मार्क्‍स, मार्क्‍सवाद संपला, कालबाह्य झाला, अशा घोषणा आता स्वस्तात होताहेत. या पाश्र्वभूमीवर खरोखरच मार्क्‍सवाद संपला का? मार्क्‍सची मूलभूत भूमिका काय होती? ती संपू शकते का? मार्क्‍सवाद संपला नसेल तर त्याची प्रस्तुतता कशी पाहायची? आजच्या भांडवलशाहीच्या घडामोडी कशा पाहायच्या? असे अनेक प्रश्न आज मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांना भेडसावत व अस्वस्थ करत आहेत. मार्क्‍सच्या काळी नसलेले अनेक नवे संदर्भही आताच्या काळाला आहेत.  मुळातच मार्क्‍सचा विचार या सगळ्या बदलांना कवेत घेऊन स्पष्टीकरण करण्याइतका लवचिक आहे का? त्याच्या मूलभूत सूत्रांचा विकास आताही कसा करता येईल? त्याचवेळी मार्क्‍सबद्दल, मार्क्‍सवादाबद्दल असलेले, पसरवलेले गैरसमज कसे दूर करायचे, या प्रश्नांनी अस्वस्थ होऊन जे वाङ्मय येतेय त्यात उदय नारकर यांच्या ‘मार्क्‍स काय म्हणाला?’ या पुस्तकाचा समावेश करावा लागेल. मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांसाठी, मार्क्‍स/ मार्क्‍सवादाबद्दल शंका बाळगणाऱ्यांसाठी ते महत्त्वाचे आहे.
मुळात हे पुस्तक स्वतंत्रपणे लिहिलेले नाही- जरी त्यावर नाव उदय नारकरांचे असले तरी. प्रा. टेरी ईगल्टन या ब्रिटिश मार्क्‍सवादी विचारवंताचे ‘व्हाय मार्क्‍स वॉज राइट?’ हे मार्क्‍सवादावरील पुस्तक आहे. मार्क्‍सवादाचे तपशीलवार विश्लेषण, मार्क्‍सचे मूळ म्हणणे व त्याबद्दलचे गैरसमज, त्यांना उत्तरे असे त्याचे स्वरूप आहे. नारकरांनी ईगल्टनच्याच पुस्तकाचा आधार मुळापासून घेतला आहे. तसेच त्याला भारतीय संदर्भाची आवश्यक व योग्य अशी जोड देऊन आणि भारतासंदर्भात एका प्रकरणाची भर घालून हे पुस्तक सिद्ध केले आहे. प्रा. ईगल्टन यांच्या विवेचनाला, मुद्दय़ांना नारकरांच्या कथनशैलीची जोड आहे. म्हणूनच हे पुस्तक ईगल्टन यांच्या पुस्तकाचा मुळाबरहुकूम अनुवादही नाही वा उदय नारकरांचे ‘स्वतंत्र’ असे लेखनही नाही. हा एक वेगळाच प्रयोग म्हणावा लागेल.
मूळची मार्क्‍सवादी दृष्टी, मार्क्‍सवादावरील विश्वास, मार्क्‍सच्या विचारांची आजची संदर्भ प्रस्तुतता या गृहीतांवर कोणतीही शंका उपस्थित न करता मार्क्‍सविरोधी व मार्क्‍सवादविरोधी असणाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे निरसन, मार्क्‍सच्या विचारातील विकास करण्यायोग्य जागा, अन्वयार्थ लावण्याचे स्वातंत्र्य आणि ते कालप्रस्तुत करण्याचा प्रयत्न यांनी हे पुस्तक प्रेरित व भारित झाले आहे. त्यामुळे मार्क्‍सच्या मूलभूत प्रमेयांबद्दलच्या आक्षेपांची चर्चा वा निरसन यात नाही. मार्क्‍सच्या मूलभूत प्रमेयांची वैधता मुळातच गृहीत धरली आहे. त्यामुळे मार्क्‍सवादी असणाऱ्या लेखकाने असे करणे स्वाभाविकही आहे. याचा परिणाम म्हणून या पुस्तकात सुप्त प्रचारही आहे. पण गांभीर्याची, वैचारिकतेची पातळी न सोडता आपला विचार, त्यावरील आक्षेप, त्यामागचे राजकारण व त्याची आजची प्रस्तुतता दाखवणे, यासाठीचे हे लेखन.
