तिशीतली ज्योती माझ्याकडे आली तीच वेगवेगळ्या तक्रारी घेऊन. भूक लागत नाही, पित्त होतं, केस गळतात, सांधे वाजतात, अशी यादीच होती तिची. बोलण्याच्या ओघात कळलं की, ज्योती हवाईसुंदरी आहे. सुडौल बांधा आणि नियंत्रित वजन यांना या क्षेत्रात खूप महत्त्व आहे. वजन २५० गॅ्रम्स जरी वाढलं, तरी लगेच यांच्या खाण्यापिण्यावर र्निबध येतात आणि सगळ्यात पहिली कुऱ्हाड येते तेला-तुपावर! त्याचे हे परिणाम!

  Triglycerides, कोलेस्टोरेल, फॅट या शब्दांचे ब्रह्मराक्षस आज सामान्य माणसाच्या अक्षरश: मानगुटीवर बसले आहेत. आजार कुठलाही असो, लोक आपल्या मनानेच तेल-तूप बंद करतात. त्यात पुन्हा सॅच्युरेटेड / अनसॅच्युरेटेड फॅटस्; ओमेगा सिक्स/ ओमेगा थ्री ; शॉर्ट / मिडिअम/ लाँग-चेन फॅट्टी अ‍ॅसिडस्, ट्रान्स फॅटस् या सगळ्याचा गुंता आहेच. ही सगळी नावं लक्षात ठेवणं, त्याचं प्रत्येक तेला-तुपातलं प्रमाण मोजणं आणि त्यानुसार आपल्याला योग्य काय याची निवड करणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. अशा संभ्रमित आणि भीतीदायक विचारातून, ‘नकोच ती तेला-तुपाची भानगड’ असा विचार उचल खातो. वर परत, ‘आम्हाला नाही तेल-तूप आवडत’ किंवा ‘आम्ही तर अगदी कमी तेलावर स्वयंपाक करतो, तूप तर खातच नाही’ असं लोक अभिमानानं सांगतात.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

चार्वाक हे इहवादी आचार्य असं सांगून गेले की कर्ज काढून तूप प्या. आम्हीही कर्ज काढतो; पण ते गाडी, एसी, फ्रिज, कॉम्प्युटर अशा आरोग्याला घातक गोष्टींसाठी; तुपासाठी नाही. असं का? तेल-तूप हे खरंच इतकं त्याज्य आहे का? ते असं बंद केल्यानं काही आजार नाहीत का होणार? तेला-तुपाचा विचार सोप्या आणि व्यवहार्य भाषेत करता येणार नाही का? आमच्या सुशिक्षित बुद्धीला हे प्रश्न कधीच का पडत नाहीत?     

आयुर्वेद शास्त्र सांगतं- ‘स्नेहोमयो अयं पुरुष:’ म्हणजे प्रत्येक प्राण्याचं शरीर स्नेहयुक्त आहे. प्रत्येक जीवाची वाढ, अस्तित्व आणि आरोग्य यासाठी स्नेहाची आवश्यकता आहे. (मनालासुद्धा स्नेह हवाच असतो की.) तो स्नेह मनुष्याला प्राधान्याने आहारातून मिळतो. जेवणात तेल, तूप असेल तर अन्न स्वादिष्ट लागतं. अन्नमार्गातून अन्नाचा प्रवास सुखकर होतो. अन्नाचा संघात (एकत्र चटणी ) चांगला होतो, मलप्रवृत्ती सुखकर होते. निरांजन, समई यांचे दिवे तेवत राहण्यासाठी ज्याप्रमाणे स्नेहच लागतो, त्याप्रमाणे आपल्या पोटातल्या अग्नीला निरंतर तेवत ठेवण्यासाठीही स्नेहाचीच गरज असते. अन्न पचायलाही हा स्नेह मदत करतो.

आहारातील स्नेह पचला की तो शरीरातील प्रत्येक अवयवाला, पेशीला बल देतो. केसांची वाढ, स्नायूंचा लवचिकपणा, सांध्यांचं आरोग्य, त्वचेचा वर्ण- तेज- मृदुता- आरोग्य, ज्ञानेंद्रियांच्या क्षमता, झोप लागणं, प्रजोत्पादन, आईच्या पोटातील बाळाची वाढ, बाळासाठी आईला पुरेसं दूध येणं, रोगप्रतिकारशक्ती, वार्धक्य दूर ठेवणं अशा कितीतरी गोष्टींसाठी स्नेहाची गरज असते. आपल्याला हे पटतंही, पण प्रश्न असतो- कुठलं तेल खायचं हा?

आयुर्वेदशास्त्र सांगतं की, ‘तैलानां तीलतैलं श्रेष्ठम्’ म्हणजे तेलांमध्ये तीळतेल श्रेष्ठ आहे. व्यवहारात सामान्यत: उत्तर भारतात मोहरीचं, मध्य भारतात शेंगदाण्याचं, तर दक्षिण भारतात खोबऱ्याचं तेल वापरलं जातं. (याशिवाय देशाच्या विविध भागांत उपलब्धतेनुसार विविध तेलं उपयोगात आणली जातात. जगभर भिन्न भिन्न स्नेह वापरण्याचा प्रघात आहे. जिथं जे पिकतं, ते उपयोगात आणलं जातं. त्यामुळे आपण अविचाराने कुणाचीही नक्कल करू नये.) या नेहमीच्या वापरातल्या तेलात समभाग तीळ तेल मिसळलं, तर चवीत फारसा फरक न पडता तेलाचे श्रेष्ठ फायदे मिळू शकतात. बाजारात सतत नवीन पदार्थाची तेलं येत असतात. त्या जाहिरातींना शहाण्या माणसाने भुलू नये. अगदी नामवंत कंपन्याही, बोगस संशोधनं दाखवून नफेखोरी करत असतात. अशी तेलं खाऊन आपली एक पिढी बरबाद झाली की, ‘ते तेल आरोग्याला कसं घातक आहे’ हे सांगणारं नवीन संशोधन आपल्यापुढे येऊ शकतं. त्यामुळे आपण आपलं, आपल्याला आरोग्याचा मार्ग दाखवणाऱ्या आयुर्वेदरूपी नंदादीपाच्या शाश्वत प्रकाशात वाटचाल करत राहावं, हे श्रेयस्कर.

रक्तवाहिन्यांमध्ये आणि शरीरात विशिष्ट अवयवांमध्ये मेद साठतो, हे खरं. पण त्याचं कारण असतं रिफाइन्ड तेल. तेलाचं शुद्धीकरण करताना त्याचा वास, रंग, चव हे नष्ट होतंच, शिवाय त्यात रसायनांचीही भर पडत जाते. या शुद्धीकरण प्रक्रियेत तेलातील शरीराला उपयुक्त घटक जळून जातात. रिफाइन्ड तेल हे आपलं आयुष्य वाढवत नसून,  दुकानाच्या फडताळातील तेलाचं आयुष्य वाढवतं. जितकं तेल जास्त रिफाइन्ड, तितकं ते जास्त घातक. ते शरीरात साठण्याची भीतीही जास्त आणि कर्करोग होण्याची शक्यताही जास्त. याउलट तेलाच्या घाणीचं फिल्टर्ड तेल अधिक हितकर. खरं तर चॉकलेट्स, आइस्क्रीम, चीज, कॅडबरी, लोणी, अति मांसाहार, या तुलनेनं जास्त घातक मेदाचा विचार आपण करतच नाही. फुलीच मारायची तर ती तेला-तुपावर न मारता या पदार्थावर मारायला हवी. सतत प्रवास करणाऱ्या, शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या, त्वचा/ कोठा रूक्ष असणाऱ्या व्यक्तींनी तर आहारात तेलाचा समावेश आवर्जून करायला हवा. याशिवाय कडधान्य, डाळी, बटाटा, बेसन अशा रूक्ष पदार्थाबरोबर योग्य प्रमाणात तेल खायलाच हवं. (आपल्या मिसळीला तेलाचा तवंग असतो तो उगीच नाही काही.) स्थूल व्यक्तींसाठीही तिळाचं तेल जास्त उपयुक्त.

मग तूप कुणी खावं? तर कृश, रात्री जागणाऱ्या, बुद्धीची कामे करणाऱ्या, पित्ताचा त्रास होणाऱ्या, विद्यार्थी, गर्भिणी, पोटाचे आजार असणाऱ्या, जखमी, शस्त्रकर्म झालेल्या, ज्यांना आपली स्मरणशक्ती- बुद्धी धारणाशक्ती- शुक्र- बल- वर्ण- प्रभा- ओज आयुष्य वाढवायचं आहे, अशा व्यक्तींनी. अर्थातच तेला-तुपाच्या अभावी शरीरातील ही कामं न झाल्यानं अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. साईचं दही, ते घुसळून काढलेलं लोणी आणि त्या लोण्याचं कढवून केलेलं;  विरजण-मंथन-अग्नी पचन असे तीन संस्कार झालेलं तूप हे पचायला हलकं असतं. तीळ तेल आणि तूप हे दोन्ही पदार्थ अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स, ओमेगा ३, ओमेगा डब्ल्यू, इसेन्शियल फॅट्स, व्हिटामिन अ अशा उपयुक्त घटकांनी ‘श्रीमंत’ असतात. तिन्हीत्रिकाळ मांसाहार करणाऱ्या पाश्चात्त्यांसाठी ‘तेल-तूप नको’ हा विचार गरजेचा असेलही. पण तिकडचे नियम आपल्या देशात जसेच्या तसे लागू होऊ  शकत नाहीत. तुपाचे हे फायदे जास्त प्रमाणात मिळण्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे ते भारतीय गाईच्या दुधापासून विरजण पद्धतीनं बनवलेलं असायला हवं.

 आमच्या शालेय वर्गाच्या एकत्रीकरणात हा विषय निघाला, तेव्हा विकासाच्या वाटेवर चालू पडलेल्या आमच्या मित्रांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘घाण्यावरचं तेल, देशी गाईचं दूध आणि तूप हे अति होतंय. तुम्ही काय देशाला परत मागे नेणार का?’

 ‘नाही,’ मी ठामपणे सांगितलं. ‘देशाचं आरोग्य बिघडलंय, त्याचा विकास करायचाय. कारण फक्त निरोगी माणूसच सुखी आणि आनंदी राहू शकतो.’

‘काहीतरीच! शहरात देशी गाईचं तूप कसं मिळणार, सांग बरं? ’

‘त्यासाठी शहरांनीच प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी खेडय़ांनी का खपावं? शहरातला उच्च मध्यमवर्गीय माणूस जर गाडीच्या ऐवजी गाय, गॅरेजच्या ऐवजी गोठा, पार्किंग झोन, मॉल्स, सेकण्ड होम यांच्या ऐवजी गोशाळा असा विचार करेल तर काहीच अवघड नाही.’ माझ्या या विधानावर नुसता हलकल्लोळ माजला.  अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन इथल्या वनवासी भागात काम करणारा आमचा एक मित्र मात्र म्हणाला, ‘हा विचार काळाच्या पुढचा आहे. सुरुवातीला याची थट्टाच होणार. पण याला पर्याय नाही. माणसाने आता स्वखुशीनं हा उपाय करावा, नाहीतर पुढे काळ त्याच्याकडून करून घेईलच.