टोलच्या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकीय रण पेटत असताना राज्याच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या बांदा सटमटवाडी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका उभारण्यासाठी तब्बल ३२ एकर जमीन संपादित केली जात आहे. विशेष म्हणजे ही जमीन खनिजांनी समृद्ध असल्याचा अहवाल असतानाही त्यावर टोलनाका उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता स्थानिकांचा विरोध डावलण्यात आला आहेच; पण वनकायद्याचा भंग करत येथील ७४०० झाडांचीही कत्तल झाली आहे.
महाराष्ट्रातून गोव्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पत्रादेवीजवळ हा टोलनाका उभारण्यात येत असून त्यासाठी ३२ एकर जमीन संपादित केली जात आहे. या जमिनीमध्ये उच्च प्रतीचे खनिज असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या खनिजावर डोळा ठेवणाऱ्या काही राजकीय मंडळींनी टोलनाक्याच्या नावाखाली हे भूसंपादन घडवून आणल्याचा आरोप होत आहे. याविरोधात स्थानिकांनी आंदोलने केली. तर यातील साईप्रसाद कल्याणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. जमीन संपादित करत असताना खनिज आणि तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा लाभक्षेत्रालाही मूठमाती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र बोर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.करिता मनोज अब्रोफ साइट इन्चार्ज म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मे. सद्भाव इंजिनीयरिंग कंपनी अहमदाबाद, गुजरात यांनी या जमिनीतील सुमारे सात हजार ४०० झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याची तक्रार आहे.