्ये गुप्ते यांचा समावेश होतो. त्यांच्या या पूर्वीच्या ‘अंधारवारी’ या भयकथा संग्रहातसुद्धा भयाच्या मानसिकतेची उलगड करण्याची आकांक्षा दिसून येते.
रोमँटिसिझमच्या तत्त्वदर्शनानुसार भय ही अस्सल आणि करकरीत मानवी प्रेरणा आहे. भयाचा बाऊ न करता त्यातल्या सौंदर्यवादी घटकांची कदर करणाऱ्या अनेक लेखकांना भयतत्त्वाने भुलवलं. जर्मन लेखक ई.टी.ए. हॉफमन किंवा अमेरिकन लेखक एडगर एॅलन पो या तत्त्वदर्शनाचे एकोणिसाव्या शतकातले महान प्रवक्ते होते.
‘खरा चित्रकार कोण? हाती ब्रश घेतलेला माणूस की ज्या कॅनव्हासवर तो चित्र काढतो तो कॅनव्हास?’ असा गूढ प्रश्न विचारणारी हृषीकेश गुप्त्यांची ‘दैत्यालय’ ही कादंबरिका कॅनव्हासच्या गूढ रंगसंगतीवर रचली गेली आहे. धुंडीराज खोत हे विलक्षण प्रतिभा लाभलेले चित्रकार. त्यांची विरोधाभासी रंगसंगतीची चित्रं भीषण दृष्टिभ्रम पदा करतात असा त्यांच्यावर कलासमीक्षक आरोप करतात. थंडीत दात कडकडावेत तशी कडकडणारी ही चित्रं. या तलचित्रांत असंख्य मानवी कवटय़ा दिसून येतात. या चित्रांकडे बघताना ‘कोणीतरी माझ्याकडे पाहात होतं’ असं दैत्यालयचा निवेदक म्हणतो.
या लोकविलक्षण चित्रकार खोतांची कीर्ती ऐकून त्यांना देशविदेशातून शिष्य मिळतात. अखेरीस ‘दैत्यालय’चा निवेदक खोतांनी चितारलेल्या कॅनव्हासच्या चेटूकात फसतो. याची उत्कंठा निर्माण करणारी भयकथा वाचताना वाचक लोणावळ्यानजीकच्या दैत्यालयाच्या परिसरात वावरतो. तिथल्या रानात भटकू लागतो, कुठे खुट्ट झालं की बिचकून बघतो, कथेत भेटणारी विलक्षण, अतक्र्य पात्रं बघून भांबावतो.
कलेला जसं उंच नेणारं एक दैवी तत्त्व असतं तसंच कलेत माणसाला गत्रेत ढकलणारं एक दैत्य तत्त्वसुद्धा वसतं, असा गुप्ते यांचा थेसिस आहे. पंचाहत्तर पानी ‘दैत्यालय’ या कल्पनेभोवती विणलेली आहे. भन्नाट, तीव्र, गूढ मानसिक आवेगांना रोमँटिक तत्त्वदर्शनात महत्त्व आहे. टोकाच्या भावनांचं स्तोम माजवणाऱ्या या तत्त्वदर्शनाला ‘काजळमाया’सारख्या गूढ कथा लिहिणाऱ्या जी.ए.कुलकर्णी यांनी उचलून धरलं होतं. गूढकथा लिहिताना जी.एं.नी गूढाला गूढच ठेवलं. गुप्ते मात्र गूढाची विज्ञानाच्या साहाय्याने विरचना करतात. ती करताना ते कितपत यशस्वी होतात हे कळून घ्यायला त्यांची ‘दैत्यालय’ वाचणं इष्ट. गूढकथेचं कथानक सांगू नये.
अनेक अतक्र्य घटना ‘दैत्यालया’त भेटतात. कलेसाठी आत्महत्त्येच्या टोकाला जाणारे कलाकार इथे आहेत. मानवी आयुष्याचं ध्येय कुतूहल शमवणं हेच. ते करताना काही माणसं स्वत:ला नष्ट करतात. ‘दैत्यालय’ अशा शोकात्म उत्सुकतेची कहाणी आहे. ती वाचताना स्थलकालाचं भान हरपतं. हे लेखकाचं यश आहे.
‘कल्पना आणि वास्तवात काय फरक असतो? काहीच नाही. कधी कल्पना वास्तवात उतरते, तर कधी आपण वास्तवच कल्पना मानू लागतो,’ या मध्यवर्ती सूत्राभोवती विणली गेलेली त्यांची ‘नशकाप्रमराश्री’ ही दुसरी कादंबरिका. ही एका लेखकाच्या निवेदनातून घडते. हा निवेदक ‘पॅरॉनॉईया’ आणि ‘ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसऑर्डर’ या मानसिक रोगांशी नीट अवगत दिसतो.
ही शंभर पानांची कादंबरिका विविध पातळींवर आकार घेते. एका पातळीवर लेखकाला कथा सुचते, दुसऱ्यावर या कथेतली पात्रं प्रत्यक्ष अवतरून लेखकाला छळू लागतात. तिसऱ्या पातळीवर ही कथा भ्रम असल्याचं लेखक सुचवतो. चौथ्या पातळीवर लेखक वाचकाला नवाच धक्का देतो..
भीती आभासात्मक की सत्य? असा तात्त्विक प्रश्न ही कादंबरिका उपस्थित करते. स्वप्न, सत्य, अंधार, आभास, वास्तव, स्मृतिभ्रंश, मृतात्मे इत्यादीं कल्पनांचा कलात्मक वापर करत गुप्ते वाचकांना ‘नशकाप्रमराश्री’च्या अंधाऱ्या बोगद्यात घेऊन जातात. तिथे वाचक चाचपडू लागतो. तो मिट्ट अंधाराचा भाग होतो. ‘मी स्वत: जरी लेखक असलो तरी मी कुणाच्या कथेतलं पात्र तर नाही?’ असा अस्वस्थ प्रश्न या कादंबरिकेतला लेखक विचारतो.
गुप्ते भयाची तात्त्विक मीमांसा करतात. ती करताना ते आधुनिक विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र इत्यादींचे संदर्भ देत उत्तरआधुनिक माणसाच्या आदिम भीतीला हात घालतात. आजचं मराठी साहित्य वास्तववादाचा ओव्हरडोस घेतल्यामुळे सुस्त झालं आहे. गुप्ते यांनी ही सुस्ती टाळली. त्यांनी वास्तवाला सत्याचा केवळ एक घटक समजून जगण्यातल्या अवास्तव आणि आभासी अतक्र्यतेला चितारलं. यात ते यशस्वी होतात.
ज्या मानवी अवस्थेवर साहित्य भाष्य करतं असं म्हणतात त्या अवस्थेत भीती ही जगण्याचा केवळ एक पापुद्रा आहे. भीतीयुक्त नसलेला पण चिंताक्रांत असलेला दुसरा पापुद्रा जगण्यासमोरचं आणि साहित्यासमोरचं आव्हान आहे. भीती ढोबळ तर चिंता सूक्ष्म भावना आहे. ‘हजार वेळा शोले बघितलेला माणूस’सारखी भेदक भयकथा लिहिणारे गुप्ते भीतीसोबतच चिंतेचं सौंदर्यशास्त्र मान्य करतील असा विश्वास वाटतो.
‘दैत्यालय’ – हृषीकेश गुप्ते, मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १७६, मूल्य – १८० रुपये.