खऱ्या अर्थाने ‘दादा’ संगीतकार.. सचिन देव बर्मन. सिनेसंगीतातल्या या असामीबद्दल खूप लिहिलं-बोललं गेलंय. पण मला बर्मनदा आवडतात ते त्यांच्या कधीही न विटणाऱ्या, कधीही शिळ्या न होणाऱ्या अशा विलक्षण ‘फ्रेश’ चालींसाठी. कशा-कशासाठी दाद द्यावी! ‘छोड दो आँचल’च्या आधीचा तो जगप्रसिद्ध जीवघेणा ‘आह्’, ‘जुल्फ शाने पे मुडी, एक खुशबूसी उडम्ी, खुल गए राज कई, बात कुछ बन ही गयी’ (प्यासा) म्हणताना ‘खुल गए राज’वरचा तो अलवार कोमल धवत.. की ‘बन ही गयी’वरचा ठामपणा.. ‘पलकों के पीछे से क्या तुमने’ (तलाश)मध्ये ‘रस्ता सजन मेरा छोडो’ म्हणताना ‘छो-डो’ अशा अर्थवाही गॅपसाठी, की ‘ठंडी हवाएँ लहराके आये’ (नौजवान)मध्ये त्या मस्त गार झुळकीसारखीच असलेली हवाईयन गिटारवरची सुरेख मिंड आणि लताबाईंच्या आवाजातल्या त्या झुळकेसारख्याच.. ‘हवाएँ’ या शब्दासाठी..
कुठल्याही एकाच प्रकारात स्वत:ला न अडकवणारा, सदैव तरुण असा हा संगीतकार. (म्हणूनच सदा ‘तरुण’ देवानंदशी त्यांचे सूर जुळले असावेत.) ‘व्हरायटी’ या शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर बर्मनदांची गाणी ऐकावीत. ‘तुम न जाने किस जहाँ में खो गए’ (सजा) आणि ‘यार मेरी तुम भी हो गजब’ (तीन देवीयाँ) ही एकाच संगीतकाराची गाणी आहेत, हे सांगावं लागतं. ‘दिन ढल जाए, हाय, रात न जाए’ (गाईड) हे कारुण्याने ओथंबलेलं गाणं देणारा हा संगीतकार ‘मने कहा फूलों से’ (मिली) असं मुलांच्यात खिदळणाऱ्या जया भादुरीसाठी तितकंच खेळकर गाणं देऊ शकतो. ‘गा मेरे मन गा’ (लाजवंती)सारखं मनाची घुसमट सांगणारं, पण त्या नायिकेच्या अत्यंत सालस स्वभावासारखं उच्च वैचारिक गाणं, आणि ‘मस्तराम बनके जिन्दगी के दिन’ (टॅक्सी ड्रायव्हर) ही किती वेगवेगळी गाणी, वेगळे मूडस् आहेत. कुठल्या प्रकारच्या संगीताची आजच्या काळात ‘हवा’ आहे, ट्रेण्ड आहे, याची अचूक जाण असल्यानं पन्नासच्या दशकात श्यामसुंदर, नौशाद, अनिल विश्वास यांच्या संगीताच्या ट्रेंडमध्ये शोभून दिसतील अशी गाणी.. ‘मेरा सुंदर सपना’, ‘नन दीवाने..’, साठच्या दशकात ‘आज फिर जीने की तमन्ना’, ‘तेरे मेरे सपने’सारखी थोडय़ा आधुनिक ऑर्केस्ट्रेशननी सजलेली गाणी.. ते ‘मिली’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘प्रेमनगर’ यांतली रेकॉìडगच्या आधुनिक तंत्राचा वापर करत दिलेली गाणी-याहून ही वेगळी.. हा सगळा पल्ला थक्क करणारा आहे.
या विलक्षण रसायनाचा मागोवा घेताना काही इंटरेिस्टग गोष्टी समोर येतात. धमन्यांमध्ये राजरक्त खेळवणारा हा अवलिया कोमिला (आता बांगलादेशात!) संस्थानात नवद्वीपचंद्र बर्मन यांच्या कुटुंबात १० ऑक्टोबर १९०६ रोजी जन्माला आला. वडील शास्त्रीय संगीताचे जाणकार. ध्रुपद गाणारे. उत्कृष्ट सितारिये. बर्मनदांचं बालपण त्रिपुराच्या जंगलात, आसामच्या हिरवाईत गेल्यामुळे तो पूर्व भारताचा ‘लोकरंग’ कुठेतरी नकळत त्यांच्यात भिनला. बादलखाँ, भीष्मचंद्र चट्टोपाध्याय यांच्याकडून शिस्तशीर तालीमही मिळवली. पण मुख्य म्हणजे नदीकाठची खास गाणी ‘भटियाली’, बाउलगीतं यांच्याशी घट्ट नाळ बांधली गेली. संगीताच्या सर्व प्रकारांना कोळून प्यालेल्या बर्मनदांना म्हणून ‘परिपूर्ण संगीतकार’ म्हणावंच लागतं.
मुंबईत आल्यावर त्यांचा पहिला चित्रपट होता ‘शिकारी’ (१९४६). पण त्यांच्या संगीताला यश मिळालं ते ‘दो भाई’ (१९४७) या चित्रपटाद्वारे. ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, ‘याद करोगे.. याद करोगे’ ही सुंदर गाणी गाजली. गीता दत्तलाही यशाची चव याच गाण्यांमुळे चाखायला मिळाली. आश्चर्य म्हणजे यावेळी गीता रॉयचं वय अवघं १५ वर्षांचं असल्याचं इतिहास सांगतो. तिच्या आवाजातला पॅथॉस बर्मनदांनी किती आधी ओळखलाय! आणि याच गीताकडून क्लब साँगपासून ते रोमँटिक, हळुवार गाणी गाऊन घेऊन तिच्या आवाजाचं सोनंही बर्मनदांनीच केलं.
प्रामुख्याने त्यांच्या बंगाली संगीताचा प्रभाव नक्कीच वरचढ ठरला. रवींद्र संगीत, काझी नजरूल इस्लाम यांच्या नजरूल गीतांसह बंगालच्या मातीत रुजलेलं संगीत त्यातल्या सर्व बारकाव्यांसहित निसर्गाशी नातं सांगत बर्मनदांच्या संगीतात विरघळलेलं आहे. के. सी. डे या ज्येष्ठ गायकाचाही प्रभाव सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर होता. बर्मनदांच्या टवटवीत चालींचं रहस्य त्यांना असलेल्या निसर्गाच्या वेडात असू शकेल. कदाचित अनेक पाश्र्वभूमींमधून आलेल्या त्यांच्या सहाय्यकांमुळे अनेक प्रवाह, रंग त्या गाण्यांना मिळत राहिले. पत्नी मीरा बर्मन, मुलगा राहुल यांच्यापासून ते जयदेव, एन. दत्ता, अनिल अरुण अशी मंडळी सहाय्यक म्हणून असल्याने कायम एक प्रकारचं नावीन्य, वेगळ्या शैली त्यांच्या गाण्यांत डोकावत राहिल्या. चालीचं मुख्य सृजन दृश्य स्वरूपात एकदा आलं, की बाकीची कारागिरी सहाय्यकांवर सोपवून समुद्रावर फेरफटका मारायला जायचं, आल्यावर पुन्हा त्या गाण्यावर स्वत:ची खास ‘मुद्रा’ उमटवून ते गाणं पक्क करायचं, ही सचिनदांची पद्धत. काव्याच्या दृष्टीने ‘भारी’ शब्द असलेलं गाणं जयदेवकडेच जाणार. पण मग जयदेवकडून कठीण झालेली चाल ‘मॉडरेट’ करणंही आलं.. आणि ‘पान’ हा वीक पॉइंट.
संगीतकार जेव्हा गायकही असतो तेव्हा आवाजाची विशिष्ट फेक, शब्दांवर जोर देणं, उच्चारणाची पद्धत हे गायक/ गायिकेकडून कसून तयार करून घेतलं जातं. जसं मराठीत सुधीर फडकेंच्या चाली इतर गायकांनी गायल्या तेव्हा बाबूजींच्याच गायनशैलीचा प्रत्यय त्यात आला. तसंच बर्मनदांच्या चाली आशाबाई, लताबाई, गीता यांनी गायल्या तेव्हा बर्मनदांचीच गायकी त्यात स्पष्ट दिसते. ‘सोच के ये गगन झूमे’ (ज्योती)सारख्या ‘अभी चाँद निकल आएगा’ या ओळीत ‘चाँद’वर जो हेलकावा आहे, तो टिपिकल बर्मनदा टच्.
त्यांची स्वत:ची गाण्याची स्टाईल किती वेगळी ! एक प्रकारचा रस्टिक, रांगडा आवाज. आणि मुख्यत्वेकरून स्त्री-भावना प्रकट करणारी त्यांची गाणी. पुरुषाच्या आवाजात स्त्री-मनाचं प्रतििबब हाच मुळात अफलातून प्रकार. ‘मेरे साजन है उस पार’ (बंदिनी), ‘सफल होगी तेरी आराधना’ (आराधना) ही गाणी त्या- त्या नायिकेची मनोवस्था सांगतात. तर आयुष्याच्या विचित्र विषण्ण वळणावर येऊन ठेपलेल्या राजू गाईडची भावना ‘वहाँ कौन है तेरा मुसाफिर’मधून खूप अस्वस्थ करते. ‘कोई भी तेरी राह ना देखे, आँख बिछाए ना कोई..’ या अधांतर अवस्थेची बर्मनदांच्याच आवाजात भीषण जाणीव झाली. आपली वाट बघणारंच कुणी नाही, ही अवस्था किती भयंकर असेल!
बर्मनदांनी किशोरच्या आवाजातला मिश्कीलपणा, खुशालचेंडूपणा मस्त वापरला. देवानंदच्या पडद्यावरच्या इमेजला तो फिट्ट बसला. पण एकाच चित्रपटात (नौ-दो-ग्यारह) रफी आणि किशोर दोघांचे आवाज देवानंदसाठी कसे साजून दिसले? ‘हम है राही प्यार के’ (किशोर) आणि ‘आजा पंछी अकेला है’ (रफी) असे दोन वेगवेगळे आवाज एका देवानंदसाठी गायले आहेत. सचिनदांनीच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ‘आवाजातल्या मॉडय़ुलेशन्सचा गाण्यांत नावीन्य आणण्यासाठी मी सतत प्रयोग करत आलो आहे. एक छोटासा आलाप, एक लकेर, त्याचा विशिष्ट टोन सांगून जातो की कॅरेक्टरचा स्वभाव काय आहे, कुठल्या मूडमध्ये हे गाणं आपल्याला घेऊन जाणार आहे..’ त्यांची कितीतरी गाणी अशा आलापाने सुरू होतात, किंवा दोन अंतऱ्यांमध्ये असे अर्थवाही आलाप असतात. त्या आलापाने पुढच्या गाण्याचं ‘२‘ी३ूँ’ आपल्यापुढे तयार होतं. त्यातली काही गाणी सांगते. बाकीची गाणी तुम्ही शोधून पाहा. खूप इंटरेिस्टग आहे हे शोधणं. ‘आँखो में क्या जी, ये तनहाई, हाय रे हाय, नदिया किनारे, अब तो है तुमसे, पिया बिना..’ इ. इ. गंमत म्हणजे ‘ठंडी हवाएँ’मधली ती सुरेख लकेर सी. रामचंद्रांनी सुचवल्याचं मी वाचलंय. काय सुंदर काँट्रिब्युशन! काही वेळा (न तुम हमे जानो : हेमंत-सुमन) एकाच वेळी गाण्याची ओळ आणि आलाप समांतर जातात तेव्हा तर गाणं वेगळ्याच उंचीवर जातं. हे आलाप त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव दाखवतात. ‘बाजी’मध्ये ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले’मध्ये गीता दत्तच्या आवाजात ‘हे.. हे.. हे..’ कसला बेफिकिरीने आलाय. शिवाय तो ‘ऑफबीट’ पण आहे. त्यातही हे चाकोरीबाहेरचं जगणं दिसतं. आणि पडद्यावर गीता बाली अतिशय ठेक्यात डोळ्यांच्या, खांद्याच्या हालचाली करत हे गाते. (तिला असं डोलताना पाहणं हा एक वेगळा विषय आहे. खूप कमी नायिका अशा ‘तालात’ डोलतात.) ‘सच हुए सपने तेरे’ (कालाबाजार)मध्ये वहिदाने मोठय़ा तणावातून मोकळं झालेल्या अवस्थेत बेभान होऊन नाचताना घेतलेली ती सुंदर लकेर अस्मानाला जाऊन भिडते. आणि ‘आज फिर जीने की तमन्ना’ (गाईड)मध्ये ती मातीची घागर फोडताना, तो कात टाकण्याचा, मोडक्या संसाराची लाज टाकण्याचा भाव.. आलापात आधी येतो आणि मग मागून शब्द येतात.. ‘काँटो से खींच के ये आँचल..’ इतकी ताकद त्या छोटय़ा आलापात आहे.
बंगाली संगीताची ‘जान’ असलेली ‘मिंड’ सचिनदांच्या गाण्यात कशी जादू करते पाहा. (मिंड म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर अलगदपणे झेपावणं!) मुळात बंगाली भाषेतच ती गोलाई असल्याने कुठेही ्नी१‘ बसू न देता सुंदर गोलाईने स्वर जोडणं बर्मनदांना चालींमध्ये किती सहजपणे जमतं. ‘हम भरी दुनिया में तनहा हो गए’ (तुम न जाने) म्हणताना ‘हम भरी’ या शब्दांचा घुमारा भावमिंडेमुळे ठळक झालाय. ‘लूट कर मेरा जहाँ’ची तीव्र, आर्त हाक ूल्ल३१ं२३ दाखवून जाते. आपण थक्क होत राहतो. तो ‘छोड दो आँचल’च्या आधीचा ‘आह्’ तर वेड लावतोच, पण ‘देख के अकेली मोहे बरखा सताए’ (बाजी)मधला कोरस (टिप टिप टिप टिप) इतका गोड आहे! आणि कोरसनंतर येणारा तो ‘उई’! खरंच, पहिल्या पावसाचा थंडगार थेंब अंगावर पडल्यावर शहारल्याचा परफेक्ट फील त्या ‘उई’मुळे येतो. आवाजातल्या टोन्सचा मस्त वापर सचिनदा करतात. हेमंतकुमारच्या आवाजातल्या खर्जाचा अचूक उपयोग ‘सुन जा दिल की दास्ताँ’मध्ये ‘दास्ताँ’ शब्द कसा समुद्राच्या तळाचा मोती दिसावा तसा वाटतो. तस्साच ‘चुप है धरती, चुप है चाँद सितारे’ (घर नं. ४४)मध्येही हेमंतकुमारचा ‘सितारे’ हा शब्द इतका सुंदर खर्जात उतरतो.. कधीतरी चांदण्या रात्री हे गाणं ऐकून बघा.
अनेक रागांच्या अभिजात चौकटींत बर्मनदांची निर्मिती सजली. नटबिहाग (झनझन झन बाजे- बुझदिल), शहाणा काफी (घायल हीरनिया- मुनीमजी), खमाज (नजर लागी राजा- कालापानी), अहिर भरव (पूछो ना कैसे मने- मेरी सूरत तेरी आँखे), मारूबिहाग (अब आगे तेरी मर्जी- देवदास), कलावती (चल री सजनी- बंबई का बाबू) इत्यादी.
अनेक उपशास्त्रीय गायनशैली त्यांच्या गाण्यांमध्ये आपलं सुरेल अस्तित्व दाखवून गेल्या. चती (ढलती जाए चुंदरिया-नौ दो ग्यारह), टप्पा (खायी है रे हमने कसम- तलाश) याचबरोबर पूरबी लोकसंगीत (शिवजी बिहाने चले-मुनीमजी), जानू जानू री (इन्सान जाग उठा), भटियाली (सुन मेरे बंधु रे- सुजाता), बाउलगीत (आन मिलो श्याम सांवरे- प्यासा) अशी लोकसंगीताची झकास डूब असलेली गाणी कितीतरी आहेत. काही चाली रवींद्र संगीताचा वारसा सांगतातच. उदा. ‘जाने क्या तूने कही..’ पण ‘कैसी ये जागी अगन’ (जाल) हे रवींद्र संगीताची डूब असलेलं गाणं आहे मात्र गोव्याच्या पाश्र्वभूमीवर. असं सुरेख ब्लेंिडग करायला एक वेगळा आत्मविश्वास लागतो. तो इथे दिसतो.
गाण्यातल्या एखाद्या अक्षराला डोलवणं ही एक सुंदर खासियत दादांच्या गाण्यांत दिसते. ‘रुला के गया सपना मेरा’ (ज्वेल थीफ)मध्ये ‘वो ही है गमे दिल.. वो ही हम बेसहारे’ म्हणताना ‘हम’ शब्दातला ‘म’ कसा डोलवलाय, हे ऐकण्यासारखं आहे. ‘दिल जले तो जले’मध्ये ‘किसी की न सुनऽऽऽ गाए जा..’ हे असंच गाणं. ‘फैली हुई है सपनों की बाहें’मध्ये ‘आजा, चल दे कहीं दूऽऽर’मध्ये ‘दूऽऽर’ शब्दावरची ती करामत.
तालाच्या नेहमीच्या ठेक्याला काहीसं चकवणारं स्वरूप देणं, हा तर बर्मनदांच्या डाव्या हाताचा खेळ. त्यामुळे शब्दांना खूप वेगवेगळ्या वजनांनी ओळीत मांडता येतं. पण हे ऐकायला जेवढं सहज वाटतं, तेवढं सुचणं आणि गाऊन, वाजवून घेणं सोपं नाही. अशी काही गाणी बघू या..
‘जलते हैं जिसके लिये’मध्ये ‘दिल मे रख लेना । इसे । हाथों । से ये । छूटे ना कहीं, गीत नाजुक है मेरा । शीशे । से भी । टूटे ना कहीं’ असं विभाजन करणं किंवा ‘दी । वा । ना । ‘म-स-ता-ना’ अशी अक्षरं विभागणं.
‘बागों में। कैसे । ये फूल । खिलते है । खिलते है’ या अशा ‘स्कॅिनग’मुळे ही चाल वेगळी आणि आकर्षक वाटते. आणि नंतर ‘बागो मेंऽऽ’ अशी ती लकेर. ‘मोरा गोरा अंग लई ले’ (बंदिनी)मध्ये ‘गोरा’मधला ‘रा’वर बीट (सम) आहे, आणि त्यातच त्या गाण्याचं वेगळेपण आहे. ‘हम आपकी आँखों में इस दिल को बसा दे तो’ (प्यासा)मध्ये ‘आपकी’ शब्दावर बीट असेल असं वाटून फसायला होतं. तो बीट ‘हम’ शब्दावर आहे. वरकरणी साधं वाटणारं हे गाणं गाताना अनेकांची तारांबळ उडताना मी पाहिली आहे. हीच गंमत पंचमच्या ‘मेरी भीगी भीगी सी’ (अनामिका)मध्येसुद्धा येते. म्हणून पाहा..
बर्मनदांच्या आणखी काही वैशिष्टय़ांची आणि गाण्यांची चर्चा करूया पुढच्या भागात..