नक्षलवादविरोधी मोहीम राबविण्यासाठी गडचिरोली जिल्हय़ात २०१६-१७ या एका वर्षांचा हेलिकॉप्टरचा खर्च ९ कोटी रुपये आलेला आहे. विशेष म्हणजे हे हेलिकॉप्टर वर्षभर गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सेवेत असते. यावर्षी निवडणुकीच्या काळात तर गडचिरोली जिल्हय़ासाठी विशेषत्वाने तीन हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

नक्षलवादग्रस्त भागात पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच जखमी व्यक्ती व जवानांची ने-आण करणे, जखमी जवानांना त्वरित वैद्यकीय सहाय्य पुरविणे, जवानांना खाद्यसामुग्री पुरविणे, संशयित भागाची पाहणी करणे, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात पोलिसांना ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो.  मे. पवनहंस हेलिकॉप्टर्स लिमिटेड या कंपनीकडून डॉफिन एन हे हेलिकॉप्टर वेज लीजवर घेण्यात आलेले आहे. याबाबत या कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. या हेलिकॉप्टरसाठी राज्य शासनाला २०१६-१७ साठी ९ कोटी रुपये खर्च आलेला आहे. राज्यात केवळ नक्षलवादग्रस्त गडचिरोली या एकमेव जिल्हय़ातच पोलीस दलाच्या मदतीला हेलिकॉप्टर आहे. एका हेलिकॉप्टरवर शासनाचा इतक्या मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. दरम्यान, हे हेलिकॉप्टरचे भाडे तात्काळ अदा करावे असा शासन निर्णय गृह विभागाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने निघाला आहे.

विशेष म्हणजे यावर्षी गडचिरोली जिल्हय़ात दोन टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठीही गडचिरोली जिल्हा व पोलीस प्रशासनासाठी तीन हेलिकॉप्टरची व्यवस्था राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली होती. या हेलिकॉप्टरने निवडणूक पथकाला अतिदुर्गम व संवेदनशील मतदान केंद्रावर सोडणे आणि घेऊन येणे आदी कामे केली. त्यामुळे प्रशासनाची कामे सोपी झाली व अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावरून या पथकाला ने-आण करणेही सोपे झाले. दरम्यान, गडचिरोलीत संरक्षणासाठी तसेच नक्षलवाद्यांच्या कारवायांवर तसेच त्यांची जंगलातील स्थळे शोधण्यासाठीही हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो.