२३ एप्रिल १५६४ ते २३ एप्रिल १६१६ असे ५२ वर्षांचे आयुष्य. ३४ नाटके. तीन दीर्घकाव्ये. १५४ सॉनेट्स. एवढय़ा शब्दांत विल्यम शेक्सपिअरच्या आयुष्याचे गणित मांडता येईलही; पण त्याने निर्मिलेल्या lok20‘शब्दसृष्टी’चा पट मांडणे मात्र नक्कीच सोपे नाही. ते शिवधनुष्य एका अर्थाने परशुराम देशपांडे यांनी उचलले अन् त्याचा परिपाक म्हणजे ‘राजहंस एव्हनचा : शेक्सपिअर’ ही द्विखंडीय कादंबरी.
ही कादंबरी विल्यम शेक्सपिअरच्या जीवनाचा आलेख आहे असे म्हणणे बाळबोध ठरावे, एवढा प्रचंड आवाका या कादंबरीचा आहे. ही ‘मेकिंग ऑफ पोएट’ अशा धाटणीची कथा वाटते, मात्र सोबत सोळाव्या शतकाचेही चरित्र उलगडत जाते. खरे तर शेक्सपिअर काळासारखा, काळाइतका वैविध्यपूर्ण नाटककार आहे. तो जेवढा काळाचे अपत्य, तेवढाच तो कालातीत आहे.
१५८० सालापासून सुरू होणारी ही कहाणी १६१६ मध्ये संपते. या दोन टोकांतील जीवनप्रवासात शेक्सपिअरची विविध रूपे आपल्या समोर येतात. हातमोजे शिवणाऱ्या, कधीतरी सार्वजनिक प्रतिष्ठा लाभलेल्या, मात्र आपल्याच कर्माने ती गमावणाऱ्या बापाच्या- जॉनच्या घरात जन्माला आलेला विल्यम एव्हन या नदी काठावरील निसर्गरम्य स्ट्रॅनफर्डमध्ये मोठा होतो. त्याला निसर्गाचे गूढ आकर्षण बहुधा जन्मजात असावे. तो अ‍ॅन या बहिणीच्या मृत्यूने अंतर्मुख होतो. त्याच काळात अ‍ॅन व्हॅटली नावाचे निरागस प्रेम त्याच्या आयुष्यात डोकावते. पण काही कळण्याआधीच हातून निसटते. मेरी व जॉनच्या व्यवहारी घरात, कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट अशा झगडय़ात आणि गरीब विरुद्ध उमराव यांच्यातील धुसमुशीत विल्यम कवी म्हणून घडत जातो. सभोवतालचा निसर्ग, जेकिन्स आणि फुल्क ग्रेव्हिल यांच्यासारखे सहृदयी, ‘ओव्हिड’सारख्यांचे ग्रंथ त्याला घडवत जातात. फुल्कच्या पुस्तकांचा खजिना व त्याच्याकडून विल्यमला मिळालेल्या प्रोत्साहनाने, विल्यममधील कवी अधिक बहरून येतो. अ‍ॅन व्हॅटली नावाचे अल्पकालीन प्रेम त्याला अधिकच संवेदनशील करून गेलेले. तिच्या जाण्याचा सल त्याला कायम बोचत राहावा असाच होता. अ‍ॅनइतकेच त्याचे प्रेम त्याच्या गावावर. लंडनमधील वैभवसंपन्नतेच्या काळातही त्याचे स्ट्रॅनफर्डशी असलेले भावबंध कायम टिकले. तो आपले गाव मनात घेऊन जगला अन् चिरविश्रांतीसाठी तेथेच परतला. गाव व माणसे यांच्या सोबतचे विल्यमचे नाते लेखक परिणामकारकपणे उलगडतो.
कालौघात आणखी एक अ‍ॅन त्याच्या जीवनात येते. विल्यम व त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली अ‍ॅन यांच्यातील सुरुवातीचे वैषयिक आकर्षण, परिणामस्वरूप घडून आलेले मीलन व अकाली पितृत्वाची जबाबदारी या साऱ्यांचा परिणाम म्हणजे त्याचे व अ‍ॅनचे लग्न. लग्नापासून ते विल्यमच्या मृत्यूपर्यंतचे त्याचे व अ‍ॅनमधील व्यामिश्र नात्याचे दर्शन आपल्याला या कादंबरीत आढळते. आकर्षण, प्रेम, दुरावा, विरह, संशय, मुलाचा मृत्यू, त्यातून आलेले भान अन् उर्वरित आयुष्यात समंजस सोबत अशा लाटांवर विल्यम-अ‍ॅनचे नाते हेलकावत राहते.
