मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील कार्याचा सर्वस्पर्शी मागोवा..
दे शाच्या सर्वागीण विकासामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून केंद्रवर्ती भूमिका निभावत आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. अशा वेळी मुंबईच्या विकासाचे आद्य शिल्पकार ना. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेटांच्या कार्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. नाना व त्यांचे समकालीन सहकारी यांनी मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे १९व्या शतकाच्या सुरुवातीला मुख्यत्वे सात बेटांची मुंबई, पुढील काही वर्षांत देशातील एक अव्वल शहर आणि जगातल्या सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक बनली. मुंबईच्या या अल्पावधीतल्या रूपांतरणाचे जे शिल्पकार होते, त्यात ना. जगन्नाथ शंकरशेट हे  अग्रगण्य होते.
मुंबई म्हटली की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर शहराच्या तीन मुख्य प्राणवाहिन्या उभ्या राहतात – दर दिवशी जवळपास ५० लाख प्रवाशांची ने-आण करणारी रेल्वे, एक कोटी २० लाख मुंबईकरांना दैनंदिन नागरी सुविधा पुरवणारी महानगरपालिका आणि प्रचंड प्रमाणात मालवाहतूक हाताळणारे मुंबई बंदर. याचबरोबर तलावांद्वारे पाणीपुरवठय़ाची यंत्रणा, सुसज्ज सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा, रस्त्यांवरचे  दिवे, फोर्ट भागातील दिमाखदार इमारती, राजाबाई टॉवर आणि मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन महाविद्यालय, ग्रँट मेडिकल महाविद्यालय, नायर महाविद्यालय, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डेव्हिड ससून लायब्ररी, एशियाटिक सोसायटी, म्युझियम, राणीचा बाग या सर्व संस्था १५० वर्षे मुंबईचा अविभाज्य भाग बनून राहिल्या आहेत.
मुंबईची लोकसंख्या गेल्या दोनशे वर्षांत अनेक पटींनी वाढली असली तरीही दीडशे वर्षांपूर्वी कार्यारंभ केलेल्या या संस्थांनीही आपले कार्यक्षेत्र  वाढत्या लोकसंख्येच्या प्रतिसादात यशस्वीपणे वाढवत नेले आहे. वरील सर्वच संस्था व यंत्रणा नानांच्या अथक कार्यातून उभ्या राहिल्या. जमशेदजी जीजीभाई थोरले व धाकटे, फ्रामजी कावसजी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, डॉ. भाऊ दाजी लाड व दादाभाई नौरोजी यांच्यासह मुंबईची उभारणी करण्यात नानांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले.
नानांचे आयुष्य अवघे ६२ वर्षांचे. १० फेब्रुवारी १८०३ ते ३१ जुलै १८६५. त्यांचा जन्म दैवज्ञ समाजातल्या पिढीजात श्रीमंत मुर्कुटे घराण्यात झाला. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा हे या कुटुंबाचे अनेक पिढय़ांचे तत्त्व होते व त्यामुळे त्यांना सर्वत्र प्रतिष्ठा होती. नानांचे वडील शंकरशेटजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती.
नानांचे मातृछत्र लहानपणीच हरपल्यावर शंकरशेटजींनीच त्यांचे संगोपन केले. नानांचे उत्तम शिक्षण व्हावे यासाठी विद्वानांकडून तत्कालीन भारतीय पारंपरिक शिक्षण व नावाजलेल्या इंग्रजी शिक्षकांकडून आधुनिक इंग्रजी शिक्षणाची घरीच सोय केली. नानांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. त्यांचे भाषांवरचे प्रभुत्व दांडगे होते. ते संस्कृतमध्ये आणि इंग्रजीत अस्खलित संभाषण करीत व लिहीत असत. शंकरशेटजींच्या निधनानंतर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कारभाराची संपूर्ण जबाबदारी नानांच्या खांद्यावर येऊन पडली, जी त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. शंकरशेटजींचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी जीजीभाई व त्यांचे दोन्ही मुलगे यांच्याबरोबर नानांचे आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांच्या सहकार्याने नानांनी अनेक संस्थांची उभारणी केली आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करून दाखवले.     
१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन संपूर्ण मुंबई इलाख्याचा गव्हर्नर झाला. दरबार व मेजवान्यांच्या निमित्ताने त्याची व नानांची गाठ पडली. एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्यात आधुनिक शिक्षणाचे पर्व सुरू करण्याचा ठाम निर्धार केला होता. नानांची बुद्धिमत्ता व प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टनने त्याच्या प्रयत्नांमध्ये नानांना महत्त्वाचे स्थान दिले. त्यांच्या प्रयत्नांनंतर १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली आणि नानांच्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ झाला.
मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबद्दल एल्फिन्स्टनप्रमाणेच नानाही आग्रही होते. त्यांच्यामुळे मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये व देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली. परिणामी, आधुनिक शिक्षणाची दारे सर्वाना खुली झाली. १८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज व शिक्षण संस्था कार्य करू लागल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या बुद्धिमंतांची पहिली पिढी तयार झाली; ज्यांनी भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
१८२८ मध्ये कलकत्त्यात लॉर्ड बेंटिक गव्हर्नर जनरल झाला. त्या वेळी बंगालमध्ये राजा राममोहन रॉय सतीच्या अमानुष प्रथेच्या उच्चाटनाबाबत सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी प्रयत्नशील होते. याविषयी १८२३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय व जगन्नाथ शंकरशेट यांच्या प्रमुख सहय़ा होत्या. बेंटिकने पार्लमेंटच्या पाठिंब्याने या प्रथेचे उच्चाटन करण्याचे ठरवले व या निर्णयाचे काय परिणाम होतील यासाठी सर्व प्रांतातील लोकांबरोबर गव्हर्नरांना चर्चा करण्यास सांगितले. त्या वेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरने- जॉन माल्कमने विविध प्रतिष्ठितांबरोबर चर्चा केली. त्यात नानांचे वेगळेपण अधोरेखित झाले. घरातील वातावरण धार्मिक असूनही सतीबंदीचा कायदाच नव्हे तर त्याची अंमलबजावणीही कडक असावी, असे ठाम मत नानांनी निर्भीडपणे मांडले. मुंबई इलाख्यात असा कायदा केल्यास फारशी विरोधी प्रतिक्रिया उमटणार नाही व उमटलीच तर लोकांना समजावून सांगता येईल असा नानांचा दृढ आत्मविश्वास होता. डिसेंबर १८२९ मध्ये बेंटिकने सतीबंदीच्या कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले.
यानंतर १८४५ मध्ये जे. जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल महाविद्यालयाची स्थापना, १८४९ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय व संस्थांद्वारे एतद्देशीयांच्या कन्याशाळा, १८५१ मध्ये सर्वाना संस्कृतचे शिक्षण खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’(आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले विधि महाविद्यालय, १८५७ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना असा नानांच्या कर्तृत्वाचा आलेख चढतच गेला.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राइतकेच प्रचंड कार्य नानांनी आर्थिक व मूलभूत सेवा क्षेत्रात केले. १८४५ मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ १८४६ मध्ये मराठी, हिंदी, पारशी-गुजराती आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा पाया घालणारे ‘बादशाही नाटय़गृह’, सर्वात कळस म्हणजे १८५३ मध्ये बोरीबंदर – ठाणे मार्गावर आशिया खंडात प्रथमच धावलेली रेल्वे, १८६२ मध्ये भायखळ्याचे वनस्पती उद्यान (आजची राणीची बाग), शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, र्मकटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया इत्यादी सहा बँका असा त्या पायाभूत कार्याचा पसारा होता. या सर्व संस्था नानांच्या मुख्य पुढाकाराने उभारल्या गेल्या. १८२२ ते १८६५ या ४३ वर्षांच्या कालावधीत शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक विधायक कार्य आणि राजकीय कार्य या सर्वच क्षेत्रांवर नानांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.  
नानांवरचे लिखाण १८५२ मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ  शकत नाही. सर्वसमावेशक खुले सभासदत्व असणारी पश्चिम हिंदुस्थानातली ही पहिली राजकीय चळवळ समजली जाते. ब्रिटिश पार्लमेंटकडे संघटित सभा, ठराव व प्रस्तावाद्वारे हिंदवासीय जनतेच्या सनदशीर मागण्यांना तेथूनच प्रारंभ झाला. दादाभाई नौरोजी, नौरोजी फर्दुनजी, डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या पुढाकाराने नानांच्या कार्याध्यक्षतेखाली या संस्थेने इंडिया बिल, बोर्ड ऑफ कंट्रोल, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांच्या कार्यात अभ्यासपूर्वक सुधारणा सुचवल्या. बॉम्बे असोसिएशनने तयार केलेला हिंदी जनतेचा प्रातिनिधिक विनंती अर्ज १८५३ मध्ये पार्लमेंटची कॉमन्स सभा व लॉर्ड सभा यांच्यापुढे प्रथमच मांडला गेला. त्या अर्जावर ब्रिटनमध्ये चर्चेचे मोहोळ उठले. तरीही त्यावर विचार होऊन कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या कारभारात काही सुधारणा करण्यात आल्या.
३१ जानेवारी १८८५ मध्ये बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये केले गेले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये गोवालिया टँकजवळ गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्याच सभासदांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली.      
नानांच्या पुण्यस्मरणाच्या १५०व्या वर्षांत त्यांच्या कार्याची आठवण संस्थात्मक रूपात राहीलच. तरीही त्याची खरी पावती ही सर्वानी एकत्र येऊन या महानगराच्या पुढील वाटचालीची भक्कम व उत्तम पायाभरणी करणे हीच राहील.    

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान