या जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघात ९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ७९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विजयी झालेले पाच उमेदवार, तसेच दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले पाच आणि तिसऱ्या स्थानी राहिलेले चार उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
प्रत्येक मतदारसंघात एकूण किती मतदान झाले, त्या मतदानाच्या १५ टक्क्यापेक्षा कमी मते ज्यांना मिळाली आहेत त्या सर्वाची अनामत जप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने अकोला पूर्वमध्ये काँग्रेसचे डॉ.सुभाषचंद्र कोरपे, तसेच राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेच्या पराजयात आणि हरीदास भदेंच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणारे व ३० हजारापेक्षा अधिक मते घेणारे विजय मालोकार यांचीही अनामत रक्कम यावेळी जप्त झाली आहे, तर अकोला पश्चिममध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे गुलाबराव गावंडे व काँग्रेसच्या उषाताई विरक यांचा अनामत जप्त उमेदवारात समावेश आहे. बाळापूर मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नारायणराव गव्हाणकर व भाजपाविरुद्ध बंडखोरी करणारे संदीप पाटील यांचा समावेश आहे, तर अकोटमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे संजय गावंडे, तसेच राष्ट्रवादीचे राजीव बोचे यांची अनामत जप्त झाली आहे. विशेष म्हणजे, संजय गावंडे हे गेल्या वेळी आमदार होते. मूर्तिजापूर मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचे श्रावण इंगळे व राष्ट्रवादीचे डॉ.सुधीर विल्हेकर यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.