फुल्क ग्रेव्हिलचा सहवास, तिथे त्याच्या कवितेला मिळालेले प्रोत्साहन अन् आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास त्याला नाटकाकडे घेऊन जातो. पत्नी, तीन मुले, परंपरागत व्यवसाय सोडून नाटकाचा ध्यास धरणे म्हणजे बंडच. आई-बापासाठी खानदानाची अब्रू धुळीस मिळवणे. चर्चसाठी नाटक म्हणजे सैतानाच्या कार्यशाळा, पण साऱ्यांचा रोष पत्करून हातात होलिनशेडची बखर, डोक्यात व्हर्जिल, ओव्हिड, दान्ते, सेनेका, प्लॉट्स घेऊन तो लंडन गाठतो. लंडनमध्ये धडपडणाऱ्या विल्यमची भेट जेम्स बर्बेजशी होते. त्याच्या नाटक कंपनीत हरकाम करताना तो नाटक समजून घेतो. येथेच त्याला मालरे भेटतो आणि विल्यमला नाटक कळते. त्याच वेळी त्याला प्रेक्षक, त्यांची मानसिकता, नाटकाची व्यावसायिकतादेखील कळत जाते. आपले स्वत:चे नाटक कसे असावे हेदेखील आकळत जाते. एका नाटककाराचे घडणे याचा प्रत्ययकारी अनुभव कादंबरी वाचताना आपण घेतो. विलक्षण संवेदनशील असलेला विल्यम भोवतालचा साक्षेपाने विचार करतो. कला व जीवन, बोध व आनंद, काव्य व नाटय़, नाटय़ व तत्त्वज्ञान असे अलग कप्पे न पाडता नाटक कसे लिहिता येईल याबद्दल त्याचे मन वेगवेगळे आडाखे बांधू लागते.
याच काळात त्याच्या आयुष्यात रिचर्ड बर्बेज, फ्लोरेन्स, हेन्री साउथम्प्टन आणि एमिलिया येतात. त्यांच्याशी साधलेले नाते त्याच्या नाटकालाच नव्हे तर आयुष्याला वळण देणारे ठरते. रिचर्ड व फ्लोरेन्ससोबतची विल्यमची नाटय़विषयक चर्चा हा या कादंबरीचा रोचक भाग ठरावा. रिचर्ड बर्बेज व त्याचे सहकारी शेक्सपिअरच्या नाटय़निर्मितीच्या अलवार पण घुसमटून टाकणाऱ्या अनुभवांमध्ये समरसतेने सहभागी होतात. त्यांचा रचनात्मक प्रतिसाद शेक्सपिअरच्या नाटय़निर्मिती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. साउथम्प्टन व एमिलिया त्याच्या सर्जनासाठीच्या प्रेरणा ठरतात. कादंबरीकाराने विलक्षण साक्षेपाने विल्यम व साउथम्प्टनमधील मैत्र रेखाटले, तितक्याच उत्कटतेने विल्यम व एमिलियाचे अलौकिक नाते शब्दबद्ध केले.
या कादंबरीत विल्यमचे माणूस व कवी म्हणून मोठेपण अधोरेखित होत जाते.
विल्यम शेक्सपिअर प्रत्येक माणसाप्रती सहिष्णू असणे हे वैशिष्टय़पूर्ण आहे. तो प्रत्येक पात्राला माणूस म्हणून पाहतो आणि प्रत्येक माणसाला पात्र म्हणून समजून घेतो. ‘माणसाला समजून घेणे’ या एकाच अद्भुत गुणावर शेक्सपिअरची नाटय़सृष्टी उभी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
ही कादंबरी शेक्सपिअरच्या नाटय़निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेते, त्याचबरोबर सोळाव्या शतकातील इंग्लंडची कहाणीदेखील सांगते. शेक्सपिअरच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी पाश्र्वभूमी म्हणून या कालखंडाकडे पाहता येईल. स्टॅनफर्ड हे गाव व लंडन हे शहर या कादंबरीतील आणखी दोन प्रमुख पात्रे. विल्यम शेक्सपिअरच्या जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आलेल्या व्यक्तींचे चित्रण या कादंबरीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार कवी शेक्सपिअरचे घडणे हा जरी कादंबरीकाराचा हेतू असला तरी त्याचे सलग असे माणूसपण मांडताना कादंबरीकार कुठेही कमी पडत नाही. मानवी जीवनाला इतके आंतरबाह्य जाणून तटस्थपणे आपल्या नाटकात प्रत्ययकारी पद्धतीने मांडणारा कवी हा  भाव-भावना मुक्त, हर्ष-खेदाने उमलणारा-कोमजणारा, हाडामांसाचा माणूस होता, हे या कादंबरीतून स्पष्ट होते. मराठी वाचकांसाठी शेक्सपिअरचे हे दर्शन नक्कीच अनोखे आहे.
‘राजहंस एव्हनचा : शेक्सपिअर’ (भाग १ व २) – परशुराम देशपांडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृष्ठे (एकत्रित)- ११८९, मूल्य (एकत्रित) –   ७५० रुपये.