लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे जाहीरसभा आणि प्रचारयात्रांच्या माध्यमांतून उमेदवार विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना, राजकीय पक्षांनी टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमांतून घरबसल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. देशभरातील बहुतेक सर्वच पक्षांनी नेहमीप्रमाणेच या वेळीही जाहिरातींवर अमाप खर्च केल्याचे दिसून येत आहे.
फोटो बदलला, जाहिरात तीच
‘मेहनतीने केलेले कॅम्पेन पक्षाच्या नेत्याला आवडले नाही म्हणून नाकारले गेल़े महिन्याभराची मेहनत पाण्यात जाणार या चिंतेत असतानाच आमच्या मुख्य अधिकाऱ्यांनी कॅ म्पेन त्यांच्याकडे सोपवायला सांगितले. दिल्लीतून बाहेर पडून ते राजस्थानात पोहोचले. कॅ म्पेन तेच, त्याच्यावरच्या नेत्याचा चेहरा बदलला गेला, लोगो बदलला आणि आमची मेहनत सार्थकी लागली,’ अशा शब्दांत जाहिरातविश्वातील एका अधिकाऱ्याने अनुभव सांगितला.
जाहिरातींची व्यूहरचना
*राजकीय जाहिरातबाजींचा श्रीगणेशा काँग्रेसने ‘हर हाथ शक्ती, हर हाथ तरक्की’ या मोहिमेने केला. भाजपने मात्र टीव्हीवरच्या जाहिराती आणि देशभरात प्रमुख १५ हजार ठिकाणी होर्डिग्ज अशी जोरदार व्यवस्था केली होती.
*या प्रत्येक होर्डिग्जमागे प्रति महिना दोन लाखांपासून ते २० लाखांपर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. टीव्हीवरही ३० सेकंदांसाठी ८० हजार रुपये याप्रमाणे जाहिरातींसाठी दर आकारला गेला आहे.
*पहिल्या टप्प्यात काँग्रेसने टीव्हीवरच्या जाहिरातींवर दिलेला भर ओसरला, तर भाजपने मात्र कमीत कमी वेळाच्या जास्तीत जास्त जाहिराती असा फंडा राबवत मतदारांवर ‘अबकी बार, मोदी सरकार’चा मारा केला.
*राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी शेवटच्या टप्प्यात टीव्हीवरच्या जाहिराती सुरू केल्या असून त्यांचा भर हा होर्डिग्ज आणि इतर माध्यमांवर राहिला आहे.
*आम आदमीच्या ‘आप’नेही सोशल मीडियाला जवळ केले, तर शिवसेनेने या निवडणुकीपुरते तरी पक्षांतर्गत जाहिरात तयार करून आपला खर्च वाचवण्यावर भर दिला आहे.
*शिवसेनेने कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा थेट संदेश देणाऱ्या जाहिराती पक्षांतर्गतच तयार केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.