ज्येष्ठ कादंबरीकार रामचंद्र नलावडे यांची ‘कुरण’ ही कादंबरी लवकरच लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने लेखकाने स्वत:च्या लेखन प्रवासावर टाकलेला एक धावता दृष्टिक्षेप..
मा झा जन्म एका उपेक्षित भटक्या-विमुक्त या जातीत झाला असल्यामुळे लहानपणी जनावरापेक्षाही हीन जीवन जगणं माझ्या वाटय़ाला आलं होतं. कुणालाही त्यांच्या बालपणाच्या आठवणी रम्य, गोड वाटतात. परंतु मला मात्र त्या आठवणी अगदी नको वाटतात. त्या आठवणींनी माझ्या अंगावर भीतीने सर्रकन काटा उभा राहतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या जन्मदात्या आई-वडिलांनी मला मराठी शाळेत घातलं. त्यामुळेच मी लिहू-वाचू लागलो.
२० वर्षांपूर्वी मराठी साहित्याचा परिसस्पर्श झाला आणि माझ्या काटेरी जीवनात ‘अमृतकुंभ’ गवसल्यासारखा मला आनंद झाला. माझ्या समाजात आधीच्या पिढय़ांमध्ये शिक्षणाचा, साहित्याचा कुणालाही गंध नव्हता. १९९४च्या सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे माझा पहिला-वहिला ‘जोगवा’ हा कथासंग्रह मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध झाला. सह्य़ाद्री दूरदर्शन वाहिनी आणि स्थानिक वर्तमानपत्रातून त्याच्या फोटोसह बातम्या झळकल्या. त्यामुळे मला पुढे लेखन करण्यासाठी आणखी बळ मिळालं.
पुढे महसूल खात्यात, तारेवरची कसरत करत नोकरी संभाळून ‘दगडफोडय़ा’ आणि ‘झगडा’ ही दोन आत्मकथनं लिहून प्रसिद्ध केली. माझ्या या आत्मकथनांना प्रतिष्ठेच्या दमाणी पुरस्कारासह आणखी चार पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांनी ‘दगडफोडय़ा वडारांच्या भाळी लिहिलेली अखंड भ्रमंती’ नावाचे शीर्षक देऊन विस्तृत परीक्षण लिहिलं. त्यामुळे मी अगदी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात लेखक म्हणून ओळखला जाऊ लागलो. आत्मकथनं आवडल्याबद्दल सर्व स्तरातील वाचकांची पत्रं आली. त्यामुळे माझ्या दुखऱ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. त्याचवेळी मी लेखन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगायचं, असं माझ्या मनात ठरवूनच टाकलं होतं. लेखन करणं एकवेळ सोपं आहे, परंतु ते प्रसिद्ध करणं जिकिरीचं आणि त्रासाचं आहे, हे मला पुढे पुढे कळत गेलं. परंतु त्यासाठी वाटेल त्या खस्ता खाण्याची मनाची आधीच तयारी करून ठेवली होती.
अगदी प्रांजळपणे कबूल करतो की, माझ्या आयुष्यात संकटांनी कधीही माझी साथ सोडली नाही, आणि यापुढे सोडतील असंही मला वाटत नाही. मिळमिळीत, रटाळ आयुष्य माझ्या वाटय़ाला कधी आलं नाही. त्यामुळे मी नेहमी अस्वस्थ असे. या अस्वस्थपणाचा विसर पडून थोडं सुख वाटय़ाला यावं, म्हणून मी लेखन करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिलं.
दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।।
माझं जगणंसुद्धा नेमकं असंच होतं.
सुदैवाने मला निसर्गाचं वरदान असलेल्या आणि महाराष्ट्रात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात शासनाच्या महसूल या खात्यात ग्रामीण भागात नोकरी मिळाली, त्यासाठी मी स्वत:ला खूप मोठा भाग्यवान समजतो. याचा मला फायदा असा झाला की, माझा हात सदैव लिहिता राहिला. खेडेगावातील दारिद्रय़ाने पिचलेल्या लोकांचं जगणं मी माझ्या डोळ्यांनी अगदी जवळून रोज पाहात होतो. त्यांचं दु:ख, यातना, अडीअडचणी यात सहभागी होऊन त्या कमी करण्यासाठी माझ्या परीने प्रयत्नसुद्धा करत होतो. सामान्य लोकांचं डोळ्यांनी पाहिलेलं दु:ख कथा-कादंबऱ्यांतून मांडू लागलो. नाही तर अन्य दलित लेखकांप्रमाणे माझी आत्मकथनं प्रसिद्ध झाल्यावर लिहायला काही सुचत नाही म्हणून मलासुद्धा थांबावं लागलं असतं. सुदैवाने, ती वेळ माझ्यावर आता आली नाही आणि यापुढेसुद्धा येणार नाही.
‘लाडी’, ‘पातेरा’, ‘प्रहार’, ‘चंदनवाडी’ आणि ‘थैमान’ या माझ्या पाच कादंबऱ्या एकामागून एक अशा प्रसिद्ध झाल्या. त्यांना मानाचे पुरस्कार लाभले.  तीन-चार कादंबऱ्या दर्जेदार प्रकाशकांकडून प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ‘जोगवा’, ‘सुरुंग’, ‘गावकुसाबाहेरील माणसं’, ‘घरकुल’, ‘चिरेखाण’ आणि ‘अशी पाखरे येती’ इत्यादी सहा कथासंग्रह माझ्या नावे प्रसिद्ध झाले आहेत.
 ‘वडारगाडा’ या माझ्या संशोधन ग्रंथाला यंदाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्य पुरस्कार मिळाला आहे. ‘माझ्या मना बन दगड’ हे माझं अनुभवकथन लोकवाङ्मय गृहतर्फे २०१२ मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
महसूल खात्यात मी तीन दशकांहून अधिक काळ नोकरी केली, परंतु त्या कोंदट बजबजपुरीच्या वातावरणात माझा जीव कधीही रमला नाही. सर्व असह्य़ झाल्यावर स्वत:चं स्वास्थ्य जपण्यासाठी मुदतपूर्व नोकरीचा राजीनामा लिहून देऊन मी माझा लेखनाचा छंद जोपासू लागलो. यात मला अधिक आनंद मिळू लागला. महसूल खात्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करताना होणारी कुचंबणा, घालमेल, बरेवाईट अनुभव याचं मला अगदी जवळून दर्शन झालं होतं. त्यामुळे तो असंतोष माझ्या मनात नेहमी खदखदत असे.
भ्रष्टाचार हासुद्धा जणू शिष्टाचार झाला आहे, असं म्हटलं तर ते मुळीच वावगं ठरणार नाही. शासकीय खात्यातील अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, मनमानी आणि दप्तर दिरंगाई यामुळे जनतेच्या मनात शासकीय कर्मचारी-अधिकारी यांच्याबद्दल प्रचंड राग, द्वेष आणि तिरस्कार आहे. माझ्या ‘कुरण’ या आगामी कादंबरीत मी त्याचा ऊहापोह करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
गेल्या वर्षी स्वच्छ कारभार असलेल्या जगातील दीडशे देशांची एका विदेशी संस्थेमार्फत पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये आपल्या देशाचा १३४वा क्रमांक लागला, हे आपल्याला लांच्छनास्पद आहे. आपण ज्याला नेहमी आपला पारंपरिक शत्रू समजतो तो पाकिस्तानसारखा देशसुद्धा आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात भ्रष्टाचाराने इतकं थैमान घातलं आहे की, त्याविरोधात संसदेत लोकपाल विधेयक मंजूर होण्यासाठी संपूर्ण देशातील जनता एकत्र येऊन थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली. जनतेने धरणं, आंदोलनं केली, परंतु अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे ते लोकपाल विधेयक अद्याप संसदेत मंजूर होऊ शकलं नाही.
भ्रष्टाचाराने सध्या सगळीकडे डोकं वर काढलं असलं तरी मराठी साहित्य क्षेत्रात त्याचं म्हणावं तसं चित्रण आलं नाही. साहित्य हे समाजाचा आरसा आहे, असं नेहमी म्हटलं जातं. परंतु आजच्या साहित्यात समाजाचे ज्वलंत चित्रण दिसत नाही, अशी एक सार्वत्रिक ओरड आहे. आणि ती रास्तदेखील आहे. मराठी साहित्य हे आवर्तात सापडलं आहे की काय, अशी शंका मनात येते.
जनतेला भेडसावणाऱ्या अडीअडचणींबद्दल त्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत लेखकाने निर्भीडपणे लिहिलं पाहिजे, असा मनात विचार करून मी ‘कुरण’ कादंबरी लिहिली आहे. महसूल खात्यातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणून, त्यातून प्रसिद्धी मिळावी, असा माझा मुळीच हेतू नाही. बाजीराव डोईफोडे नावाचा तहसीलदार पैशाच्या हव्यासापायी आपलं संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करतो, याचं चित्रण मी माझ्या कुवतीप्रमाणे त्यात केलं आहे. महसूल खात्यात मी इतकी वर्षे नोकरी केल्यामुळे येथील बऱ्या-वाईट अनुभवांचं संचित माझ्याकडे असल्यामुळे ‘कुरण’ कादंबरी लिहू शकलो, हे मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो.