चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची चित्रं त्यांच्या निधनानंतर काही कोटींना विकली गेली. त्यामुळे त्यांचं नाव जगभरच्या कलाप्रेमींना परिचित झालं. पण गायतोंडे त्यांच्या हयातीत मात्र फारसे कुणाला परिचित नव्हते. त्यामुळेच त्यांच्याविषयी अनेकांना कुतूहल आहे. ते शमवणारं गायतोंडे यांच्यावरील पुस्तक लवकरच चिन्ह प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांचा हा संपादित लेख..
१९६१ च्या उन्हाळ्यातली गोष्ट. एक दिवस काही कारणानं मी भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये गेलो होतो. तिथं गायतोंडेंचा स्टुडिओ होता. मी त्यांना एका बेंचवर बसलेलं पाहिलं. मी जवळ गेलो, त्यांच्याकडे बघून हसलो. आणि ‘हॅलो’ म्हटलं. आमची ओळख नव्हती तरी मी त्यांना आधी बरेचदा पाहिलं होतं, तसं त्यांनीही मला त्या वेळी पाहिलं असणार कदाचित. कारण तेही हसले. मला धीर आला आणि मी म्हटलं, ‘गायतोंडेसाब, मी लक्ष्मण श्रेष्ठ, मीसुद्धा पेंटर आहे. तुम्हाला भेटण्याची इच्छा होती.’ त्यावर ते म्हणाले, ‘ये, ये, बस इथं.’ ते असं कधीच कुणालाही म्हणाले नव्हते तोपर्यंत असं मला नंतर त्यांच्याकडून आणि इतरांकडून कळलं. तर त्या दिवशी मी त्यांच्या शेजारी बेंचवर बसलो. तळमजला होता, समोर थेट समुद्र पसरलेला होता आणि सूर्य मावळत होता. त्या वेळी अधेमधे कोणत्याही इमारतीचं बांधकाम नव्हतं. अथांग समुद्र दिसत होता. आणि ते टक लावून तिकडे पाहत होते. मीसुद्धा पाहायला लागलो. हलक्या लाटा, त्यावरचा लाल संधिप्रकाश.
आम्ही बराच वेळ असे बसून होतो. सूर्य मावळून काही वेळ झाला मग ते म्हणाले, ‘चल वर.’ वरती त्यांचा स्टुडिओ होता, तिथंही थोडा वेळ मी बसलो. मग निघून होस्टेलला परतलो. निघताना ते मला ‘उद्या ये पुन्हा’ म्हणाले होते, म्हणून मी पुन्हा गेलो. त्यानंतर अनेकदा गेलो. ठरावीक वेळी ते मला त्यांच्या स्टुडिओवर बोलवायचे.
माझ्या आत एकटेपणा भरून होता. मी तो नाकारत होतो. घरापासून दूर, अस्थिर आयुष्य जगत असताना मला हा एकटेपणा वागवण्याचा भार पेलला नसता. पण गायतोंडेंसोबत मला तो शेअर करता आला. एकटेपणाकडे पॉझिटिव्हली बघायला मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्यामुळे मला जीवन कळत होतं. जीवन म्हणजे कला, संगीत, नृत्य, उत्तम जगणं हे आणि त्याहीपलीकडचं जे मग चित्रात येतं हे ते मला शिकवत होते, माझ्याही नकळत.
गायतोंडे त्यानंतर दिल्लीला गेले, कारण त्यांना इथं मुंबईत राहायला जागा नव्हती. बाळ छाबडाचा नेपियन-सी रोडवर फ्लॅट होता तिथं ते दोन र्वष राहिले. पण मग बाळला त्या फ्लॅटची गरज भासली तेव्हा त्यानं त्यांना तो सोडायला सांगितला. मग गायतोंडे हरकिशनलालच्या जागेत राहायला गेले. तिथं छत गळायचं, त्यामुळे सीिलगवर आणि िभतीवर पॅटर्न्‍स तयार झाले होते. गायतोंडेंनी त्यावर स्केचिंग केलं. पूर्ण िभत भरून त्यांची स्केचेस होती. फार सुंदर दिसायचं ते. पण मग तोही फ्लॅट त्यांना सोडावा लागला. त्यांचं असं इकडेतिकडे राहणं चालू होतं. घर नव्हतं त्यामुळे ते कंटाळले. मग कोणी तरी त्यांना सांगितलं दिल्लीला ये राहायला. तिथं जागा स्वस्तात मिळतात. तीनशे रुपयांमध्ये बरसाती मिळू शकते, पूर्ण मजला. हे ऐकल्यावर त्यांनी तिकडे जायचं ठरवलं. त्या दिवसांमध्ये पेंटर्सना अभावग्रस्त अवस्थेत राहणं काही वावगं वाटायचं नाही. आपण पेंटर आहोत त्यामुळे आपलं आयुष्य खडतर असणार हे त्यांनी स्वीकारलेलं होतं. पेंटिंग्जवर भरपूर पसे मिळायला नंतर खूप उशिरा सुरुवात झाली.
गायतोंडेंचा मूड लागला की ते मी बसलेला असताना, किंवा काही करत असताना माझी स्केचेस करायचे. त्यांच्या रेषांमध्ये विलक्षण लय होती. मी ती त्यांच्याकडे मागायचो. मूड असेल तर देऊन टाकायचे नाही तर फाडून टाकत असत. ते राहायला आले की मला खूप आनंद व्हायचा. आम्ही लांब लांब पायी फिरायला जायचो. समुद्रावर जायचो. मुंबईतलं वातावरण, असा समुद्र दिल्लीत नव्हता. ते हे मिस करत होते. आमच्यात नेमके ‘संवाद’ काय व्हायचे याबद्दल मी काही वेळा विचार करतो. तय्यबसोबत जो संवाद होता तसा माझ्यात आणि गायतोंडेंमध्ये होता का? त्यांचं वाचन खूप होतं. त्यांना खूप गोष्टींबद्दल सखोल माहिती होती. त्याबद्दल ते काही वेळा बोलायचे. पण त्यांची बोलण्याची गरजच खूप कमी होती. मला वाटतं की गायतोंडेंचं हे वेगळेपण होतं. त्यांचा सगळा शोध, त्यांना जे सापडत होतं ते एकांतात होतं. अनेक गोष्टी शेअर केल्या. कितीही चर्चा केल्या, वाद घातले, संवाद केला तरी शेवटी या सगळ्यातून तुम्हाला जे मिळतं ते तुम्ही एकटे असता तेव्हाच तुमच्यापर्यंत येऊन पोचतं. तसा एकांत तुम्हाला काही कारणानं मिळू शकला नाही तर ते वाहून जातं. हेच कारण होतं, म्हणूनच गायतोंडेंनी कधी एखाद्या विषयावर उगीचच गप्पा करण्यात वेळ वाया घालवला नाही.
मी दिल्लीला जायचो तेव्हा फक्त गायतोंडेंना भेटायचो. त्यांचं प्रॅक्टिकल जगणं, वागणं मी मिस करायचो, त्यामुळे मला त्यांच्याकडेच जावंसं वाटे. गायतोंडे मला रमणमहर्षीच्या आश्रमामध्ये नेत. खूप निसर्गरम्य, शांत जागा. त्यानंतर मग मोठय़ा हॉटेलात ड्रिंक आणि लंच. या सगळ्याचा खर्च ते स्वत: करत. मी हक्कानं ते त्यांना करू देत होतो. मग आम्ही त्यांच्या बरसातीत यायचो. तिथं स्टुडिओ कम राहायची जागा होती त्यांची. तिथं एक आरामखुर्ची होती. ते एक लुंगी नेसायचे, एक लुंगी आरामखुर्चीवर पसरायचे आणि मग त्यावर एकदा बसले की तिथून हलायचे नाहीत. त्यांच्याकडे म्युझिकचं उत्कृष्ट कलेक्शन होतं. रेकॉर्ड प्लेयर लावला जायचा. ‘लक्ष्मण, झोप इकडे कॉटवर,’ मला सांगायचे. पण कॉटवर त्यांच्या अनेक गोष्टी पसरलेल्या असायच्या. त्यांना हात न लावता मी जमिनीवर चटई पसरून त्यावर पडायचो. त्यांचे डोळे बंद असायचे. मला वाटायचं, त्यांना डुलकी लागली आहे. पण अचानक थोडा वेळ झाला की ते उडी मारून आरामखुर्चीतून उठायचे आणि त्यांची लायब्ररी होती त्यासमोर उभे राहायचे. त्यातून कुराण, बायबल, असं काही तरी काढायचे, ओळी वाचून दाखवायचे. वेगळंच असायचं ते, कधी ऐकलेलं नसायचं. ‘लक्ष्मण, यू मस्ट रीड धीस,’ असं म्हणत कधी कधी ते मला मोठय़ानं वाचायला सांगायचे. काही ओळी वाचून झाल्या की म्हणायचे, थांब. खूप स्ट्राँगली काही तरी सांगावंसं वाटलं तर ते एक्सप्लेन करायचे, नाही तर मग नुसतंच मौन. त्यांच्या तोंडून येणारे शब्द एखाद्या ऋषीच्या तोंडून यावेत असे होते.
काही वेळा वैयक्तिक बोलणं व्हायचं. ते स्वत:बद्दलही बोलायचे. काही लहानपणातल्या गोष्टी सांगायचे. त्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी कधी कोणासमोरही उच्चारलेल्या नव्हत्या. खासगी तपशील होते ते. लहानपणाबद्दल, वडिलांबद्दल, मित्र-मत्रिणींबद्दल ते अलिप्तपणे सांगायचे. मला काही वेळा काय प्रतिक्रिया व्यक्त करायची ते कळत नसे. आणि त्यांनाही ती तशी नकोच असायची हे मला माहीत होतं. ते शांतपणे सांगायचे, मी शांतपणे ऐकायचो. मी गायतोंडेंच्या वातावरणात पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हाच मला जाणवलं की या माणसाला एकटेपणा हवा आहे.
गायतोंडे खरंच एक ग्रेट अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटर होते हे विसरून चालणार नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्याची किंवा न बोलण्याची समीक्षा करताना. पेंटिंगमध्ये किंवा आयुष्यात एकही जास्तीची, गरज नसलेली गोष्ट आली की ते बिघडतं असं एकदा ते म्हणाले होते. एकही डॉट जास्त नको किंवा कमी नको. पण त्याकरता सगळ्या क्लटरमधून एक एक गोष्ट एलिमिनेट करत न्यावी लागते. शेवटी जे शिल्लक राहतं तो एसेन्स किंवा गाभा. अ‍ॅब्स्ट्रक्ट आर्टबद्दल आम्ही बोलायचो. वेस्टर्न आर्टस्ट्सिची चर्चा करायचो. त्या वेळी खूप कमी आर्टस्टि अ‍ॅब्स्ट्रक्टकडे सुरुवातीपासून वळलेले होते. मला कलेच्या संदर्भात काही प्रश्न पडत. वाचत असे त्यातले काही विचार माझ्या डोक्यात असत. ते मी त्यांच्यासोबत शेअर करायचो. ते एखादं वाक्य उच्चारत आणि मला तेवढय़ावरूनही माझ्या मनातल्या विचारांची पक्की दिशा समजे.
आपण कायम दिल्लीलाच राहू असं गायतोंडेंना कधी वाटलं नव्हतं. मुंबई ते मिस करायचे आणि त्यांना इथं परतायचं होतं हे नक्की. ममता – त्यांची मत्रीण हे कधी मान्य करणार नाही, पण मला माहीत होतं. अपघात झाल्यावर मात्र ते खूप बदलले. त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनात काही मूलभूत बदल झाले. ते मनानं एकटे होतेच, आता एकाकीही झाले. पण अपघातानंच हे बदललं असं नाही. त्याआधीही काही महिने हे बदल मला जाणवले होते. गायतोंडे मुंबईला आले की आमचं रूटीन होतं तसंच होतं. लंच, सिनेमा. पण मुंबईही खूप बदलत होती. आता मेट्रो, रिगल किंवा इरॉसमध्ये जाण्यात पूर्वीसारखी मजा नव्हती. मग ते आणि मी घरीच जास्त वेळ गप्पा मारायचो किंवा बॅण्डस्टॅण्डपर्यंत, बीचवर लांबवर चालत जायचो.
एकदा गायतोंडे त्यांची मत्रीण ममता सरनसोबत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये फिल्म पाहायला गेले होते. बऱ्याचदा जायचे ते तिथं. संध्याकाळी साधारण साडेपाच-सहा वाजता फिल्म संपली. त्यांना नंतर अजून एका ठिकाणी जायचं होतं. त्यासाठी रस्ता ओलांडायचा होता. खूप रहदारी होती रस्त्यावर. गायतोंडे उंचीनं कमी होते, त्यामुळे रस्ता ओलांडणं त्यांच्याकरता कायमच एक कठीण गोष्ट होती. नव्‍‌र्हस व्हायचे ते रस्ता ओलांडायची वेळ आली की. आणि मग इकडं, तिकडं कुठंही न पाहता ते वेगानं धावत जात, दोन्ही बाजूंनी गाडय़ा येताहेत वगरे काहीही न पाहता. त्या दिवशीही ते असेच वाहनांच्या गर्दीत शिरले आणि एका वेगानं येणाऱ्या ऑटो रिक्षानं त्यांना जोराची धडक दिली.
नशिबानं ममता सोबत होती, त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं. पण त्यांची अवस्था इतकी वाईट होती की सगळ्यांना वाटलं की आता गायतोंडे काही वाचणार नाहीत. ममताला तर वाटलं हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कवटीला जोराचा मार लागला होता, अक्षरश: डोक्यातून ती बाहेर आली होती. खांदा तुटला होता, हात मोडले होते, पाय वेडेवाकडे दुमडले गेले होते. खूपच वाईट अवस्था होती. ममताला काहीच सुचेना.
गायतोंडे त्या वेळी वाचले हे आश्चर्य, असं डॉक्टरांनी नंतर बोलून दाखवलं. हळूहळू ते सुधारत गेले, पण पूर्वीसारखे मात्र कधीच होऊ शकले नाहीत. ते अशक्यच होतं.
साधारण वर्ष झालं आणि गायतोंडेंचा चेहरा अचानक खूप काळा पडायला लागला. औषधांचाही दुष्परिणाम असावा. या सर्व काळात मी जमेल तसं त्यांना जाऊन भेटत होतो. ते फारसे कधी अपघाताबद्दल बोलायचे नाहीत. अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्येही ते कधी खचले आहेत असं जाणवलं नाही. मात्र खूप शांत असायचे. पूर्वीपेक्षाही शांत. त्यांची त्या काळातली शांतता आध्यात्मिक योग्यासारखी वाटायची. थोडं चालता यायला लागल्यावर ते जवळच असलेल्या रमणमहर्षीच्या आश्रमात जायला लागले. तिथं ते खूप वेळ असत.
गायतोंडे पुन्हा त्यांचं रोजचं आयुष्य जगायला लागले. मात्र काही बदल अपरिहार्यपणे झाले होते. त्यांची राहती जागा या मधल्या काळात जास्त मोडकळल्यासारखी, जास्त जुनी दिसायला लागली होती. मी आणि सुनीतानं त्यांच्यासाठी लावून दिलेले कॅनव्हास धूळ खात पडले होते. त्यांतले दोन त्यांनी आधी रंगवले होते. उरलेले दोन तसेच पडून राहिले. गायतोंडे जास्त लहरी, थोडे चिडचिडेही झाले होते. कदाचित त्यांची सहनशक्ती कमी झाली होती म्हणून किंवा ते बोलून दाखवत नसले तरी त्यांना शारीरिक त्रास निश्चित होत असावा काही तरी. कधी कधी त्यांचं वागणं विचित्र असायचं. त्याचा त्यांना स्वत:लाच त्रास व्हायचा. समजा, डॉक्टरांची अपॉइंमेंट सातची असेल, तर ते पावणेसातच्या आधीच जाऊन वाट बघत बसत. आता कोणताच डॉक्टर कधी दिलेल्या वेळेला शार्प तुम्हाला बघू शकत नाही. इतर पेशंट्स बघताना कमी-जास्त वेळ होतोच. सव्वासात-साडेसात झाले की मग ते उठून निघून येत. नुकसान त्यांचंच व्हायचं यात. उपचारांमध्ये खंड पडायचा.
ते संपूर्ण बरे कधी होऊ शकले नाहीत त्यामागे अशीही कारणं होती. त्यांची प्रकृती नाजूक होत गेली. वजन खूप कमी झालं होतं. कारण त्यांना चावून खाता येत नसे, गिळायलाही त्रास व्हायचा. मान कललेली असल्याने घास नीट तोंडात घालता यायचा नाही. गायतोंडेंना त्यामुळे जेवताना कोणी आसपास असलेलं आवडेनासं झालं. ते सरळ त्या व्यक्तीला बाहेर घालवायचे. मी गेलो नसतो हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते मला कधी असं म्हणाले नाहीत. पण मी त्यांना संकोच वाटू नये म्हणून हातात मासिक-पुस्तक धरून बसे. अन्न कधी कधी कुस्करून द्यायचो म्हणजे त्यांना गिळायला सोपं पडेल, पण त्यांना ते आवडायचं नाही. त्यांना शारीरिक बाबतीत कोणी कसलीच मदत केलेली आवडायची नाही. सुनीता असली की ती त्यांना सूप वगरे द्यायची. आम्ही मिळून त्यांची खोली साफ करायचो, धूळ पुसायचो. पुस्तकं, वस्तू लावून द्यायचो. त्यांची काळजी घ्यायला तिथं राहावं असं वाटे, पण ते शक्य नव्हतं. त्यांना मुंबईत परतायचं होतं असं ते अनेकदा म्हणत; मात्र चला जाऊ या असं म्हटलं की ते काही तरी कारणं द्यायचे. माझ्याकडेच या आणि राहा, असा हट्ट केला की मी ठीक आहे असं म्हणत. एरवी आले असते पण आता बरं नव्हतं त्यामुळे ते मुद्दाम यायचं टाळत होते हे मलाही कळायचं. कदाचित त्यांच्यात प्रवास पेलायचं धर्य नव्हतं. आणि नंतर तर मग अशक्यच झालं.
तसं खूप कोणी नव्हतंच त्यांना जवळचं. लोकांना भेटण्याचं त्यांनी खूप पूर्वीच बंद केलेलं होतं. अपघातानंतर बरीच र्वष त्यांचे डोळे सतत लालभडक राहत. एक दिवस मला एका आयड्रॉपचं नाव कळलं. मी दिल्लीला गेलो आणि त्यांना घेऊन ऑटो रिक्षानं जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो. मला तिथं ते मिळालं आणि दुकानातच मी ते त्यांच्या डोळ्यांत घातलं. त्यांना सांगितलं की आता जरा वेळ डोळे बंदच राहू देत. मग त्यांच्या हाताला धरून मी रिक्षातून पुन्हा त्यांना घरी नेलं आणि मग त्यांना डोळे उघडायला सांगितलं. डोळ्यांतली सगळी लाली उतरली होती. त्यांनी लहान मुलाच्या उत्सुकतेनं पुन:पुन्हा आरशात डोळे बघितले. खूश झाले होते ते. किती तरी र्वष लालभडक असलेले त्यांचे डोळे पुन्हा पहिल्यासारखे झाले. मग आम्ही लहानसं सेलिब्रेशनही केलं.
गायतोंडेंचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यसंस्काराला पाच-सहाच लोक होते. अनेक जण नंतर म्हणतात की कलाजगतात इतकं महत्त्वाचं स्थान असलेल्या गायतोंडेंना ते गेल्यावर कोणी बघायला गेलं नाही वगरे. मला असं वाटतं की यामुळे खरंच फरक पडतो का? लक्षात घ्या की जी पाच-सहा माणसं त्या वेळी होती ती गायतोंडेंना हवी असलेलीच होती, जी त्यांच्या आसपास ते असतानाही होती. किती लोक आले, कोण आले नाहीत याचा त्यांना काही फरक पडला नसता. हजारोंच्या संख्येनं अंत्यसंस्काराला गर्दी करणाऱ्या माणसांमध्ये किती जण खऱ्या आपुलकीनं आलेले असतात? किती जण इतरांना दाखवायला आलेले असतात? गायतोंडेंना अशा लोकांची गर्दी मेल्यावरही आसपास कधीच आवडली नसती. इतकं शांत, एकटं आयुष्य जगलेल्या माणसाला मृत्यूनंतरचा कोलाहल कसा सहन झाला असता? गाय वुड हॅव हेटेड इट. ते शांत, एकटे जगले आणि तसेच गेले.