समारोप वगळता एकंदर अकरा प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक अन्वर्थक आहे. प्रत्येक शीर्षक हे मार्क्‍सवरील आरोपांचे सूचन करते. ‘मार्क्‍सवाद कालबाह्य झाला आहे’ या आरोपापासून लेखकाने सुरुवात केली आहे. ‘गुलामगिरी लादणारे तत्त्वज्ञान’, ‘यांत्रिकतेचे तत्त्वज्ञान’, ‘पोकळ स्वप्नरंजन’, ‘अर्थवादी मानव’, ‘हिंसा-रक्तपात- हुकूमशाही- मार्क्‍सवाद भारताला लागू नसते’ या प्रकरणांत मार्क्‍सवरील विविध आरोपांचा प्रतिवाद केला आहे.
खरे तर मार्क्‍सला अभिप्रेत असणाऱ्या क्रांतीप्रमाणे कुठेच क्रांती घडली नाही. जिथे क्रांती झाली ते समाज व त्यांच्या त्या-त्या वेळच्या ऐतिहासिक अवस्था व मार्क्‍सचे तर्कशास्त्र यांचा मेळ बसत नाही. पण कोठे ना कोठे क्रांती व्हावीच लागते आणि होते, या प्रकारचे उत्तर मार्क्‍सच्या प्रस्तुततेपेक्षा परिस्थिती व तिचा फायदा उठवणारे संघटन, नेतृत्व यांनाही असते हे लेनिन- माओ- हो चि मिन्हच्या उदाहरणांवरून लक्षात घ्यायला हवे. मागास देशांतील क्रांत्यांनी हुकूमशाही सरकारे अस्तित्वात आणली आणि त्याचबरोबर पक्षयंत्रणेचा सुयोग्य वापर करून बळकट लष्करी-नोकरशाही व विज्ञान तंत्रज्ञानाधिष्ठित अशी राज्ये अस्तित्वात आणली. त्यामुळे मार्क्‍सला अभिप्रेत असणाऱ्या ‘स्वातंत्र्या’चे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात नेमकेपणाने दिले गेले असे वाटत नाही. भांडवलशाहीने समृद्ध केलेल्या, पण तीव्र विषमतेने विभाजित असणाऱ्या समाजांमध्ये उत्पादनसंबंधातील बदल व सत्ताबदल हे क्रांतीचे प्रारूप खरे तर मार्क्‍सच्या विचारात बसणारे. पण तसे तर कोठेच घडलेले नाही. याचीही कारणमीमांसा नीट व्हायला हवी होती.
आजच्या संघटित कामगारांचे झालेले मध्यमवर्गीकरण, त्यांचे सामूहिक व्यक्तिवादी वर्तन, भांडवली व्यवस्थेतील त्यांचे हितसंबंध या साऱ्याचा परिणाम त्यांचे क्रांतिकारकत्व कमी होण्यात तर झालाच; पण त्यांची जीवनशैली समाजवादी जीवनदृष्टीच्या जवळपासही फिरकू शकत नाही (त्यांच्या जात-जमातवादी जाणिवा हा तर वेगळाच प्रश्न!). अशा स्थितीत मार्क्‍सला क्रांतीचा अग्रदूत कसा मानता येईल, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
या पुस्तकातील इतर प्रकरणांत सर्वात चांगली चर्चा राज्यसंस्थेच्या विलयाच्या कल्पनेची आहे. मार्क्‍सची भूमिका, राज्यसंस्थेचे वर्गीय स्वरूप व अराज्यवाद यांचा ऊहापोह लेखकाने केला आहे. मार्क्‍सवादातील कळीचा प्रश्न ‘पाया-इमल्या’चा. याची चर्चाही ‘पाया आधी, मग इमला’ अशी न येता पाया व इमला यांच्या एकत्रित प्रभावाची झाली आहे. आजवर मार्क्‍सवाद्यांनी दाखवलेल्या औदासीन्याची ही दुरुस्ती योग्यच मानावी लागेल. मार्क्‍सवादावर ‘आर्थिक मानव’ या संकल्पनेचा पगडा असल्याचा गैरसमजही लेखकाने नीट दूर केला आहे. पण यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे काय? उदा. ज्या मानवी स्वातंत्र्यासाठी मार्क्‍सची नैतिक लढाई होती, त्याचा बळी मार्क्‍सवादी राजवटीत कसा गेला?
