शाब्दिक कोटय़ांचा आणि अंगविक्षेपांचा वापर न करताही मनमोकळं हास्य निर्माण करणारं ‘वल्लभपूरची दंतकथा’ हे मराठीतलं दुर्मीळ नाटक असावं. ‘वल्लभपूरची दंतकथा’सारखी नाटकं पुन्हा येतील? पुन्हा ती तितकीच यशस्वी होतील?

कमानी रंगमंचाला नकार देणाऱ्या तिसऱ्या रंगभूमीच्या अगोदर वंग नाटककार बादल सरकार हे कमानी रंगमंचासाठीही नाटकं लिहीत होते. ‘एवम् इंद्रजीत’ हे त्यापैकीच एक! या नाटकात रंगभूमीचे सगळे रूढ संकेत मोडले होते. या नाटकाला गोष्ट अशी नव्हती. काही न सुचणारा लेखक हाच नाटकाचा नायक होता. अमल, विमल, कमल या तिघांना विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांचं लिंपण नव्हतं. सगळी पात्रं पारदर्शक आणि कमालीची वास्तव होती. घुसमट होणाऱ्या सामान्य माणसाचंच हे नाटक होतं- नव्हे, ती एक कविताच होती. हे नाटक त्या वेळी नाटकातला नट असलेल्या अमोल पालेकर यांनी पाहिलं आणि ते विलक्षण प्रभावित झाले. नाटक असंही असू शकतं, हे त्यांना ‘एवम् इंद्रजीत’ पाहून कळलं. आपले गुरू सत्यदेव दुबे यांच्याकडे त्या नाटकाबद्दल ते भरभरून बोलू लागले, त्या वेळी दुबेजींनी त्यांना बादल सरकारच्या आणखी एका नाटकाचं नाव सुचवलं. बादल सरकारांच्या त्या बंगाली नाटकाचं नाव होतं, ‘बोल्लोवपुरेर रूपकथा’ हे नाटक अमोलने वाचून त्याचा मराठीत अनुवाद त्यांनी करावा, अशी इच्छा दुबेजींनी व्यक्त केली. ‘पण हे नाटक ठीक नसेल तर..?’ अमोलच्या या प्रश्नावर दुबेजी म्हणाले, ‘तो मोठा नाटककार आहे. त्याचं साधारण वाटणारं नाटकही इतरांच्या नाटकापेक्षा खूप बरं असेल. तू बेधडक ‘बोल्लोवपुरेर’ अनुवादाला घे’ गुरूची आज्ञा शिष्याने शिरसावंद्य मानली आणि ‘वल्लभपूरची दंतकथा’ या नावानं त्या नाटकाचा मराठी अनुवाद केला. ‘थिएटर युनिट’ या संस्थेतर्फे सादर केलेले हे पहिले नाटक. त्यापूर्वी ही संस्था फक्त हिंदी नाटक रंगमंचान्वित करीत असे. नाटककार बादल सरकारांची मराठी प्रेक्षकांना पहिली ओळख करून दिली ती याच नाटकाने. थिएटर युनिटचं हे नाटक अमोल पालेकर व सत्यदेव दुबे या दोघांनी मिळून दिग्दर्शित केलं होतं.
राज्य नाटय़ स्पर्धेत (१९६९) या नाटय़प्रयोगाला पहिलं पारितोषिक मिळालं. दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक सत्यदेव दुबे यांना मिळालं तर वैयक्तिक अभिनयाची पारितोषिकं एकनाथ हट्टंगडी (हालदार) व रेखा सबनीस (स्वप्ना) यांना मिळाली. इतर सहभागी कलावंत असे होते- अमोल पालेकर (भूपती), सदानंद दाते (मनोहर), रमेश सावे (साहू), रमेश देंबुलकर (श्रीनाथ), चंद्रशेखर शेणॉय (पवन), रवींद्र बाक्रे (संजीव), सुषमा पैठणकर (छंदा), विनोद दोशी (चौधरी).
कोकणी नाटकांतून काम करणाऱ्या एकनाथ हट्टंगडीचा शोध पालेकरांनी घेतला आणि प्रथमच त्याला या मराठी नाटकात झळकवला. त्यानंतर या प्रतिभासंपन्न नटाने अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके गाजवली. एक नाटककार व एक नट या नाटकाने मराठी रंगभूमीला दिला. असं हे विनोदी पण वेगळं नाटक होतं तरी काय, ते आता पाहूया!
तसं पाहिलं तर भूपतीची गोचीच झाली होती. केवळ आईबापाचं छत्र नव्हतं, म्हणूनच नाही तर डेन्टिस्ट होऊनही स्वत:ची स्वतंत्र चेंबर काढण्याएवढेसुद्धा पैसे त्याच्याकडे नव्हते. नोकरी करून इतके पैसे कसे उभे राहणार हा प्रश्न होता. नाही म्हणायला वारसा हक्कानं त्याच्या नावावर असलेला एक राजवाडा वल्लभपुरात होता. पण राजवाडा कसला तो! ‘खाप गेले आणि भोकं राहिली’ अशी त्या हवालदिल वाडय़ाची परिस्थिती. जीर्णशीर्ण झालेला. कोसळणाऱ्या भिंती सावरत कसाबसा उभा राहिलेला. स्टेशनपासून तीन मैलांवर आणि बाजार दोन मैलांवर! कुणाला काही झालं तर डॉक्टरसाठी ट्रेन गाठण्याशिवाय पर्याय नाही. हां! वाडय़ाची सात एकरची जमीन होती, हे खरं. पण त्या सातापैकी सहा एकर पडीक होती. अशी ही जीर्णशीर्ण पडीक वास्तू विकत तरी कोण कशाला घेईल? भूपती येईल त्या- कितीही कमी किमतीला हा राजा नसलेला वाडा द्यायला तयार होता. निदान वल्लभपूरच्या दुकानदारांचं त्याच्या नावावर असलेलं कर्ज तरी फिटलं असतं!
काही तरी व्यवहार ठरवून भूपती येणार असल्याचं कळतं तेव्हा सकाळीच वाडय़ावर साहू, श्रीनाथ, पवन या दुकानदारांचं मोठय़ा आशेनं आगमन होतं.
सकाळी सोफ्यावरच पाय दुमडून भूपतींना झोपलेलं पाहून त्या मनोहरला आश्चर्यच वाटतं. वर्षांनुवर्षे या वाडय़ाचा इमानदार नोकर असलेल्या मनोहरने भूपती येणार असल्याचे कळल्यानंतर रात्रीच त्यांचा बिछाना तयार करून ठेवला होता. पण भूपती तरी काय करणार? रात्री आल्या आल्याच त्याला रघुदांनी गाठलं आणि आपल्या कविता ऐकवायला सुरुवात केली. त्या कविता ऐकता ऐकता भूपतीला झोप केव्हा लागली, हे त्याला तर कळलं नाहीच, पण रघुदालाही कळलं नाही.
वाडय़ावर दुकानवाले येतात न येतात तोच पोस्टमन तार घेऊन येतो. तार म्हणजे नक्कीच कुणाच्या तरी निधनाची बातमी असणार! अशा वेळी पैशासंबंधी भूपतीला कसं विचारणार? सगळे आपले सहज आल्याचं भासवून मूग गिळून गप्प बसतात.
भूपती तार वाचून सांगतो, स्वप्नगंधा कॉस्मेटिकचे मालक हालदार वाडा बघायला येत आहेत. तार येते, तेव्हा फक्त एकाच्या मरणाचाच प्रश्न होता. पण आता कलकत्त्याहून वाडा विकत घ्यायला कुणी येत आहे म्हटल्यावर सगळय़ांचाच तो जीवन-मरणाचा प्रश्न होतो. साहू, श्रीनाथ, पवन यांची देणी मिळण्याचा तो एकमेव मार्ग होता. तेव्हा पाहुण्यांना जमीनदारीचा थाटमाट भासवण्यासाठी सगळेच मदतीला तयार होतात. टेबलक्लॉथ, चादरी आणण्याचं काम श्रीनाथवर सोपवण्यात येतं. जुन्या खुच्र्या झाकायला चादरी मोठय़ा लागणारच. पवन आपल्या दुकानातून सिगारेट्स आणि चिरूट आणेल, साहू टी सेट, अ‍ॅश ट्रे अशा उंची वस्तू घेऊन येईल, असे ठरते. पाहुणे कलकत्त्याहून रात्री येणार म्हणजे त्यांना ‘जेवून जा’ असं सांगावंच लागेल. मुख्य खानसामा व्हायची जबाबदारी मनोहर घेतो. पगडी आणि युनिफॉर्मची गरज आहे. मंडळींना वाडय़ात आणलं गेलं की, स्वयंपाकखोलीत जाऊन कपडे बदलायचं ठरतं. तीन माणसांत शाही थाट उडवून द्यायचा. पुलाव आणि मटण रोस्ट हा मेनू ठरतो. मटन रोस्ट म्हणजे बकरा कापायचा. स्वप्नगंधा कॉस्मेटिकचे मालक हालदार, याच तुम्ही!पाहुणे यायची वेळ झाली आहे. स्िंाहासन सजवलं आहे. खुर्चीवर गादी टाकली आहे. टेबलावर चादर घातली आहे. वेगवेगळय़ा भाडय़ाच्या वस्तूंनी सजावट केली आहे. मोडतोड सामान नाहीसं केलं आहे. मनोहरने युनिफॉर्म घातला आहे. पवनच्या डोक्यावरची पगडी जरा ढगळच होतेय. तो बंदूक घेऊन कसं चालायचं, ते शिकतोय. साहूनं, पवननं कुठे, कसं उभं राहायचं ते मनोहर सांगतो. एक मिशी आणलीय, पण ती आयत्या वेळी पडेल या भीतीनं कुणी लावून घ्यायला तयार नाही. सलाम करायची, दोरीनं घंटा वाजवायची तालीम केली जाते. पुकाराही केला जातो. आणि त्याच वेळी भूपतीचा मित्र संजीव टपकतो. त्याला हे सगळं काय चाललंय, हेच कळत नाही. त्याला बाजूला घेऊन सगळं सांगण्यात येतं आणि मोकळी राहिलेली मिशी लावून त्याला भूपतीचा म्हणजेच राजाबाबूंचा मॅनेजर केलं जातं.
हालदार येतात. पुकारा होतो. मनोहर त्यांना कुर्निसात करीत ‘बंदगी अमीर मेहमान! गरीब खाने में तशरीफ रखिये!’ म्हणतो. हालदार, म्युझियममधल्या वस्तू बघाव्यात तसा बघतो. त्याला प्रचंड कुतूहल वाटतं. इतिहासाची पानंच पुन्हा जिवंत झाल्याचा भास त्याला होतो. चुणीदार पायजमा व सदरा अशा वेशातल्या भूपतीशी हालदार हस्तांदोलन करतो. भूपती त्याचं सुहास्य वदनानं स्वागत करतो. हालदारांबरोबर त्यांची पत्नी स्वप्ना व कन्या छंदाही आली आहेत. एकूण वातावरण हालदारांना खूश होण्यासारखंच आहे. घराचं पडणारं छप्पर, टॉर्चचा प्रकाशझोत टाकल्याबरोबर एकदम उडणारी वटवाघळं, छताला आलेले पोपडे, कोसळणारी भिंत.. हालदारांना जुन्यात जुनाच वाडा विकत घ्यायचा आहे, कारण त्यांचा प्रतिस्पर्धी चौधरी आहे. आणि हा चौधरी प्रत्येक बाबतीत हालदारांवर कुरघोडी करणारा आहे. त्यानं नुकतंच दीडशे वर्षांपूर्वीचं जुनं घर विकत घेतलं आहे आणि त्यापेक्षाही जुनं घर आता हालदारांना हवं आहे, म्हणून तर ते एवढी पायपीट करून या वल्लभपुरात आले आहेत. भूपतीची समजूत होती की, त्यांना फार जुनं घर चालणार नाही, पण जेव्हा हालदारांचा उद्देश कळतो तेव्हा तो हा वाडा १५६१मध्ये बांधल्याचं ठोकून देतो. त्याबाबतची अकबराच्या काळातली ऐतिहासिक गोष्टही सांगतो. शिवाय या वाडय़ाला सात एकर जमीनपण साथीला आहे. (एक विकत घेतल्यास एक मोफत असंच म्हणा ना!) हालदार तर हा सगळा जुनाटपणा पाहून वेडेच होतात. चौधरीला पुरावा दाखवण्याचीही तयारी करतात आणि जेव्हा चौधरीही या वाडय़ाची विचारणा करीत होते, असं (थाप) भूपतीकडून कळतं तेव्हा १५ हजार रुपयांचा चेकच हालदार भूपतीच्या हातात ठेवतात. ही केवळ अर्धी किंमत आगाऊ दिल्याचं सांगतात. प्रामाणिक भूपती तर या सगळय़ा प्रकारानं एवढा वेडावून जातो की, तो हालदारांना आणखी कसले पैसे? नको, हीच पूर्ण किंमत आहे! असं सांगतो. हालदार आणि त्याचं कुटुंब आश्चर्यातच पडतं, पण हा त्यांचा खानदानी सचोटीपणा असेल, अशी ते स्वत:ची समजूत करून घेतात. दरम्यान मॅनेजर संजीव व छंदा याची गाठ पडते. छंदा तर संजीवच्या त्या खोटय़ा मिशांच्या प्रेमातच पडते. त्या प्रेमभरात संजीव या वाडय़ात रघुदा असल्याचंही सांगून टाकतो. भूपतीनं रघुदाचं काहीच सांगितलेलं नसतं. त्यामुळे रघुदा आता हयात नसल्याचं संजीवला माहीत नसल्याचं सांगतो. भूपती संजीवला त्याच्या मिशांसकट रजा घ्यायला सांगतो. गैरसमजुतीच्या, थापेबाजीच्या आणि ऐतिहासिक गोष्टीच्या सरमिसळीने हा प्रवेश तुफान रंगतो.
हालदारांकडून १५ हजार रुपयांचा चेक वाडय़ासाठी मिळाला म्हणून भूपती भयंकर खूश होतो. त्याच्या मित्राच्या, संजीवच्या गळय़ात, गळा घालून तो नाचायलाच लागतो. संजीवचीपण चेंबर काढण्याची आणि लोकांचे दात पटापट उपटण्याची इच्छा आता पुरी होणार असते. त्यातून हालदार मंडळी रात्री ११ वाजायच्या आतच घरी जायला निघते, यातच भूपतीने बाजी जिंकली होती. त्यामुळे त्याचा आनंद अधिकच फोफावतो. तरीपण हालदार आणखी १५ हजार देत होते ते भूपतीने का नाकारले, या प्रश्नाचं उत्तर संजीवला मिळतं तेव्हा त्याची घाबरगुंडीच उडते. या वाडय़ात गेल्या ४०० वर्षांपासून रघुदा नावाच्या ऐतिहासिक माणसाचा अतृप्त आत्मा फिरतोय आणि तो काव्यवेडा माणूस कालिदासाचे, जयदेवचे संस्कृत श्लोक सुरेल आवाजात गात भटकतोय. ही गोष्ट हालदारांपासून लपवून ठेवून परत त्यांच्याकडून आणखी १५ हजार रुपये घेणं भूपतीला अप्रामाणिक वाटलं होतं. संजीवला प्रथमश्रवणी ही रघुदांची गोष्ट एक रंजक स्टोरीच वाटते, पण प्रत्यक्ष रघुदांचं भीषण हास्य आणि संस्कृत श्लोक ऐकायला यायला लागतात तेव्हा तर त्याची बोबडीच वळते. त्यात भरीस भर म्हणून नेमके रात्री लवकर गेलेले हालदार त्यांच्या परिवारासह गाडी बंद पडली म्हणून परततात. त्यांनी या रघुदांना ऐकलं तर साराच बटय़ाबोळ व्हायचा. भूपती धावतच रघुदाला गप्प करायला जातो आणि तेवढय़ात हालदार मंडळी रात्रीच्या राहण्यासाठीच वाडय़ात प्रवेश करती होतात. त्याच्यात संजीवच्या नसलेल्या मिशांनी गोंधळ होतो. त्याच्या मिशांवर प्रेम करणारी छंदा हळहळते, पण मालकांच्या सांगण्यावरून त्या ताबडतोब छाटून टाकल्याची थाप संजीव ठोकून देतो. लहरी राजाबाबूंचा तसाच हुकूम झाला तर काय करणार? संजीव थाप घट्ट करतो. पडलेल्या मिशांची घट्ट थापेबाजी पटवता पटवता एकदम रघुदांचं भीषण हास्य ऐकू येतं आणि त्याबरोबरच कवितापठण. संजीवची तंतरतेच. पण त्याही परिस्थितीत ते रघुदांचं ते हसणं व काव्यगायन संजीव, लहरी भूपतीच्या नावावर फेकून देतो. अर्थात त्या भयानक हसण्याची आणि कवितापठणाची संगती हालदारांना लागत नाही, ती गोष्ट वेगळी! हालदारांना हा सगळा राजाबाबूंचा छांदिष्टपणाच वाटतो आणि १५ हजारांचा चेक नाकारण्याचं कारणही या छांदिष्टपणात ते जमा करतात.
भूपती सगळय़ांना झोपायला जायला सांगतो. रघुदांनी मध्येच काव्यगायन करायला सुरुवात केली तर काय करायचे हाच प्रश्न असतो. भूपतीचं तर ते काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. घाबरलेल्या संजीवला झोपायच्या खोलीपर्यंत पोचवायला म्हणून भूपती जातो आणि इतक्यात रघुदांचं गायन सुरू होतं. संजीवला तसाच एकटा टाकून भूपती रघुदाला समजावण्यासाठी निघून जातो आणि टरकलेल्या संजयसमोर छंदाच येऊन उभी राहते. राजाबाबूंच्या सुरेल कविता ऐकायला ती खोलीबाहेर पडली आहे. पुन्हा काव्यगायन ऐकू  येते आणि छंदा त्यात धुंद होते. एखादा शापित आत्माच वाडय़ात फिरतोय, असंच तिला वाटतं. रघुदा हे राजाबाबूंचे जवळचे नातेवाईक असून त्यांच्याच मृत्यूमुळे ते दु:खी झाले आहेत व ते संस्कृत श्लोक म्हणताहेत, असाच छंदाचा समज झालेला आहे. संजीव तिकडून कसाबसा पळ काढतो. एकटय़ा राहिलेल्या छंदाला स्िंाहासनाच्या मागून धूर येताना दिसतो. त्या धुरातून भूपतींसारखेच दिसणारे मुकुट व राजेशाही पोशाख परिधान केलेले रघुदा दिसतात. त्यांना पाहिल्यावर छंदा राजाबाबू म्हणून हाक मारते, तर रघुदा एकदम संस्कृत श्लोकच सुरू करतात. छंदा मंत्रमुग्ध होऊन बघत राहते. रघुदांकडे जात राहते. रघुदा जयदेवचे श्लोक सुरू करतात आणि तेवढय़ात स्वप्ना येऊन छंदाला आवरते. पाठीमागे घेते आणि आत जायला सांगते. राजाबाबू भरजरी पोशाख व मुकुट परिधान करून आपल्या मुलीला भुलवत आहेत, असाच तिचा समज होतो. ती रघुदांना (भूपती समजून) चांगलीच फैलावर घेते. हालदारांना पाहिलेला प्रसंगही ती सांगते. ‘केवळ १५६१ सालातला वाडा मिळाला, म्हणून हुरळून जाण्याऐवजी जरा मुलीकडे लक्ष द्या,’ असा दमही ती नवऱ्याला देते. हालदार राजाबाबूच्या शोधात तर राजाबाबू म्हणजे भूपती रघुदांच्या शोधात. भूपती समोर आल्यावर तर इतक्या झटकन हा कपडे बदलून कसा काय आला याचंच आश्चर्य स्वप्नाला वाटतं, पण हालदारांनाही भूपतीसारखा माणूस व्हरांडय़ात पगडी, जरीदार जाकीट वगैरे घातलेला दिसतो. भूपती ‘तो मीच’ असल्याचं सांगतो व झोपेत मला असं फिरण्याची सवय असल्याचंही सांगतो. पगडीवाला आपणच असल्याची थाप पचत नाही. ‘उलट मुलीपेक्षा तुम्हाला घराचंच महत्त्व अधिक वाटतं,’ असा स्वप्ना हालदारावर आरोपच करते. अखेरीस ते रघुदा असल्याचं भूपतीला सांगावं लागतं. ते आपले पूर्वज असून ते १५६१ साली बांधलेल्या या वाडय़ात १५८७ पर्यंत राहत होते. रघुदा एक भूत आहेत, हे कळल्यावर तर हालदारांना अधिकच आनंद होतो. कारण त्यांच्या प्रतिस्पध्र्यानं घेतलेला वाडा जुना असेलही, पण त्याच्या वाडय़ात या घरासारखं भूत कुठं आहे? या रघुदांच्या भुतामुळे हालदार, चौधरीवर एका अधिक वैशिष्टय़ाने कुरघोडी करू शकत होते. भूत असूनही या वाडय़ाला आपण कमी पैशांत विकत घेतो याची चुटपुट हालदारांना लागते. ते भूपतीला ४० हजार रुपयांचा आणखी एक चेक देऊ करतात. पुढच्या आठवडय़ात चौधरीला इथे घेऊन यायचं आणि त्याला या जुन्या वाडय़ासकट भूतही दाखवायचं, असा हालदारांचा बेत असतो. पण त्या बेताला हालदारांची पत्नी मोडताच घालते. कुठल्याही परिस्थितीत हा वाडा विकत घ्यायचा नाही, असं ती ठामपणे हालदारांना सांगते. हालदार हतबल होतो. भूपती त्यांचा चेक त्यांना परत देतो. आणि तो रघुदांना म्हणतो, ‘हे घर अखेपर्यंत तुमचं आणि माझंच राहणार. तुम्ही कविता म्हणा- मीही कविता गातो.’
रघुदा व भूपती हे वेगवेगळे आहेत, यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. त्यामुळे भूपतीवर मात्र छंदाला भुलवण्याचा नाहक आळ घेतला जातो. हा म्हणजे भूपतीच्या चरित्र्यावरच शिंतोडे उडवण्यासारखा प्रकार. संजीवला ते अपमानकारक वाटतं. तो सर्वाना रघुदांना दाखवायचं आश्वासन देतो. रघुदा दिसले तर भूपतीची माफी मागण्याची स्वप्नाबाईची तयारी असते. एक दिवसानंतर हालदार आणि मंडळींनी रात्री दहा वाजल्यानंतर या घराला भेट द्यायचं नक्की होतं. तेवढय़ा अवधीत चौधरी घर घ्यायला आला तर त्याला ते दिलं जाणार नाही, असं  वचन हालदार भूपतीकडून घेतात. परवाच्या रात्री हालदार मंडळीचं, रघुदांचं आणि वल्लभपूरच्या या गूढ वाडय़ाचं काय होतं, तेच बघायचं!
रात्रीचे दहा वाजतात आणि हालदारांऐवजी चौधरीच वाडय़ात टपकतो. तो भूपतीकडे सगळी चौकशी करतो. हे घर चारशे वर्षांपूर्वीचं आहे आणि हालदारांनी त्यासाठी ४० हजार रुपये देऊ केलेत, असं भूपती चौधरींना सांगतो. त्याच वेळी हालदार मंडळींचंही आगमन होतं. त्या वेळी हालदार चौधरीला स्पष्टच सांगतो की, तू विकत घेतलेलं घर कदाचित यापेक्षाही जुनं असेल, पण त्यात भूत आहे का? चौधरीला हसूच येतं. भूतासारख्या भाकडकथांवर विश्वास ठेवण्याजोगा चौधरी शामळू नव्हता. हालदारला त्या भुताचं दर्शन चौधरीला घडवायचंच होतं. पण चौधरी मात्र त्या भूतकथेची सारखी चेष्टाच उडवत राहतो. ११ वाजायला काही मिनिटंच उरतात आणि रघुदा येणार नसल्याचं कळतं. त्याला समजवायला भूपती जातो. तेव्हा तो कपडे बदलायला गेला असावा असं स्वप्नाला वाटतं. चौधरींनी रिव्हॉल्व्हर आणलेलं असतं. ते पाहूनच रघुदा घाबरले असतील असाही एक सूर निघतो. इतक्यात वादळ व्हावं तसा आवाज येतो. सिंहासनामागून धूर येतो. धुरातून मुकुटधारी, राजेशाही पोषाखातले रघुदा अवतरतात. चौधरीच्या अंगावर येतात. चौधरी  त्याच्या अंगावर रिव्हाल्व्हरच्या पाच सहा गोळय़ा झाडतो. पण रघुदांना काहीच होत नाही. चौधरी घाबरून थरथर कापायला लागतो. घाईघाईने संजीव येतो व चौधरींना रघुदांपुढे नाक घासायला लावतो. रघुदा तलवारीच्या एका टोकाने चौधरीला नाक घासण्याच्या अवस्थेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरवतात. ‘मुक्ती मुक्ती’ असं ओरडत रघुदा सिंहासनाच्या मागे जातात आणि अदृश्य होतात.
चौधरी बेशुद्ध पडतो. थोडं पाणी शिंपडल्यावर चौधरी शुद्धीवर येतो. तर समोर भूपती उभा. त्याला रघुदा समजून चौधरी परत त्याच्यासमोर नाक घासतो. भूपती, रघुदा नाहीत हे त्याला सांगितलं जातं तेव्हा तो शरमतो आणि निघून जातो.
इंद्रनारायणाच्या वंशजानं नाक घासल्यानंतरच रघुदांना मुक्ती मिळायची असते. चौधरी इंद्रनारायणाचेच वंशज असतात. ते हालदारांवर कुरघोडी करण्यासाठी म्हणून या बंगल्यात येतात आणि आयतेच रघुदांना सापडतात.
यानंतर बऱ्याच घटना घडतात, सांगायची गोष्ट म्हणजे हालदारांच्या कन्येनं म्हणजेच छंदानं राजाबाबूंशी म्हणजे भूपतीशी लग्न केलंय. भूपतींना सुरेल आवाजात संस्कृत श्लोक येत नसताना आणि कालीदास माहीत नाहीत हे ठाऊक असतानाही छंदा भूपतीची कायमची सहचारिणी होते, ही दंतकथा मात्र नव्हे. खरीखुरी दंतव्रणांची कथा.
या घटनाप्रधान नाटकाची लपालपी आणि एकमेकांवर आपटणारी छपाछपी प्रत्यक्ष बघण्यातच खरी गंमत. दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी कुठेही अतिरिक्त आंगिक अभिनयाचा वापर न करता या नाटकाला फार्स होण्याच्या धोक्यापासून वाचवलं. त्यामुळे निखळ विनोदी आविष्काराचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला. विनोदी नाटकातील आदबशीरपणा कसा असावा, याचं प्रात्यक्षिकच एकनाथ हट्टंगडीच्या हालदारांनी पुढे ठेवलं. काही काळानंतर चित्रपटांतून दिसणाऱ्या भोळय़ा-भाबडय़ा अमोलचं हे नाटकातलं दर्शन असावं. स्वप्नाचा ठसा रेखा सबनीसने उत्तम ठसवला. विनोदी दोशींनी छोटी चौधरीची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली.
(१९७२ च्या सुमारास साहित्य संघाने हेच नाटक वेगळय़ा कलावंतांसह व्यावसायिक रंगमंचावर आणलं होतं. दामू केंकरे यांनी त्याचं दिग्दर्शन केले होते. कमलाकर सारंग, लालन सारंग, दाजी भाटवडेकर, ललिता केंकरे, भाऊ बिवळकर, बाळ बापट, चंदू डेगवेकर, आणि एलिस रामराजकर असा कलाकारांचा संच होता.)

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…