मार्क्‍सची मूळ भूमिका व मार्क्‍सवाद्यांचा राजकीय-सामाजिक व्यवहार यातील अंतर उत्तरोत्तर वाढतच आहे, याची प्रचीती हे पुस्तक वाचल्यावर येते. ‘गरजेप्रमाणे दाम व कुवतीनुसार काम’ हे मार्क्‍सचे मूळ सूत्र केव्हाच सुटले आहे. याचा दोष मार्क्‍सच्या भूमिकेला व त्यातल्या संदिग्ध जागांना काही अंशी द्यावा लागेल, मात्र सगळा नाही. धर्माना राजाश्रय मिळाल्यावर त्यांचे जे झाले, तेच चळवळींना राजसत्ताश्रय मिळाल्यावर झाले. म्हणून या राजवटींच्या व्यवहारावरून मार्क्‍सच्या विचारांचे मूल्यमापन झाले. ते चुकीचे असले तरी होत राहणार; कारण मार्क्‍सच्या मूळ विचारांप्रमाणे चळवळींचे शील प्रत्ययाला यायला हवे. त्याची गरजही या पुस्तकाने अधोरेखित केली आहे. मार्क्‍सचे तत्त्वज्ञान समाजजीवनातील सामूहिक घडामोडींचे स्थूलपणे स्पष्टीकरण देते; पण त्यापलीकडची जीवनातील गुंतागुंत व व्यक्तिजीवनातील घडामोडी यांचे स्पष्टीकरण यातून मिळत नाही, हा ठसा मात्र या पुस्तकातून उमटतो.
मूलभूत सैद्धांतिक आक्षेपांचे विवेचन मात्र या पुस्तकात नाही. उदा. वरकड मूल्याचा सिद्धांत मार्क्‍सच्या काळीही चुकीचा होता. मार्क्‍सने नफा आणि श्रम-वेळ याचा अधिक विचार केला; बाजारपेठेचा नाही. म. गांधींच्या ‘हिंद स्वराज्य’मधील एका परिच्छेदावरून त्यांची सबंध भूमिका गृहीत धरणे, मार्क्‍स आणि मानवी स्वभाव अशा या पुस्तकातील अनेक आक्षेपांच्या जागा रिकाम्या दाखवता येतील. खरे तर मार्क्‍सच्या विचारांइतकेच गांधींच्या विचारांचे विकृतीकरण व टवाळी भारतात झाली आहे. मार्क्‍सने भांडवली आधुनिकतेची चिकित्सा केली तशी गांधींनीही केली. मार्क्‍सच्या संदर्भात गांधींवर टीका करताना याची विस्ताराने चर्चा आवश्यक होती. ‘हिंदस्वराज’ १९०९ चे आहे. त्यानंतर गांधींची दृष्टी, राजकारण पुष्कळ वेगळे झाले. शिवाय गांधींची टीका होती ती व्यक्तिस्वातंत्र्य, करारस्वातंत्र्य व खासगी मालकी या त्रयींवर आधारलेल्या भांडवली सभ्यतेवर. मार्क्‍सही यावरच टीका करीत होता. म्हणून दोषांच्या श्रेयसातील समान दृष्टीचे सूचन होऊ शकले असते. अर्थातच लेखक मार्क्‍सवादी असल्याने हे झाले नाही हे समजू शकते, पण मार्क्‍सच्या समर्थनासाठी गांधींची भूमिका तरी नीट मांडली जाणे आवश्यक होते असे वाटते.
एकंदरीत या पुस्तकाने मार्क्‍सवादावरील मराठी वाङ्मयात चांगली भर पडली. सोप्या, सुलभ पद्धतीने मार्क्‍सची ओळख यातून जशी होते, तशी चिकित्सेची होत नाही. मार्क्‍सवादी सत्तांच्या व्यवहारामुळे मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानातील ‘मानुषतेचे’ रूप मात्र पुढे येणे आवश्यक होते, ते मौलिक कार्य या पुस्तकाने केले आहे. भारतीय संदर्भातील उपमा, उदाहरणे यांनी पुस्तकाचा बाज भारतीय व भाषेच्या अंगाने ‘मराठी’ झाला आहे. संदर्भ व पूरक अवतरणे यांनी संदर्भमूल्य वाढले आहे.
‘नीलकमल’ या सिनेमाच्या आरंभी एक वाक्य पडद्यावर येते- ‘‘ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे त्यांना पुनर्जन्माच्या पुराव्याची गरज नाही आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांना कोणताही पुरावा पुरेसा नाही.’’ मार्क्‍सच्या विचारांचेही काहीसे असेच झाले आहे. म्हणूनच मर्यादित अर्थाने का होईना, या पुस्तकाचे विशेष मोल आहे.
‘मार्क्‍स काय म्हणाला’- उदय नारकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – १९९, मूल्य – २०० रुपये.    

peter higgs marathi articles loksatta
स्थितप्रज्ञ वैज्ञानिक
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही